मुंबई – राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकर्यांना ३ हेक्टरपर्यंत हानीभरपाई देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. २९ नोव्हेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अन्य मंत्री उपस्थित होते.
मागील २ दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे शेती आणि फळ पीक यांची हानी झाली. यामध्ये राज्यातील १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हानीभरपाई तातडीने मिळावी, यासाठी सर्व जिल्ह्यांचे पंचनामे कालबद्ध रितीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच पालकमंत्र्यांना बाधितक्षेत्राची पहाणी करण्याचे आवाहन केले आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, बीड, नांदेड या जिल्ह्यांत कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी या पिकांसह फळपिकांची हानी झाली.