रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून नामजप करतांना साधकाला आलेल्‍या अनुभूती

 ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या कृपेने मला ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या निमित्ताने १.६.२०२२ या दिवसांपासून सेवा करण्‍याचे परम भाग्‍य लाभले. मला प्रतिदिन रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील  ध्‍यानमंदिरात सकाळी होणार्‍या आरतीला उपस्‍थित रहाण्‍याची संधी मिळाली. तेव्‍हा मला आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

श्री. जयवंत रसाळ

१. नामजप एकाग्रतेने होणे 

मी २ दिवस नामजप करण्‍यासाठी ध्‍यानमंदिरात बसलो होतो. मी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या छायाचित्राला नमस्‍कार करून नामजप करत असतांना माझे मन एकाग्र झाले. गुरुदेवांच्‍या चरणपादुकांकडे माझे मन केंद्रित झाले.

२. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या छायाचित्रातील त्‍यांच्‍या आज्ञाचक्रातून तेजोमय कण निघत आहेत’, असे दिसणे

परात्‍पर गुरुमाऊलींच्‍या छायाचित्राच्‍या दिशेने माझे मन एकाग्र होत होते. मला सूक्ष्मातून दिसले, ‘परात्‍पर गुरुमाऊलींच्‍या आज्ञाचक्राच्‍या ठिकाणी हिर्‍यासारखा चमकणारा एक खडा आहे. तो खडा प्रकाशमय होऊन त्‍यातून तेजोमय कण बाहेर पडत आहेत. काही वेळाने त्‍या कणांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा संपूर्ण चेहरा झाकला गेला आणि त्‍यांचे छायाचित्र पांढरे अन् प्रकाशमान झाले. परात्‍पर गुरुमाऊलींच्‍या चेहर्‍याच्‍या मागील बाजूने पुष्‍कळ प्रकाशझोत निघाला आणि तो प्रकाशझोत ध्‍यानमंदिरातील सर्व देवतांच्‍या चित्रांवर पसरला.’ मला असे दृश्‍य २ दिवस दिसत होते.

३. मला ध्‍यानमंदिरात गुरुदेवांचे अस्‍तित्‍व जाणवत होते.

४. मारुतिरायांची आरती म्‍हणतांना मला जाणवले, ‘वानरसेना हातात गदा घेऊन आश्रमाच्‍या सभोवताली भुभुःकार करत आहे.’

५. ‘प्रभु रामचंद्रांच्‍या समवेत हनुमानजी आणि त्‍यांचे सैन्‍य लढण्‍याच्‍या पवित्र्यात आहे’, असे दृश्‍य मला दिसले.

त्‍या दिवशी आरती अत्‍यंत भावपूर्ण झाली आणि मला पुष्‍कळ कृतज्ञता वाटली.’

– श्री. जयवंत रसाळ, जयसिंगपूर (२७.६.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक