‘आरोग्यप्राप्तीकरता केवळ औषधे घेणे एवढेच महत्त्वाचे नसून औषधे घेण्याच्या पद्धतीवरसुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतात. कोणत्याही पॅथीची औषधे घेतांना ती अत्यंत विश्वासाने, श्रद्धेने आणि सकारात्मक मनस्थितीने घेणे आवश्यक असते.
वेद आणि पुराण यांमध्ये या संबंधीचे संदर्भ सापडतात. त्यांपैकीच एक दाल्भ्य ऋषि यांचा संदर्भ आहे. त्यांनी औषध घेतांना पुढील मंत्र म्हणण्यास सांगितला आहे.
अच्युतानन्तगोविन्दनामोच्चारणभेषजात् ।
नश्यन्ति सकला रोगाः सत्यं सत्यं वदाम्यहम् ॥
– नारदपुराण, पूर्वखण्ड, अध्याय ३४, श्लोक ६१
अर्थ : अच्युत, अनंत, गोविंद इत्यादी नामरूपी औषधांनी सर्व रोग नष्ट होतात, हे मी सत्यच बोलतो आहे.
या मंत्रात भगवान श्रीविष्णु यांची ‘अच्युत’, ‘अनंत’ आणि ‘गोविंद’ ही नावे आलेली आहेत. या नावांचे केवळ उच्चारण हेच औषध आहे आणि यामुळे सर्व रोगांचा नाश होतो, हे अटल सत्य आहे. मंत्र हे विचाररूपी औषधाचे कार्य करतात. मंत्रोच्चाराने जी ऊर्जा कार्यरत होते, ती शरिरातील रोग अथवा वेदना यांचे शमन करण्यास साहाय्यक ठरते. शरिरातील या सर्वांचे मूळ केंद्रस्थान मेंदू आहे. मंत्रांतील सकारात्मक उच्चारांनी आपल्या मेंदूकडून शरिराला चांगल्या सूचना मिळतात.
त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे, ‘औषध घेण्यापूर्वी आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करावे. शक्य असेल, तेव्हा वरील ३ नावांचे उच्चारण करावे आणि मग औषध घ्यावे.’ असे करून त्याच औषधाचे अधिक चांगले परिणाम शरिराला मिळवून द्यावेत आणि आरोग्य संपन्न व्हावे !’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (१४.१.२०२३)
(इ-मेल : [email protected])