हिंदु संस्‍कृतीलाअपकीर्त करण्‍याचे षड्‌यंत्र !

नुकताच एक समलैंगिक विवाह हिंदु वैदिक धर्मातील रितीरिवाजाप्रमाणे पार पडल्‍याचा व्‍हिडिओ प्रसारित झाला. नववधूचा पोषाख केलेला; परंतु दाढी असलेला मुलगा पहातांना अगदीच विचित्र आणि किळसवाणे वाटत होते. विवाह हा हिंदु धर्मातील १६ संस्‍कारांपैकी एक असलेला अत्‍यंत महत्त्वाचा धार्मिक संस्‍कार आहे. अग्‍नि, देवता, ब्राह्मण आणि कुटुंबीय यांच्‍या साक्षीने आयुष्‍यभराच्‍या धर्मबंधनात अडकण्‍याचा तो एक पवित्र क्षण आहे. स्‍त्री-पुरुषांच्‍या अनिर्बंध लैंगिक संबंधांना सुविहित आदर्श समाजव्‍यवस्‍थेत अडकवण्‍याचा तो धार्मिक संस्‍कार आहे. आदर्श पिढीला जन्‍म देऊन समाज आणि राष्‍ट्र यांची उन्‍नती करणे, हा या विधीचा मुख्‍य उद्देश आहे. हिंदु धर्मात विवाह हा ‘सोहळा’ असतो.

समलैंगिकता ही संकल्‍पनाच मुळात कुठल्‍याही संस्‍कृतीच्‍या दृष्‍टीने विपरित आणि अनैसर्गिक असतांना धार्मिक संस्‍कारांसह त्‍यांचा विवाह करणे हे ‘विवाह’ या संस्‍काराचा घोर अवमान करणारे आहे. जो विवाहच धर्माला मान्‍य नाही, त्‍यासाठी विधी करून काय उपयोग ? ‘समलैंगिकता’ ही पाश्‍चात्त्य विकृती भारतात प्रस्‍थापित करण्‍याचे हे एक प्रकारचे षड्‌यंत्रच नव्‍हे ना ? ‘हा सनातन वैदिक परंपरा विकृत, भ्रष्‍ट करण्‍याचा प्रयत्नच नव्‍हे का ?’, असा प्रश्‍न विचारून एका फेसबुक वापरकर्त्‍याने या समस्‍येला वाचा फोडली आहे. समलैंगिकांमधील अनैसर्गिक वर्तनाला विवाहासारख्‍या पवित्र शब्‍दाशी जोडून हिंदु संस्‍कृतीला अपकीर्त करण्‍याचे हे एक षड्‌यंत्रच आहे.

समलैंगिक ‘विवाह’ हाच शब्‍द का वापरला जातो ? समलैंगिक ‘निकाह’, ‘शादी’ किंवा ‘वेडिंग’ असा शब्‍द का वापरला जात नाही ? ‘गूगल’वरही ‘समलैंगिक विवाह’ असे शोधल्‍यास हिंदु धार्मिक विवाहाचीच छायाचित्रे दिसतात. जी गोष्‍ट धर्माला मान्‍य नाही, ती दाखवून धर्म आणि संस्‍कृती यांची अपकीर्ती केली जात आहे. त्‍यामुळे जागृत हिंदूंंनी सामाजिक माध्‍यमांतून हिंदु संस्‍कृतीला अपकीर्त करणार्‍यांना वैध मार्गाने विरोध करायला हवा. तसेच हिंदूंना धर्मशिक्षणाच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या धार्मिक विधींचा अर्थ समजावून सांगणेही महत्त्वाचे आहे. धर्माविषयी अभिमान असेल आणि त्‍याची महानता लक्षात आली असेल, तर जागरूक हिंदू अशा धर्माचा अवमान करणार्‍या अशा अनैसर्गिक गोष्‍टींना नक्‍कीच योग्‍य प्रकारे अन् वैध मार्गाने विरोध करतील !