‘डॉक्टर गेले वर्षभर पाळीच्या वेळेस अतोनात रक्तस्राव (ब्लिडींग) होत आहे. ओटीपोटात पुष्कळ वेदना होतात. मी कंटाळून गेले आहे हो !… काढून टाकूया का गर्भपिशवी ?’ रुग्ण अतीरक्तस्रावामुळे पुष्कळ वैतागलेली आणि दमलेली दिसतच होती.
‘सगळ्या तपासण्या केल्यावर तिच्या गर्भाशयाला बरीच सूज आहे’, असे लक्षात आले. याला ‘अॅडेनोमायोसिस’ (Adenomyosis) असे शास्त्रीय नाव आहे.
१. गर्भाशयाला सूज येण्यामागील कारण
या आजारामध्ये गर्भाशयाच्या आतील आवरणाच्या पेशी (Endometrium) गर्भाशयाच्या बाहेरच्या पदरात रुजतात. पाळी येते तेव्हा या पेशींमधूनही रक्तस्राव होतो. त्यामुळे गर्भाशयाला सूज येते. ती प्रत्येक पाळीत वाढत जाते आणि त्यामुळे पाळी वेदनादायक होत जाते. कधी कधी ‘इस्ट्रोजेन’ (estrogen) आणि ‘प्रोजेस्टेरॉन’ (progesterone) या दोन ‘हार्मोन्स’चे (संप्रेरकांचे) संतुलन बिघडते. ‘इस्ट्रोजेन’चे प्रमाण वाढल्यामुळे गर्भाशयाच्या आतील आवरणामध्ये पेशींचे विकृतीकरण होऊन त्या पालटतात. याला ‘हायपरप्लासिया’ (Hyperplasia) असे म्हणतात. यात वेगवेगळे प्रकार असतात. वेळीच उपचार न केल्यास याचे क्वचित् कर्करोगामध्ये (‘कॅन्सर’मध्ये) रूपांतर होऊ शकते.
२. गर्भाशयाला आलेल्या गाठींमुळेही अतीरक्तस्राव होण्याची शक्यता
काही केसेसमध्ये ‘फायब्रॉईड’ची समस्या असते, म्हणजे गर्भाशयाला गाठी असतात. याचा पुढे कर्करोग होण्याची शक्यता अत्यल्प असते; पण या गाठींमुळे अतीरक्तस्राव, पोटात दुखणे, पोटातील बाकीच्या अवयवांवर दाब पडणे, अशी लक्षणे दिसतात. ‘फायब्रॉईड’ गर्भाशयाच्या कोणत्या भागात आहेत ? आणि त्याचा आकार केवढा आहे ? यावर त्याचे उपचार ठरतात. काही स्त्रियांमध्ये पाळीत रक्तस्राव अधिक होण्याची पहिल्यापासून प्रवृत्ती असते आणि ती वयानुसार वाढत जाते. अशा स्त्रियांच्या सगळ्या तपासण्या सामान्य (नॉर्मल) येतात; पण काही केल्या रक्तस्राव आटोक्यात येत नाही.
३. सध्याची परिणामकारक उपचारपद्धत
वर उल्लेख केलेल्या सगळ्या स्त्रियांकरता ‘लिव्होनोजेस्ट्रल इंट्रायुटेरिन सिस्टीम’ (Levonorgestrel intrauterine system – LNG-IUS) ही गर्भाशयात बसवण्याचा म्हणजे ‘इम्प्लांट’ (implant) करण्याची अतिशय परिणामकारक उपचारपद्धत ठरते. यामध्ये परदेशातून ‘मिरेना’ (Mirena) हा ब्रँड उपलब्ध आहे, तसेच काही भारतीय ब्रँड्सही उपलब्ध आहेत. पाळीचे हे त्रास स्त्रियांना शक्यतो वयाच्या चाळीशीनंतर होतात. त्या वयात त्यांना ‘हार्मोन्स’च्या गोळ्या देणे शक्य नसते; कारण वाढत्या वयानुसार विशेष करून ३५ वर्षे वयानंतर ‘हार्मोन्स’च्या गोळ्यांचे विपरीत परिणाम होऊ शकतात. या वयातील काही स्त्रियांना मधुमेह आणि रक्तदाब असेही त्रास असू शकतात. त्यामुळेही ‘हार्मोन्स’च्या गोळ्या देता येत नाहीत.
४. ‘लिव्होनोजेस्ट्रल इंट्रायुटेरिन सिस्टीम’ गर्भाशयात बसवल्यानंतर होणारे कार्य आणि परिणाम
अशा परिस्थितीत ‘लिव्होनोजेस्ट्रल इंट्रायुटेरिन सिस्टीम’ हे स्त्रियांसाठी वरदान ठरते; कारण हा ‘इम्प्लांट’ थेट गर्भाशयात बसवला जातो. त्यामुळे ‘प्रोजेस्टेरॉन’ हा हॉर्मोन केवळ गर्भाशयात सोडला जातो आणि तिथेच परिणाम करतो. त्याचा बाकी शरिरावर परिणाम होत नाहीत. हा ‘प्रोजेस्टेरॉन’ हॉर्मोन ५ वर्षे अगदी अल्प मात्रेत गर्भाशयात सोडला जातो. त्यामुळे गर्भाशयाचे आतील आवरण पुष्कळ पातळ रहाते. परिणामी रक्तस्राव न्यून होत काही मासांत थांबतो; पण सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे रुग्ण ‘मेनोपॉज’मध्ये जात नाही. ‘ओव्हरीज’चे (अंडाशयाचे) काम नीट चालू रहाते. फक्त रुग्णाची रक्तस्त्रावाची समस्या संपते.
– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोगतज्ञ आणि वंध्यत्व तज्ञ, कोथरूड, पुणे. (६.७.२०२३)