दिवाळीचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्‍य आणि कला या दृष्‍टीकोनातून महत्त्व !

१. धार्मिक 

‘सणांच्‍या व्‍यवस्‍थापनात सतत परमेश्‍वराचे स्‍मरण, कीर्तन, जप, पूजा, आराधना आणि सेवा या योगे मनात सात्त्विक भाव जागृत ठेवावा, यांवर भर दिला आहे. ‘धर्मो रक्षति रक्षित:’, म्‍हणजे धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्‍हणजेच ईश्‍वर रक्षण करतो. ही आपली प्राचीन धारणा आहे. (येथे ‘रिलीजन’ या अर्थाने धर्म अपेक्षित नाही, तर वेदोक्‍त सनातन हिंदु धर्म अपेक्षित आहे. ‘ज्‍यात ब्रह्म हेच अंतिम सत्‍य आहे. मी ब्रह्म आहे आणि तूही ब्रह्मच आहेस’, हा समानतेचा श्रेष्‍ठ संदेश दिला आहे.)

२. सामाजिक 

दिवाळीच्‍या निमित्ताने सर्वांनी एकमेकांशी स्नेहपूर्ण वागून सामाजिक सौहार्द राखण्‍याचा प्रयत्न केला जातो. त्‍याचे दायित्‍व कुठलीही एक व्‍यक्‍ती किंवा समूह यांच्‍यावर न सोपवता ती सर्वांवर सारखीच विभागून दिली जाते. हे या आयोजनातील वैशिष्‍ट्य आहे.

३. आर्थिक 

वैद्या सुचित्रा कुलकर्णी

उत्‍सवाच्‍या निमित्ताने फुले, रांगोळ्‍या, धूप, दीप, गंध, सजावट साहित्‍य, देवतांची वस्‍त्रे आणि दागिने, फळे, समया इत्‍यादींची मागणी वाढते. देवासमोर जागर, गोंधळ, नृत्‍य, संगीत, रांगोळ्‍या, सजावट, झाडलोट करणार्‍या कलाकारांना काम मिळते. एकूणच आर्थिक उलाढाल होऊन समाजातील सर्व घटकांना आर्थिक प्राप्‍ती होते आणि त्‍यांच्‍या उदरभरणाची व्‍यवस्‍था होते.

४. आरोग्‍य  

करियर, धर्म, मनोरंजन, सामाजिक आयुष्‍य, ज्‍यासाठी रात्रीच्‍या मेजवान्‍यांमध्‍ये आरोग्‍याची नासाडी करण्‍याची नवी परंपरा आपण स्‍वीकारली आहे. या सगळ्‍यांचा आस्‍वाद घेत असतांनाही आरोग्‍याला कुठेही तडा जाणार नाही; किंबहुना काहीतरी लाभच होईल, हा विचार करून सणांचे व्‍यवस्‍थापन केले जायचे, ही आपल्‍या ऋषींची श्रेष्‍ठता आहे; कारण इतर सर्व गोष्‍टी परत मिळवता येतात; पण आरोग्‍य नाही आणि याची जाणीव आपल्‍या पूर्वाश्रमींना होती. त्‍यामुळेच प्रत्‍येक सणाची मांडणी करतांना त्‍यात आरोग्‍याचा विचार प्राधान्‍याने केलेला दिसतो.

५. कला  

सणांच्‍या निमित्ताने मानवी जीवन संपन्‍न करणार्‍या विविध कला-कौशल्‍यांची परंपरा टिकवून ठेवली जाते.

६. दिवाळीचा फराळ शरिराचे बल वाढवणारा असणे 

हे दिवाळीचे वैशिष्‍ट्य आहे. चिवडा, चकल्‍या, करंज्‍या, अनारसे, शेव, विविध लाडू, कडबोळी, शंकरपाळे अशा बहुविध चविष्‍ट पदार्थांनी संपन्‍न असा हा फराळ, म्‍हणजे ‘खाणार्‍यांची’ दिवाळीच. निसर्गात चालू झालेल्‍या थंडीला आणि त्‍यामुळे शरिरात प्रज्‍वलित होऊ लागलेल्‍या अग्‍नीला साजेसा हा गोड अन् तिखट फराळ पचायला जड असला, तरी शरिराला पोषक असतो. पावसाळ्‍यात भूक अल्‍प म्‍हणून केलेल्‍या उपवासांनी थोड्या कृश झालेल्‍या शरिराचे बल वाढवायला हे पदार्थ पुष्‍कळ उपयोगी पडतात. एकूणच दिवाळीत ज्ञान, धन आणि बळ प्राप्‍त करण्‍याची मुहूर्तमेढ रचायची असते. या गोष्‍टी प्राप्‍त झाल्‍यावर त्‍यांचा विनियोग कसा करायचा, याचेही भान हवे. सुभाषितकार म्‍हणतात,

विद्या विवादाय धनं मदाय शक्‍तिः परेषां परिपीडनाय ।
खलस्‍य साधोर्विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय ॥

अर्थ : दुष्‍ट लोक त्‍यांनी प्राप्‍त केलेली विद्या वाद घालण्‍यासाठी, धन उन्‍मादासाठी, तर शक्‍ती इतरांना त्रास देण्‍यासाठी वापरतात. याउलट सज्‍जन माणसे त्‍यांनी प्राप्‍त केलेली विद्या ज्ञानासाठी, धन दानासाठी, तर शक्‍ती इतरांच्‍या रक्षणासाठी वापरतात.

– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (साभार : साप्‍ताहिक ‘विवेक’)