‘घरच्या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ (लेखांक ११) !
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.
२९ सप्टेंबरपासून आपण प्रत्यक्ष आजारावरील स्वउपचार समजून घेत आहोत. त्या अंतर्गत १३ ऑक्टोबर या दिवशी आपण ‘आम्लपित्त’ या आजारावर घ्यावयाची काळजी आणि त्यावर घ्यावयाची औषधे’ यांविषयी माहिती वाचली. ‘प्रत्यक्ष आजारांवर स्वउपचार चालू करण्यापूर्वी २५ ऑगस्ट, १ आणि ८ सप्टेंबर २०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांतील ‘होमिओपॅथी स्वउपचारासंदर्भातील सूत्रे’ वाचून समजून घ्यावीत आणि त्यानुसार प्रत्यक्ष औषधे निवडावीत, ही विनंती !
संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे आणि डॉ. अजित भरमगुडे
सप्ताहात ३ पेक्षा कमी वेळा शौचाला होणे, शौच शुष्क आणि कडक असणे, शौच करायला कठीण असणे, शौच करतांना वेदना होणे, तसेच शौच अपूर्ण झाल्याची जाणीव असणे, याला ‘बद्धकोष्ठता’ असे म्हणतात. अयोग्य आहाराची सवय, हे बद्धकोष्ठतेचे प्रमुख कारण होय.
१. बद्धकोष्ठता होऊ नये यासाठी करावयाचे प्रयत्न
१ अ. शौचाची जाणीव झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, तत्परतेने शौचास जावे.
१ आ. प्रतिदिन तहान लागण्याच्या प्रमाणानुसार किमान ८-९ पेले पाणी प्यावे.
१ इ. प्रतिदिन आपल्या क्षमतेनुसार व्यायाम करावा.
१ ई. आहारात भाज्या आणि फळे यांचा पुष्कळ वापर करावा.
१ उ. कॉफी पिणे टाळावे.
२. औषधे
२ अ. नक्स व्हॉमिका (Nux Vomica)
२ अ १. अतिप्रमाणात कॉफी, चहा, मद्य ग्रहण करणे, तसेच बौद्धिक ताण या कारणांमुळे होणारी बद्धकोष्ठता
२ अ २. थोडे अन्न खाल्ले, तरी पोट भरल्यासारखे जाणवणे
२ अ ३. शौचाला वरचेवर जावे लागणे आणि गेल्यावर शौचाला अत्यल्प होणे
२ आ. ॲल्यूमिना (Alumina)
२ आ १. ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवण केल्यामुळे ॲल्युमिनियमचा अंश पोटात गेल्यामुळे होणारी बद्धकोष्ठता
२ आ २. शौच अतिशय कडक असून रुग्णाला पुष्कळ जोर लावून कुंथावे लागणे
२ आ ३. प्रत्येक २ दिवसांनी शौचाला होणे
२ आ ४. पाठीमध्ये तीव्र अशा जळजळणार्या वेदना होणे
२ इ. ब्रायोनिया अल्बा (Bryonia Alba)
२ इ १. शौचाला कोरडे, कडक होणे, शौच करतांना जळजळ होणे
२ इ २. बद्धकोष्ठता आणि त्याबरोबर डोकेदुखी असणे
२ इ ३. नेहमी घशाला कोरड पडून पुष्कळ तहान लागणारा, पुष्कळ वेळाने पुष्कळ पाणी पिणारा
२ इ ४. उष्ण हवामानामध्ये सर्वच व्याधींचा अधिक त्रास होणारा
२ ई. ओपियम (Opium)
२ ई १. शौचाला गोल, कडक असे काळे खडे पडणे
२ ई २. अनेक दिवस शौचाला जाण्याची इच्छा न होणे
२ ई ३. नेहमी सतत झोप येत असणारे
२ उ. प्लंबम् मेटॅलिकम् (Plumbum Metallicum)
२ उ १. रंगकाम करणार्या कामगारांमध्ये शिशाच्या विषबाधेमुळे होणारी बद्धकोष्ठता
२ उ २. संगमरवरासारखे पांढरे शौच होणे
२ उ ३. पोटामध्ये तीव्र ओढल्याप्रमाणे वेदना होणे, बेंबी आत मणक्याकडे ओढली जात आहे, असे वाटणे
२ उ ४. हिरड्यांच्या कडा निळ्या पडणे
२ ऊ. सॅनिकुला ॲक्वा (Sanicula Acqua)
२ ऊ १. बद्धकोष्ठतेचा आजार पुष्कळ कालावधीपासून (chronic) असणे
२ ऊ २. ४ ते ५ दिवस शौचाला न होणे
२ ऊ ३. शौच बाहेर पडणे कठीण होणे आणि त्यासाठी घाम येईपर्यंत कुंथावे लागणे
२ ए. सल्फर (Sulphur)
२ ए १. शौचाला जाण्याची इच्छा पुन:पुन्हा होणे; परंतु शौचाला जाऊन समाधान न होणे
२ ए २. कडक, गाठी असलेले आणि अपुरे शौचाला होणे
२ ए ३. गुदद्वाराच्या भागात जळजळ होणे
२ ए ४. प्रतिदिन सकाळी ११ वाजता गळून गेल्यासारखे वाटणे
२ ऐ. थुजा ऑक्सिडेंटॅलिस (Thuja Occidentalis)
२ ऐ १. शौचात कडक, काळे गोळे पडणे
२ ऐ २. शौच बाहेर पडत असतांना पुन्हा आत जाणे
२ औ. मॅग्नेशियम म्युरियाटिकम् (Magnesium Muriaticum)
२ औ १. लहान मुलांना दात येत असतांना होणारी बद्धकोष्ठता
२ औ २. शौचातून शेळीच्या लेंड्यांप्रमाणे खडे पडणे आणि त्याचे गुदद्वाराशी तुकडे पडणे
२ औ ३. शौच आरंभी कडक आणि नंतर नरम असणे
‘घरच्या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या आगामी ग्रंथातील निवडक भाग प्रत्येक शुक्रवारी लेखाच्या रूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्वउपचार करण्याच्या दृष्टीने साधक, वाचक, राष्ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख आपत्काळाच्या दृष्टीने संग्रही ठेवावेत. आपत्काळात डॉक्टर, वैद्य कुणीही उपलब्ध नसतील, त्या वेळी ही लेखमाला वाचून स्वतःच स्वतःवर उपचार करता येईल. |