देशातील सर्व मंदिरांचे एकत्रीकरण देशाला समृद्ध बनवू शकते ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

वाराणसीमध्ये ३० देशांच्या १ सहस्र ६०० मंदिरांच्या पदाधिकार्‍यांचे महासंमेलन !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथे २२ जुलैपासून ३० देशांतील १ सहस्र ६०० मंदिरांच्या पदाधिकार्‍यांचे महासंमेलनास आरंभ झाला. येथील ‘रुद्राक्ष कन्व्हेशन सेंटर’मध्ये हे महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी याचे उद्घाटन केले. ‘मंदिरांतून शिक्षण, संस्कार, सेवाभाव आणि प्रेरणा मिळाली पाहिजे. तेथे लोकांचे दुःख दूर करण्याची व्यवस्था असायला हवी. सर्व समाजाची चिंता करणारा मंदिरात असला पाहिजे. देशातील सर्व मंदिरांचे एकत्रीकरण समाजाला जोडू शकते, देशाला समृद्ध बनवू शकते’, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. या वेळी केंद्रीय मंत्री श्री. अश्‍विनी कुमार चौबे हेही उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान मोदी यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. ‘सर्व मंदिरे एकत्र आली, तर ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ हे स्वप्न साकार करू शकतात’, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या संमेलनाला तिरुपती मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए.व्ही. धर्मा रेड्डी, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज, तसेच इस्कॉन मंदिराचे गौरांग दास प्रभु आणि विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे हे मार्गदर्शन करणार आहेत.

प.पू. सरसंघचालकांनी त्यांच्या मार्गदर्शनात मांडलेली सूत्रे

१. मंदिरे ही आपल्या परंपरेचे अविभाज्य अंग आहे. संपूर्ण समाजाला एका ध्येयाने पुढे घेऊन जाण्यासाठी मठ आणि मंदिरे यांची आवश्यकता आहे.

२. मंदिरांना नव्या पिढीने संभाळायला हवे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे.

३. मंदिर पावित्र्याचा आधार आहे. त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. गुरुद्वारामध्ये जाण्यापूर्वी हात-पाय धुवावे लागतात; मात्र मंदिरात तसे केले जात नाही. आपल्याला मंदिराच्या स्वच्छतेसाठी हे सर्व केले पाहिजे.

४. आपल्याला गल्लीतील लहान मंदिरांचीही सूची बनवली पाहिजे. तेथे प्रतिदिन पूजा होईल आणि स्वच्छता ठेवली जाईल, असे पाहिले पाहिजे. आपण सर्व मिळून याचे आयोजन करूया.

५. मंदिर भक्तांच्या आधारे चालतात. मंदिरांत पूर्वी गुरुकल चालत होते. कथा, प्रवचन आणि पुरण यांद्वारे नवीन पिढी शिक्षित होत होती.

संपादकीय भूमिका

मंदिरांचे सरकारीकरण रहित करून ती भक्तांच्या नियंत्रणात देण्याची मागणी या महासंमेलनातून केली पाहिजे, तसेच प्रत्येक मंदिरांत हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्याची व्यवस्था केली पाहिजे !