चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन हाकत असल्याचे उघड : अपघाताचे गोवा विधानसभेत पडसाद

बाणस्तारी येथील अपघातात मर्सिडिज गाडीच्या धडकेमुळे तिघे ठार झाल्याचे प्रकरण

‘मर्सिडिज’ या चारचाकी वाहनाने २ ‘आल्टो’ चारचाकी वाहने, १ ‘स्विफ्ट’ चारचाकी वाहन आणि २ दुचाकी यांना दिली धडक !

पणजी, ७ ऑगस्ट (वार्ता.) – फोंडा येथून पणजीच्या दिशेने येतांना बाणस्तारी पुलाजवळ ६ ऑगस्टच्या रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघांच्या मृत्यूला उत्तरदायी असलेला ‘मर्सिडिज’ वाहनाचा चालक श्रीपाद उपाख्य परेश सिनाय सावर्डेकर (वय ४८ वर्षे) याला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कह्यात घेण्यात आले. वाहन चालवतांना तो दारूच्या नशेत होता, हे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले आहे. संशयित चालक श्रीपाद उपाख्य परेश सिनाय सावर्डेकर याने जामिनासाठी अर्ज केला आहे.

फोंडा-पणजी महामार्गावर बाणस्तारी येथील पुलावर ६ ऑगस्ट या दिवशी रात्री ‘मर्सिडिज’ या चारचाकी वाहनाने २ ‘आल्टो’ चारचाकी वाहने, १ ‘स्विफ्ट’ चारचाकी वाहन आणि २ दुचाकी यांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दिवाडी येथील सुरेश फडते (वय ५८ वर्षे) आणि त्यांची पत्नी भावना फडते (वय ५२ वर्षे), तसेच उंडिर, बांदीवडे येथील अनुप कर्माकर (वय २६ वर्षे) हे तिघे जण ठार झाले.

या अपघातात वनिता भंडारी (वय २१ वर्षे, रहाणार्‍या सांताक्रूझ, फोंडा), शंकर हळर्णकर (वय ६७ वर्षे, रहाणारे बाणस्तारी), राज माजगावकर (वय २७ वर्षे, रहाणारा ताळगाव) हे गंभीररित्या घायाळ झाले, तर अन्य ३ जणही घायाळ झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. ‘मर्सिडिज’ वाहनामध्ये दारूच्या बाटल्याही सापडल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित होते. ‘मर्सिडिज’ वाहनचालकाला कह्यात घ्या आणि वाहनाच्या मालकाला घटनास्थळी आणा’, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली. शेवटी पोलिसांनी वाहनचालकाला कह्यात घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.

संशयित परेश सिनाय सावर्डेकर याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

म्हार्दाेळ पोलिसांनी या भीषण अपघाताच्या प्रकरणी संशयित परेश सिनाय सावर्डेकर याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, सार्वजनिक मार्गावर निष्काळजीपणे वाहन हाकणे, वैयक्तिक आणि दुसर्‍याची सुरक्षितता धोक्यात आणणे, तसेच मोटार वाहन कायद्याखाली मद्यप्राशन करून वाहन चालवणे या आरोपांखाली गुन्हा नोंदवला आहे.

चालकाविषयी बनवाबनवीचा प्रयत्न

‘मर्सिडिज’ वाहनाच्या मालकाकडे वाहनचालक या नात्याने कामाला असलेला चालक म्हार्दाेळ पोलीस ठाण्यात ‘अपघाताच्या वेळी मी वाहन चालवत होतो’, असे सांगत म्हार्दाेळ पोलीस ठाण्यात उपस्थित झाला; मात्र अपघात पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी हा चालक नसल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ‘पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली तुला कह्यात घेतो’, असे संबंधित वाहनचालकाला सांगितल्यानंतर त्याने पोलिसांसमोर सत्य उघड केले. यानंतर जुने गोवे येथे नातेवाईकांच्या घरी असलेला संशयित परेश सिनाय सावर्डेकर पोलिसांना शरण आला.

(सौजन्य : gomantak)

परेश सिनाय सावर्डेकर याला आतापर्यंत ७ वेळा दंड ठोठावला; पण त्याने एकदाही दंड भरला नाही !

संशयित श्रीपाद उपाख्य परेश सिनाय सावर्डेकर याच्या ‘अल्कोहोल’ चाचणीत ९४ मिलीग्रॅम मद्य आढळले (१०० मिली लिटर रक्तामध्ये ३० मिलीग्रॅमहून अधिक मद्य आढळ्यास कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होते). पोलिसांच्या मते अतीवेगाने वाहन हाकल्याच्या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी आतापर्यंत ७ वेळा दंड ठोठावला आहे; मात्र आरोपीने एकदाही दंड भरलेला नाही. वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी ‘पोलिसांनी दबावाखाली काम करू नये आणि घटनेतून सत्य समोर आणावे’, असे आवाहन गोवा पोलिसांना केले आहे.

अधिक कठोर कारवाई होण्यासाठी मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करणार ! – वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो

जीवघेण्या अपघातात संशयितावर अधिक कठोर कारवाई होण्यासाठी मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहन हाकणे, निष्काळजीपणे वाहन हाकणे, हे प्रकार दुसर्‍याची हत्या करण्यासारखे आहे. असे वाहनचालक हे रस्त्यावरील ‘बाँब’ आहेत. यापुढे संशयित आरोपीला मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला मृत्यू पावलेली व्यक्ती त्याच्या उर्वरित जीवनात जेवढे पैसे कमावू शकली असती, तेवढे पैसे देण्यास भाग पाडले जाणार आहे. या दृष्टीने कायद्यात पालट करण्याचा विचार आहे. यासाठी सुरक्षा मंडळाकडून सूचना घेण्यात येणार आहे.

अपघाताचे विधानसभेत पडसाद !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

बाणस्तारी येथील भीषण अपघाताचे पडसाद ७ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत शून्य प्रहराच्या वेळी हे सूत्र उपस्थित केले. यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘मद्यप्राशन करून वाहन चालवणार्‍यांवर पोलीस कारवाई करत आहेत; मात्र प्रत्येक वाहन अडवून चाचणी करणे अशक्य आहे. यासाठी प्रत्येक वाहनचालकाने स्वतःचे दायित्व ओळखून वाहन हाकावे.’’