वर्धा येथे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनाचे आयोजन !
वर्धा, २० ऑगस्ट (वार्ता.)- एखाद्या नियतकालिकाने २५ वर्षे वाटचाल करणे, ही मोठी गोष्ट आहे. हिंदु धर्मावर अनेक आघात होत आहेत. नवीन पिढी विज्ञानवादी आहे. त्यामुळे ती धर्मापासून लांब जात आहे. अध्यात्मात चैतन्य असून त्यात खरा आनंद मिळतो. त्यामुळे विज्ञानासमवेत अध्यात्मही आवश्यक आहे. विज्ञान आणि ज्ञान यांचे संतुलन केले, तर व्यक्ती सुशिक्षित होईल. हे आध्यात्मिक ज्ञान नवीन पिढीला देण्याचे कार्य साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ करत आहे. हिंदु धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी ‘सनातन प्रभात’चे योगदान मोठे आहे. त्यामुळे ते सनातन धर्माचे खरे मुखपत्र आहे, असे विचार चिमूर येथील रामदिघी मंदिराचे विश्वस्त तथा साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. हनुमंत कारेकर यांनी व्यक्त केले. १९ ऑगस्ट या दिवशी येथे साप्ताहित ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर आणि सनातन प्रभातच्या प्रतिनिधी सौ. भार्गवी क्षीरसागर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचा प्रारंभ श्री गणेशाचा श्लोक आणि दीपप्रज्वलन यांनी झाला. वेदमंत्रपठणानंतर मान्यवरांच्या हस्ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी वाचकांनी त्यांचे मनोगत उत्स्फूर्तपणे व्यक्त केले. या कार्यक्रमाला साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक, विज्ञापनदाते आणि हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. भक्ती चौधरी यांनी केले.
देशभर हिंदु राष्ट्राची लाट निर्माण करण्यात ‘सनातन प्रभात’चे मोठ योगदान ! – श्रीकांत पिसोळकर, विदर्भ समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून गेली २५ वर्षे अव्याहतपणे कार्यरत आहे. ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांची बाजू मांडतो. त्याने एका धर्मयोद्ध्याप्रमाणे समाजात वैचारिक क्रांती निर्माण केली आहे. त्यामुळे देशभर हिंदु राष्ट्राची लाट निर्माण होत आहे. ‘सनातन प्रभात’ सत्य मांडत असल्याने ते परखड वाटते. तीच श्रीकृष्णाची वाणी आहे. काळानुसार ती योग्य आहे. सनातन प्रभातमधून हिंदुत्वाचे कार्य करणार्यांना योग्य दृष्टीकोन मिळतो. त्यामुळे ते हिंदुत्वनिष्ठांचेही मुखपत्र आहे.
सनातन प्रभात हे राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी कृतीप्रवण करणारे वृत्तपत्र ! – सौ. भार्गवी क्षीरसागर, प्रतिनिधी, सनातन प्रभात
‘हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध’ हे साप्ताहिक सनातन प्रभातचे ब्रीदवाक्य आहे. आजपासून २५ वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ असा शब्द उच्चारणे, हा जणू अघोषित गुन्हा होता. अशा काळात ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द समाजमनात रूढ करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ने केले आहे. समाजाला काय आवडते ? त्यापेक्षा त्याला काय आवश्यक आहे ? हे देण्याचा ‘सनातन प्रभात’चा प्रयत्न असतो. त्यामुळे केवळ वाचकसंख्या जमवणे नाही, तर कृतीशीलता हा ‘सनातन प्रभात’चा उद्देश आहे. त्यानुसार २५ वर्षांत अनेक वाचकांनी साधना आरंभली असून कित्येकांनी राष्ट्र-धर्मकार्यात कृतीशील सहभाग घेतला आहे.