सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. त्या सोहळ्यात सनातनच्या वक्त्यांनी ‘संवैधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचा संकल्प करा’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर मान्यवरांनी त्यांचे विचार मांडले. या वेळी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, तसेच फ्लेक्स आणि सनातनचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

दादर

श्री ईश्वरप्रसाद खंडेलवाल

गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी कार्यरत व्हा ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

 सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असल्याचे सांगितल्याने ती होणारच आहे. गुरूंवर निष्ठा ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी कार्यरत व्हावे. त्यासाठी साधना करावी. साधनेच्या बळावरच भारताला हिंदु राष्ट्र करता येईल. महर्षि व्यास यांनी ४ वेद, भगवद्गीता आणि महाभारत यांचे लिखाण केले, त्याप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अनेक ग्रंथांचे लिखाण केले आहे. सनातनचे हे ग्रंथ साधनेसाठी मार्गदर्शक आहेत.

ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भावोद्गार !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट होण्यापूर्वी मीही समाजातील लोकांप्रमाणे घरगृहस्थीमध्ये व्यस्त होतो. जेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी माझी भेट झाली, तेव्हा त्यांनी मनुष्यजन्माचा खरा उद्देश माझ्या लक्षात आणून दिला. त्यांच्या भेटीनंतर माझे जीवन आनंदमय झाले. जोपर्यंत गुरूंची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत जीवन अपूर्ण आहे. भगवंताची कृपा होते, तेव्हाच असे गुरु लाभतात. गुरु म्हणजे साक्षात् ईश्वराचे रूप असते.


कामोठे

हिंदूंच्या प्रत्येक मुलाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! – संतोष वर्तक

हिंदूंवर होणारे आघात, हिंदूंची दुर्दशा, हिंदु महिलांवरील अत्याचार रोखायचे असतील, तर हिंदु राष्ट्रच हवे आणि त्यासाठी समाजात जागृती करायला हवी. हिंदूंच्या प्रत्येक घरातील मुलांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.


जोगेश्वरी

हिंदूंनी पाल्यांवर धर्माचे संस्कार करावेत ! – अधिवक्ता मधुसूदन द्विवेदी, सामाजिक कार्यकर्ते

हिंदु धर्म वगळता सर्व धर्मांतील पालक त्यांच्या पाल्यांना लहानपणापासून त्यांच्या प्रार्थनास्थळांत घेऊन जातात. त्यांच्यावर स्वधर्माचे संस्कार करतात. हिंदु धर्मात असे होत नाही. त्यामुळे हिंदूंची दुर्दशा झाली आहे. पुढारलेल्या देशांतील सुशिक्षित लोकही सप्ताहातून एक दिवस आपल्या पाल्यांना त्यांच्या प्रार्थनास्थळात घेऊन जातात. हिंदूंनीही आपल्या पाल्यांना सप्ताहातून किमान एक दिवस मंदिरात घेऊन जायला हवे. कपाळावर टिळा लावायला हवा, स्वधर्माचे ज्ञान द्यायला हवे.


नवीन पनवेल

हिंदूंनी आपल्या मुलांना धर्माचे ज्ञान द्यायला हवे ! – मोतीलाल जैन, अध्यक्ष, महाराष्ट्र मंदिर संघ

हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्यासाठी काही ठिकाणी मुसलमानांकडून त्या परिसरात मजारी बांधल्या गेल्या आहेत. त्या हटवण्यासाठी हिंदूंना न्यायालयीन लढा द्यावा लागत आहे. हिंदूंनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवायला हवे. ऑनलाईन खेळांच्या माध्यमातून हिंदु मुलांचे ‘ब्रेनवॉश’ करून त्यांचे धर्मांतर केले जात आहे. लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत. हे थांबवण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना आपल्या धर्माचे ज्ञान द्यावे.


डोंबिवली (पूर्व)

श्री दुर्गेश परुळकर

मानवी जन्माचे सार्थक करण्यासाठी साधना अपरिहार्य ! – दुर्गेश परुळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

भाग्याने मिळालेल्या मानवी जन्माचे सार्थक करण्यासाठी प्रत्येकाने साधना करायला हवी. संतांच्या मार्गदर्शनानुसार कृती करायला हवी. आपण साधना करतो, तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास येतो. वाणी आणि बुद्धी यांत तेज येते. अन्यायाचा प्रतिकार करण्याची आणि त्याविरोधात लढण्याची शक्तीही साधनेमुळेच येते. धर्माची संस्थापना करण्यासाठी आपल्याला ईश्वराला अभिप्रेत असे राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करावे लागेल. हे कार्य करण्याची शक्ती केवळ आणि केवळ साधनेमुळेच मिळू शकते.


कर्जत

प्रत्येक मंदिरात वस्त्रसंहिता लागू व्हावी ! – विनायक उपाध्ये, अध्यक्ष, श्री गणपति मंदिर, कडाव, ता. कर्जत

हिंदु धर्मावर आजवर अनेक संकटे आली; मात्र हिंदु धर्म आजही टिकून आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या मंदिरांतील प्रथा परंपरा आणि हिंदु धर्मशास्त्र ! धर्मशास्त्राविषयी अनभिज्ञ असल्यामुळे आज हिंदूंकडून अयोग्य कृती होतात. मंदिरांत वस्त्रसंहिता लागू करण्यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीने सर्व मंदिरांना संघटित करून केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे.


रसायनी

आई तुळजाभवानीने दिलेल्या आशीर्वादरूपी तलवारीने छत्रपती शिवरायांकडून हिंदवी स्वराज्याची स्थापना ! – ह.भ.प. सुरेश महाराज पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांना पंढरीचा पांडुरंग आणि आई तुळजाभवानी यांच्याकडून शक्ती मिळते; म्हणून अफझलखानाने पांडुरंगाच्या आणि तुळजाभवानी देवीच्या मंदिरावर आक्रमण केले. देवीची मूर्ती तोडून तिचे तुकडे केले. अफझलखान म्हणाला, ‘‘मी देवाचा नाश केला, आता यांचा देव छत्रपती शिवाजी महाराजांना कसे साहाय्य करतो, ते मी बघतो.’’

श्री भवानीमातेने तलवारीचा अवतार धारण करून ती शिवरायांच्या हातात प्रगट झाली. त्यांनी तलवारीच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.


उरण

हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, हे आमचे स्वप्न ! – ह.भ.प. नंदकुमार कर्वेगुरुजी, ज्येष्ठ कीर्तनकार

सनातन हिंदु धर्म हा सृष्टीच्या निर्मितीपासून आहे; मात्र सध्या जगात एकही हिंदु राष्ट्र नाही. आज हिंदूंची अवस्था अत्यंत बिकट आहे, हिंदु धर्मावर अनेक प्रकारची आक्रमणे होत आहेत, त्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, हे आमचे स्वप्न आहे.

ह.भ.प. नंदकुमार कर्वेगुरुजी यांनी काढलेले गौरवोद्गार !

आज हिंदु राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केवळ सनातन संस्थाच करत आहे. तोच एक आशेचा किरण आहे. मी सर्व कीर्तनकारांना एकत्र करतो. आमच्यासाठी एक शिबीर घ्या. आमच्याकडूनही हिंदु राष्ट्र स्थापनेचा विचार समाजापर्यंत जायला हवा. आम्ही सर्वजणही काळानुसार सेवा करू.


अलिबाग

प्रत्येक हिंदूने धर्माचरण करावे ! – रायगड भूषण डॉ. रोहिदास शेळके, माजी अध्यक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन

हिंदु धर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना करून ईश्वरप्राप्ती करण्याची व्यवस्था आहे. गुरु-शिष्य परंपरा म्हणजे आपल्या धर्माने आपल्याला दिलेली अनमोल देणगी आहे. हिंदु धर्मातील वेद-उपनिषदे, १८ पुराणे, रामायण, महाभारत यांतील केवळ एका ग्रंथाचा अभ्यास करून त्यानुसार आचरण केले, तरी आपण ईश्वरप्राप्ती करू शकतो, इतके हिंदु धर्माचे महत्त्व आहे. आपल्या दोन पिढ्या आधी आपले समस्त हिंदू बांधव धर्माचरण करत होते. त्यामुळे ते आनंदी आहेत. आज आपल्यालाही धर्माचरणाची नितांत आवश्यकता आहे.


नंदुरबार

नंदुरबार येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता प्रियदर्शन महाजन यांनी मार्गदर्शनात मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम, तसेच धर्मकार्य करत असतांना प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान असावे, याविषयी मार्गदर्शन केले.

उपस्थित मान्यवर – सानपाडा येथील गुरुपौर्णिमेला ऐरोली विधानसभेचे भाजपचे आमदार श्री. संदीप नाईक उपस्थित होते.

गुरुपौर्णिमा सोहळ्यात शालेय परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


कराड येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भावूपर्ण वातावरणात साजरा !

कराड, ४ जुलै (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने येथील कार्वे नाक्यावरील श्री अष्टविनायक मंगल कार्यालयात गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा लाभ कराड आणि पंचक्रोशीतील ३०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.

साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी घटनात्मक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र आवश्यक आहे. काळानुसार हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करणे, ही आपली साधनाच आहे. त्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने समस्त हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प करूया, असे आवाहन वक्त्या सौ. रूपा महाडिक यांनी केले. या वेळी गोरक्षण बचाव समितीचे अध्यक्ष श्री. सुनील पावसकर, शिवसेनेचे श्री. काकासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


६ भाषांमध्ये ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’ !

या वर्षी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, मल्याळम् आणि तेलुगु या ६ भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवही पार पडले. या माध्यमांतून देश-विदेशांतील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ घेतला.