‘वेश्या’ हा व्यवसाय नसून स्त्रियांना नाडणारी संघटित गुन्हेगारी ! – अरुण पांडे, ‘अर्ज’ संस्था

‘अर्जमधील दिवस’ या वेश्या वस्तीतील प्रत्यक्ष कामाविषयीच्या अनुभवांवरील पुस्तकाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित मान्यवर

सावंतवाडी – ‘वेश्या’ हा व्यवसाय नसून स्त्रियांना नाडणारी संघटित गुन्हेगारी आहे. ‘मुली’ हा ‘विक्रीचा पदार्थ’ झाला आहे. याकडे आजही गुन्हा म्हणून पाहिले जात नाही. त्याला बलात्कार मानले जात नाही, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. वेश्या व्यवसाय बंद व्हावा; म्हणून समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे. सर्व शक्ती लावून या विरोधात उठले पाहिजे, असे आवाहन वेश्या व्यवसायातील समस्यांविषयी काम करणार्‍या ‘अर्ज’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक अरुण पांडे यांनी केले.

मानसोपचारतज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांच्या ‘अर्जमधील दिवस’ या वेश्या वस्तीतील प्रत्यक्ष कामाविषयीच्या अनुभवांवरील पुस्तकाला या वर्षीचा ‘सरस्वती लक्ष्मण पवार पुरस्कार’ घोषित झाला. या पुरस्काराचे वितरण सावंतवाडी शहरातील श्रीराम वाचन मंदिरात झाले. या वेळी डॉ. संजीव लिंगवत आणि पत्रकार देवयानी वरस्कर आदी उपस्थित होते.

या वेळी अरुण पांडे म्हणाले, ‘‘आज गोव्यात देशातील २५ राज्यांतील, तसेच बांगलादेश, नेपाळ या देशांतील महिला वेश्या म्हणून काम करतात. हे रोखण्यासाठी कायदा आहे; मात्र त्याची कार्यवाही होत नाही. ‘रोजगाराचा प्रश्न असल्याने महिला वेश्या व्यवसायात येतात’, असा गैरसमज आहे. याविषयी समाजात खरे ज्ञान देण्याचे मोलाचे काम डॉ. रूपेश पाटकर यांच्या ‘अर्ज मधील दिवस’ या पुस्तकाने केले आहे.