‘कवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराविषयी प्रशासनाची अनास्था !
मुंबई, ३१ ऑगस्ट (वार्ता.) – ‘कवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार देण्याविषयीच्या सरकारी यंत्रणांच्या उदासीनतेचे आणखी काही प्रकार उघड झाले आहेत. या पुरस्काराच्या निवडीसाठी सरकारने नेमलेल्या छाननी आणि निवड समित्यांच्या बैठका मागील दीड वर्षात झालेल्याच नाहीत, अशी माहिती दैनिक ‘सनातन प्रभात’ला प्राप्त झाली आहे. या समित्यांच्या बैठकांच्या अभावी पुरस्कारासाठी विज्ञापन देणे, आलेल्या अर्जांची पडताळणी करणे आणि पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींची निवड करणे, या प्रक्रिया खोळंबल्या आहेत. वर्ष २०२१ मध्ये वर्ष २०१५ ते २०२० या ६ वर्षांचे पुरस्कार एकदम देण्याचा सोपस्कार पार पाडल्यानंतर पुढील पुरस्कारासाठी बैठकाच घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे वर्ष २०२३ मधील ‘संस्कृतदिन’ होऊन गेल्यानंतरही वर्ष २०२१ आणि २०२२ या दोन वर्षांचे पुरस्कार देण्यात आलेले नाहीत. छाननी समितीच्या अध्यक्षपदी कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु, तर निवड समितीच्या अध्यक्षपदी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री आहेत.
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे यावर्षीही संस्कृतदिनी देण्यात येणार नाही ‘कवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ !
https://t.co/f5WSg1UBAdप्रशासनाने पुरस्कारासाठी नावेही मागवली नाहीत !
— THE CYBER COBRA (24x7x365 MEDIA ) (@eCyberCobra) August 30, 2023
ही आहे पुरस्कारप्रक्रियेची समयमर्यादा !
‘प्रत्येक वर्षाच्या १ एप्रिलपर्यंत या पुरस्कारासाठी विज्ञापन द्यावे. ३० एप्रिलपर्यंत अर्ज करण्यात यावेत. १५ मेपर्यंत अर्जांची पडताळणी आणि १५ जुलैपर्यंत उच्च अणि तंत्र शिक्षणमंत्र्यांनी पुरस्कारार्थींची (ज्यांना पुरस्कार मिळणार आहे, त्यांच्या नावांची) घोषणा करावी’, असा शासनाचा आदेश आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने ‘कवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार समितीच्या पदाधिकार्यांना संपर्क केला असता त्यांनी कुलगुरूंची निवड झाली नसल्यामुळे बैठका झाल्या नसल्याचे सांगितले. ‘पुरस्काराच्या विलंबाविषयी बोलतांना मागील पुरस्कारासाठी झालेला १८ लाख रुपयांचा व्यय सरकारकडून अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे विश्वविद्यालयाला स्वत:च्या पदरचे पैसे व्यय करावे लागतात. पुरस्कार प्रदान करण्यासाठी अनेकदा मंत्र्यांची वेळ उपलब्ध होत नाही’, अशा अडचणी समितीच्या पदाधिकार्यांनी सांगितल्या.
पुरस्कार संस्कृतदिनी दिले जात नसल्याचे उपसंचालकांनाच ठाऊक नाही !
‘कवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराची प्रशासकीय कार्यवाही सरकारच्या उच्च शिक्षण विभागाकडून केली जाते. कार्यवाहीची माहिती घेण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने सरकारच्या उच्च शिक्षण विभागाचे उपसंचालक नितीन बच्छाव यांच्याशी दूरभाषद्वारे संपर्क साधला असता त्यांना ‘किती वर्षांचे पुरस्कार द्यायचे शेष आहेत ?’, हे ठाऊक नसल्याचे दिसून आले. यासह वर्ष २०२१ मध्ये संस्कृतदिनाच्या दिवशीच पुरस्कार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात पुरस्कार चालू झाल्यापासून एकदाही हा पुरस्कार संस्कृतदिनाच्या दिवशी देण्यात आलेला नाही.