१. पू. वामन राजंदेकर यांच्या घरी मानसरित्या जाऊन त्यांच्या चरणांशी बसणे आणि त्यांना त्रासाविषयी काहीही न सांगता त्यांनी नामजप करण्यास सांगणे
‘२ – ३ दिवसांपासून काहीही खाल्ले, तरी मला छातीत जळजळण्याचा त्रास होत होता. ७.३.२०२३ या दिवशी त्यावर उपचार म्हणून मी ‘प्राणशक्तीवहन उपचारपद्धती’ने आध्यात्मिक उपाय शोधत होते. हे उपाय शोधत असतांना मी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांच्या घरी मानसरित्या गेले आणि त्यांच्या चरणांशी जाऊन बसले. तिथे बसल्यावर त्यांनी मला त्यांच्या उजव्या हाताची ३ बोटे दाखवून ‘नारायण, नारायण’ असा नामजप ३ घंटे करण्यास सांगितला. ते मला म्हणाले, ‘एवढे केले की, सर्व ठीक होईल.’ मी त्यांना मला होत असलेल्या त्रासाविषयी सांगितले नव्हते, तरीही त्यांनी मला हा नामजप करण्यास सांगितला.
२. पू. वामन यांनी तिला गुुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगणे
माझा अनुमाने २ घंटे जप झाला. त्यानंतर मी पू. वामन यांच्याकडे पाहिले. तेव्हा ते आसंदीतच बसले होते. त्यांनी एक पळी आणि भांडे घेतले. त्यांनी मला त्या पळीने २ वेळा तीर्थ पिण्यास दिले. मी त्यांना विचारले, ‘तुम्ही एवढा वेळ इथेच बसला आहात. तुम्हाला गोड खाऊ देऊ का ?’ तेव्हा त्यांनी मला आंब्याची वडी देण्यास सांगितले. त्यांना वडी दिल्यावर मी कृतज्ञताभावाने पुन्हा राहिलेला १ घंटा नामजप केला. नामजपाचा ३ घंट्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मी त्यांना विचारले, ‘तुम्ही माझ्यावर एवढे उपाय केले, मी तुमच्याप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करू ?’ त्यावर पू. वामन मला म्हणाले, ‘नारायणांप्रती (‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती) कृतज्ञता व्यक्त करा.’ त्याप्रमाणे मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. वामन यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
३. पू. वामन यांनी सूक्ष्मातून नामजप करण्यास सांगून साधिकेवर उपाय केल्यावर तिचा शारीरिक त्रास दूर होणे
ही अनुभूती आल्यावर जेव्हा मी दुपारी जेवायला बसले, तेव्हा ३ दिवसांपासून मला होत असलेला छातीत जळजळण्याचा त्रास बंद झाला. पू. वामन यांनी सूक्ष्मातून सांगितलेल्या उपायांमुळे माझा त्रास दूर झाला. या अनुभूतीद्वारे पू. वामन यांची सर्वज्ञता, अहंशून्यता आणि गुरुदेवांप्रतीचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा) भाव मला शिकायला मिळाला.
‘सच्चिदानंद परब्रह्म प्रीतीस्वरूप गुरुराया, ‘आपल्या कृपेमुळेच पू. वामन यांनी माझा शारीरिक त्रास न्यून होण्यासाठी माझ्यावर सूक्ष्मातून उपाय केले आणि मला एवढी मोठी अनुभूती दिली’, त्याबद्दल मी आपल्या अन् पू. वामन यांच्या चरणी कृतज्ञतापुष्पे अर्पण करते.’
– श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (वय ७३ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (८.३.२०२३)
|