आध्‍यात्मिक त्रास वाढल्‍याचा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना निरोप पाठवल्‍यानंतर त्रास न्‍यून होऊन बरे वाटणे

कु. मयुरी डगवार

‘एकदा मला होणार्‍या आध्‍यात्मिक त्रासाची तीव्रता वाढली. मी दिवसभर नामजपादी उपाय करूनही माझा त्रास न्‍यून झाला नव्‍हता. रात्री २ वाजता मला असह्य त्रास होऊ लागला. त्‍या संदर्भात मी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना निरोप पाठवला. त्‍यानंतर माझा त्रास क्षणार्धात न्‍यून होऊन मला बरे वाटले आणि मी ५ मिनिटांत झोपले. दुसर्‍या दिवशी सकाळी झोपेतून उठल्‍यावर मला बरे वाटत होते. या अनुभूतीवरून मला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍याबद्दल लिहिलेले पुढील वाक्‍य आठवले, ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांची स्‍थुलातील कार्य करण्‍याची क्षमता अफाट आहेच; परंतु त्‍यांचे सूक्ष्मातील कार्य आपण जाणूच शकत नाही, इतके ते सूक्ष्म, व्‍यापक आणि बुद्धीच्‍या पलीकडील आहे.’’ ‘केवळ परात्‍पर गुरु (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ, तसेच सनातनचे संत यांच्‍या कृपेने मी हे जीवन आनंदाने जगू शकत आहे’, याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अल्‍पच आहे.’ – कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.९.२०२२)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक