‘एकदा आमच्यात (सौ. भवानी प्रभु आणि पू. भार्गवराम यांच्यात) झालेला संवाद येथे दिला आहे.
१. पू. भार्गवराम प्रभु यांना चुकांविषयी वाटत असलेली खंत !
पू. भार्गवराम : आई, तू माझा जन्म होण्यापूर्वी देवाला ‘चांगले मूल दे’, असे सांगितले होतेस का ?
मी : मी तसे देवाला सांगितले होते.
पू. भार्गवराम : तरीही मी कधी कधी चुका करतो. असे का होते ? तू तर देवाकडे चांगले मूल मागितले होतेस ना?
मी : तुमच्याकडून कधी चूक झाली, तर ‘ते अयोग्य आहे’, हे तुम्हाला आधी ठाऊक नसते. ‘तसे करणे अयोग्य आहे’, हे समजल्यानंतरही तुम्ही पुन्हा तशीच चूक केलीत, तर ते चांगले नसते.
मी देवाकडे चांगले मूल मागितले होते; म्हणून गुरुदेवांनी मला चांगलेच मूल दिले आहे. ‘गुरुदेवांनी आपल्याला सांगितलेले आपण योग्य प्रकारेच केले पाहिजे’, हीच आपली साधना आहे.
२. पू. भार्गवराम यांच्यातील शिकण्याची वृत्ती !
पू. भार्गवराम : तू देवाकडे आणखी काय मागितले होतेस ?
मी : मी देवाला प्रार्थना करत होते, ‘मला राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करणारे मूल दे. तूच या बाळाकडून अखंड सेवा आणि साधना करून घे.’
पू. भार्गवराम : सर्व माता देवाकडे असेच मागत असतात का ?
मी : सर्व माता आपल्या मुलांसाठी चांगलेच मागतात; मात्र ‘चांगले’ याचा अर्थ प्रत्येक आईच्या दृष्टीने निराळा असू शकतो. एखादी माता सांगते, ‘माझ्या बाळाला शक्तीशाली बनवा’, तर एखादी माता सांगते, ‘माझ्या बाळाला सुंदर बनवा.’ एखादी माता सांगते, ‘माझ्या बाळाला चतुर (हुशार) बनवा.’
पू. भार्गवराम : माझ्या वर्गात एक मुलगा वाईट आहे. तो तसा का आहे ?
मी : तो तसा आहे; कारण त्याला चांगले वागायला शिकवणारे कुणी नाही. तुम्हाला घरातील सर्व सदस्य, पू. आजी (पू. (श्रीमती) राधा प्रभु, सनातनच्या ४४ व्या संत) आणि आश्रमातील साधक चांगले वागायला शिकवतात.
आपण चांगले काम केले, तरच आपण चांगले रहातो. आपण अयोग्य वागणे चांगले नसते.
तुम्ही असे का विचारत आहात ?
पू. भार्गवराम यांनी थोडा वेळ शांत राहून विचार केला. नंतर त्यांनी मला सांगितले, ‘‘मला हे शिकायला पाहिजे ना; म्हणून मी विचारले.’’
खरेतर आमचा संवाद होण्याच्या आधी पू. भार्गवराम खेळत होते. खेळतांना मधेच थांबून त्यांनी माझ्याजवळ येऊन हे सर्व प्रश्न विचारले. तेव्हा मला वाटले, ‘पू. भार्गवराम खेळत असतांनाही एका वेगळ्याच स्थितीत असतात.’
या संवादातून पू. भार्गवराम यांची शिकण्याची वृत्ती माझ्या लक्षात आली. ‘गुरुदेवा, केवळ आपल्याच कृपेने पू. भार्गवराम विचारत असलेल्या प्रश्नांना मला उत्तरे देता आली’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांची आई), मंगळुरू (२७.८.२०२३)