पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्यात बालवयातच असलेली प्रगल्भता आणि इतरांचा विचार करण्याची वृत्ती !

१. साधिकेने पू. वामन राजंदेकर यांना चॉकलेट दिल्यावर त्यांनी साधिकेला ‘आजी, मी घरी गेल्यावर खाऊ का ?’, असे विचारणे

पू. वामन राजंदेकर

‘मार्च २०२३ मध्ये एकदा मी रात्री दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करून निवासस्थानी जाण्यासाठी गाडीकडे जात होते. तेवढ्यात माझे लक्ष पू. वामन राजंदेकर यांच्याकडे गेले. मी त्यांना नमस्कार करून विचारले, ‘‘चॉकलेट खाणार का ?’’ त्या वेळी ते मंद हसून म्हणाले, ‘‘हो चालेल.’’ मी ‘पर्स’मधून चॉकलेट काढून त्यांच्या हातात दिले. तेव्हा त्यांनी हसून हळूच विचारले, ‘‘आजी, मी घरी गेल्यावर खाऊ का ?’’ मी ‘हो’ असे म्हणून पुढे गेले.

२. पू. वामन यांच्या वडिलांनी ‘पू. वामन यांना ‘कॉफी चॉकलेट’ मनापासून आवडत नाही; म्हणून त्यांनी ‘घरी जाऊन खातो’, असे सांगितले आणि ते आम्हाला चॉकलेट देतील’, असे सांगणे

सौ. स्नेहल गांधी

काही अंतरावर पू. वामन यांचे वडील (श्री. अनिरुद्ध राजंदेकर, आध्यात्मिक पातळी ६० टक्के) उभे होते. त्यांना मी आमच्यात (माझ्यात आणि पू. वामन यांच्यात) झालेल्या संवादाविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘कसले चॉकलेट आहे ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘कॉफी बाईट.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘पू. वामन यांना ‘कॉफी चॉकलेट’ मनापासून आवडत नाही; म्हणून ते ‘घरी जाऊन खातो’’, असे म्हणाले. आता पू. वामन ते चॉकलेट आम्हालाच देतील.’’

३. पू. वामन यांनी ‘त्यांना कॉफी चॉकलेट आवडत नाही’, याची साधिकेला जराही जाणीव होऊ न देणे आणि ‘साधिकेला आनंद व्हावा’, यासाठी प्रसंग सहजतेने हाताळणे

त्यांचे बोलणे ऐकून मला पुष्कळ आश्‍चर्य वाटले. पू. वामन यांनी ‘त्यांना कॉफी चॉकलेट आवडत नाही’, याची मला जराही जाणीव होऊ दिली नाही. त्यांनी ‘हे चॉकलेट मला आवडत नाही’, असे सांगितले असते, तर त्यांना द्यायला माझ्याकडे दुसरे चॉकलेट अथवा अन्य काही खाऊ नव्हता. ‘माझ्या आनंदासाठी त्यांनी हा प्रसंग किती सहजतेने हाताळला !’, याचे मला पुष्कळ कौतुक वाटलेे.

४. तेव्हा मला वाटले, ‘बालसंत वयाने पुष्कळ लहान असले, तरी ते किती प्रगल्भ असतात आणि इतरांचा विचार करू शकतात’, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.’

– सौ. स्नेहल संतोष गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.९.२०२३)