कळंगुट (गोवा) येथील क्लबमधील युवतीने तिच्याशी गैरवर्तन करणार्‍या पोलीस अधिकार्‍याच्या थोबाडीत मारले !

युवतीशी गैरवर्तन करणार्‍या पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

युवतीशी गैरवर्तन करणार्‍या पोलीस अधिकार्‍यावर कारवाई

पणजी, ९ ऑगस्ट (वार्ता.) – कळंगुट येथील एका क्लबमध्ये मौजमजा करण्यासाठी गेलेल्या गोवा पोलिसातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने तेथील एका युवतीशी गैरवर्तन केले. यानंतर युवतीने सर्वांसमक्ष संबंधित पोलीस अधिकार्‍याच्या थोबाडीत लगावल्याची घटना ७ ऑगस्ट या दिवशी घडली. मिळालेल्या माहितीनुसार या पोलीस अधिकार्‍याचे नाव ए. कोन असे आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार क्लबमध्ये संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने नृत्य करणार्‍या एका युवतीशी गैरवर्तन केले आणि यामुळे संतापलेल्या युवतीने पोलीस अधिकार्‍याच्या थोबाडीत मारले. त्या युवतीला संबंधित व्यक्ती वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे ठाऊक नव्हते; मात्र नंतर कुणीतरी तिला ते पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले.

पोलीस अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

‘गोवा फॉरवर्ड’चे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत हा विषय ९ ऑगस्टला मांडला. यावर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कळंगुट येथील क्लबमध्ये युवतीशी गैरवर्तन करणारा ‘आय.पी.एस्.’ (भारतीय पोलीस दलातील) अधिकारी असून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सभागृहात आश्वासन दिले. आमदार विजय सरदेसाई यांनी संबंधित अधिकारी पोलीस उपमहानिरीक्षक पदावर असल्याचे सभागृहात सांगितले.

पोलीस उपमहानिरीक्षक ए. कोन यांचे अधिकार घटवले

गोवा सरकारने राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक ए. कोन यांचे अधिकार घटवले आहेत.

पोलीस उपमहानिरीक्षक ए. कोन यांच्याकडील गुन्हे आणि ‘रेंज’ हे विभाग काढून घेण्यात आले आहेत आणि त्यांना पोलीस महानिरीक्षकांना आढावा देण्यास सांगण्यात आले आहे. कळंगुट येथील एका क्लबमध्ये एका युवतीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून सरकारने हा निर्णय घेतला आहे.

संपादकीय भूमिका

जनतेचे रक्षक कि भक्षक पोलीस ? क्लबमध्ये जाऊन युवतीशी गैरवर्तन करणार्‍या पोलिसांकडून सामान्य युवती आणि महिला यांच्या रक्षणाची अपेक्षा कशी करणार ?