मन आणि बुद्धी यांच्‍या पलीकडील म्‍हणजे सूक्ष्मातील जाणण्‍याची अफाट क्षमता असलेल्‍या श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

१. साधिकेच्‍या डोळ्‍यांना होणार्‍या त्रासाची आधीच जाणीव होऊन तिला आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय करण्‍यास सांगणे !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१ अ. साधिकेला त्रास होत नसतांनाही श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी तिला ‘डोळ्‍यांना त्रास होत आहे का ?’, असे विचारणे : ‘मी एकदा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍याकडे गेले होते. तेव्‍हा त्‍यांनी मला समोर उभे रहाण्‍यास सांगून न्‍याहाळले आणि विचारले, ‘‘तुला काही त्रास होत आहे का ?’’ त्‍या वेळी मला त्रास जाणवत नसल्‍याने मी त्‍यांना ‘नाही’, असे सांगितले. त्‍यानंतर त्‍यांनी मला ‘तुझ्‍या डोळ्‍यांना काही त्रास जाणवतो का ?’, असे विचारले. त्‍यावर मी त्‍यांना ‘नाही’, असे सांगितले.

१ आ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितल्‍याप्रमाणे साधिकेने सद़्‍गुरु डॉ. गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारून ते करणे : एका सप्‍ताहानंतर श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी एका साधिकेकडून मला ‘सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना नामजपादी उपाय विचार आणि ते सांगतील, तसे उपाय कर’, असा निरोप पाठवला. त्‍यानुसार मी सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी सांगितल्‍याप्रमाणे २ आठवडे नामजपादी उपाय केले. त्‍यानंतर मी सद़्‍गुरु काकांना विचारले, ‘‘मी आणखी उपाय करायला हवेत का ?’’ तेव्‍हा सद़्‍गुरु काकांनी मला ‘आता उपायांची आवश्‍यकता नाही’, असे सांगितलेे.

१ इ. लाकडी पलंगाचे टोक लागून डोळ्‍याच्‍या जवळ व्रण होणे आणि ‘देवाच्‍या कृपेने डोळा वाचला’, हे लक्षात येऊन कृतज्ञता व्‍यक्‍त होणे : दुसर्‍या दिवशी रात्री १०.३० वाजता मी आणि माझी बहीण सौ. श्रद्धाताई (सौ. श्रद्धा निंबाळकर) खोलीतील काही सामान काढत होतोे. त्‍या वेळी मला केसांना लावायचा ‘बो’ खाली पडलेला दिसला. तो उचलण्‍यासाठी मी खाली वाकले. त्‍या वेळी लाकडी पलंगाचे टोक माझ्‍या डाव्‍या डोळ्‍याला जोरात लागले. ‘ते टोक माझ्‍या डोळ्‍यातच घुसले आहे’, अशा प्रकारे मला वेदना होत होत्‍या. थोड्या वेळाने मी डोळ्‍यांवरील हात बाजूला करून पाहिले. तेव्‍हा डोळ्‍याच्‍या कडेला डोळ्‍यापासून २ मि.मी. अंतरावर मला जखम झाली होती. त्‍या ठिकाणची साधारण ६ मि.मी. त्‍वचा फाटून रक्‍ताची धार खाली हनुवटीपर्यंत आली होती. त्‍या वेळी माझ्‍या मनात विचार आला, ‘माझ्‍या डोळ्‍यालाच लागले असते; परंतु देवाच्‍या कृपेने डोळ्‍याच्‍या कडेला लागून माझा डोळा वाचला.’ तेव्‍हा माझ्‍याकडून देवाच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

कु. मेघा चव्हाण

१ ई. ‘साधिकेच्‍या डोळ्‍यांना त्रास होईल’, याची जाणीव श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना आधीच झाली असल्‍याने त्‍यांनी साधिकेला आधीपासूनच उपाय करण्‍यास सांगितले’, हे तिच्‍या लक्षात येणे : सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांना याविषयी सांगितल्‍यावर त्‍यांनी मला ‘डोळ्‍यांवर पुष्‍कळ त्रासदायक आवरण आले आहे’, असे सांगून नामजपादी उपाय करण्‍यास सांगितले. नामजपादी उपाय करत असतांना माझ्‍या लक्षात आले, ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला ‘डोळ्‍यांना काही त्रास होत आहे का ?’, असे विचारले होते, तसेच नामजपादी उपायही करण्‍यास सांगितले होते. त्‍यावरून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना ‘माझ्‍या डोळ्‍यांना त्रास होईल’, याची जाणीव आधीच झाली असल्‍याने त्‍यांनी ‘मला अधिक त्रास होऊ नये’, यासाठी आधीपासूनच नामजपादी उपाय करण्‍यास सांगितले होते.’

दुसर्‍या दिवशी, म्‍हणजे ७.५.२०२० या दिवशी दुपारपर्यंत माझ्‍या डोळ्‍याजवळील व्रण भरत आलेला दिसला. एरव्‍ही व्रण भरून येण्‍यासाठी ३ – ४ दिवस लागतात; परंतु एका दिवसातच व्रण भरून आला होता. इतरांना माझ्‍या डोळ्‍याला काही लागले असल्‍याचे लक्षातही येत नव्‍हते.’

२. साधिकेने थकवा आल्‍याचे मनातून सांगूनही ते श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍यापर्यंत पोचून त्‍यांनी स्‍थुलातून आध्‍यात्मिक उपाय सांगणे

२ अ. साधिकेने थकवा आल्‍याचे मनातून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना सांगणे, त्‍यानंतर त्‍यांनी उपायांचे पाणी पाठवणे आणि त्‍या पाण्‍याने उपाय केल्‍यावर साधिकेला बरे वाटणे : ‘१.५.२०२० या दिवशी मला पुष्‍कळ थकवा आला होता आणि माझे पाय पुष्‍कळ दुखत होते. त्‍यामुळे मला एक तातडीची सेवा करता येत नव्‍हती; म्‍हणून मी मनातून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांना याविषयी सांगितले. त्‍यानंतर काही वेळातच एक साधिका श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी पाठवलेले उपायांचे पाणी (टीप १) घेऊन माझ्‍याकडे आली. तेव्‍हा माझ्‍या लक्षात आले, ‘आपल्‍या मनातील विचार गुरु जाणतात आणि ते विचार त्‍यांच्‍यापर्यंत पोचतात, तसेच त्‍याची प्रचीतीही गुरु देत असतात.’ त्‍या वेळी माझी भावजागृती होऊन माझ्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू येऊ लागले. त्‍यानंतर मी तत्‍परतेने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी पाठवलेल्‍या पाण्‍याने आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय केले आणि मला बरे वाटले.

या अनुभूतीतून ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांची सूक्ष्मातील जाणण्‍याची क्षमता आणि गुरूंची सर्वज्ञता’, यांची प्रचीती देवाने मला दिली.

टीप १ – उपायांचे पाणी : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांच्‍यातील स्‍पर्शामुळे हे पाणी चैतन्‍यमय झालेले असते. तीव्र आध्‍यात्मिक त्रास असणार्‍या साधकांनी हे पाणी उपायांसाठी वापरल्‍याने त्‍यांचा आध्‍यात्मिक त्रास न्‍यून होतो; म्‍हणून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ साधकांसाठी हे पाणी थोडे पाठवतात. साधक उपायांसाठी दिलेल्‍या या पाण्‍यामध्‍ये गरम पाणी घालतात आणि त्‍यात स्‍वतःचे पाय बुडवून २० मिनिटे नामजप करतात.

२ आ. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी रात्री उपायांचे पाणी पाठवणे आणि सकाळी पाय अन् पाठ दुखत असतांना त्‍या पाण्‍याने उपाय केल्‍यावर त्‍वरित बरे वाटणे : त्‍यानंतर ४ दिवसांनी रात्री श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी मला पुन्‍हा उपायांसाठी पाणी पाठवले. त्‍या वेळी माझ्‍या मनात विचार आला, ‘आता मला उपायांची आवश्‍यकता नसल्‍याने हे पाणी वाईट शक्‍तींचा त्रास असणार्‍या अन्‍य साधकांना देऊया.’ याविषयी मी पाणी घेऊन आलेल्‍या साधिकेला विचारले. त्‍या वेळी ती साधिका म्‍हणाली, ‘‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी हे पाणी तुला देण्‍यास सांगितले आहे.’’ त्‍यामुळे मी ते पाणी उपायांसाठी माझ्‍या जवळ ठेवले.

दुसर्‍या दिवशी सकाळी माझे पाय आणि पाठ पुष्‍कळ दुखू लागले. माझा वैयक्‍तिक आवरण्‍याचा वेग मंदावला होता. त्‍यामुळे मी प्रथम श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) सिंगबाळ यांनी पाठवलेल्‍या पाण्‍याने उपाय केले. त्‍यानंतर मला पटकन आवरता आले.

– कु. मेघा चव्‍हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२३.५.२०२०)

व्‍यक्‍तीने साधनेला प्रारंभ केल्‍यानंतर तिच्‍यातील चैतन्‍यात वाढ होणे, आध्‍यात्मिक पातळी वाढणे, आदींसमवेत त्‍या व्‍यक्‍तीची सूक्ष्मातील जाणण्‍याची क्षमताही वाढते. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधनेत विहंगम मार्गाने प्रगती करतांना त्‍यांच्‍यात सूक्ष्मातील जाणण्‍याची क्षमताही निर्माण झाली. समोरच्‍या व्‍यक्‍तीने काहीही न सांगता त्‍याची स्‍थिती ओळखणे, साधक समोर नसतांनाही त्‍याला आध्‍यात्मिक त्रास होत असल्‍याचे जाणवल्‍यामुळे त्‍याची विचारपूस करणे आणि संबंधित साधक किंवा साधिकेला खरोखरच आध्‍यात्मिक त्रास होत असणे, आदी अनुभूतींच्‍या माध्‍यमातून साधक श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्‍यातील सूक्ष्मातील जाणण्‍याच्‍या क्षमतेची प्रचीती घेत असतात. त्‍याचबरोबर साधकाने त्‍याला होत असलेल्‍या त्रासाविषयी सूक्ष्मातून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितल्‍यावर काही वेळाने त्रास न्‍यून होत असल्‍याची अनुभूतीही साधकांनी घेतली आहे. साधकांना अशा प्रकारच्‍या अनुभूती पूर्वी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्‍यावर किंवा त्‍यांना आत्‍मनिवेदन केल्‍यावर येत असत.

‘‘देव सद़्‍गुरूंच्‍या माध्‍यमांतून मला साहाय्‍य करण्‍यास तत्‍पर आहे. देवा, माझ्‍यातील श्रद्धा आणि भाव वाढव, तूच माझ्‍याकडून अपेक्षित असे प्रयत्न करवून घे !’’

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक