विविध सोहळ्यांत होणार्‍या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हातांच्या बोटांच्या मुद्रेची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यांतून घडणारे कार्य

विविध सोहळ्यांत परात्पर गुरु डॉक्टरांच्या हातांच्या बोटांची एक विशिष्ट मुद्रा होते. (टीप : वर छायाचित्र दिले आहे.) तिचे आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि त्यातून होणारे कार्य पुढे दिले आहे. या मुद्रेला ‘भुवन मुद्रा’, ‘लोक मुद्रा’ किंवा ‘असीम मुद्रा’, असे म्हणतात.

१३ जुलै २०२२ या दिवशी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सप्तर्षींच्या आज्ञेने साधकांना श्री दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले. त्या सोहळ्यात त्यांच्या हातांची झालेली नमस्कारासारखी मुद्रा

१. ‘भुवन मुद्रा’ आणि ‘लोक मुद्रा’

परात्पर गुरु डॉक्टरांच्या मुद्रेतून ‘भुवन’ म्हणजे स्थूल आणि सूक्ष्मातील लोकांविषयीचे कार्य घडते. त्याला ‘भुवन मुद्रा’ आणि ‘लोक मुद्रा’, असे म्हणतात.

१ अ. असीम मुद्रा : ‘असीम’ चा अर्थ अमर्याद होतो. परात्पर गुरु डॉक्टरांच्या हाताच्या बोटांच्या मुद्रेचा परिणाम पृथ्वीलोकाच्या वरील आणि त्या खालील सूक्ष्म लोकांत होत असतो. त्यामुळे या मुद्रेला ‘असीम मुद्रा’, अशी उपमा आहे.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुद्रेचा स्वतःवर होणारा परिणाम

परात्पर गुरु डॉक्टरांची नेहमी निर्विचार अवस्था असते. त्यांच्या मनात साधक किंवा समष्टी कार्यापुरते विचार येतात आणि त्यानंतर त्यांची परत निर्विचार स्थिती असते. त्यांनी विविध सोहळ्यांत मुद्रा केल्याने त्यांच्या बाह्य जगाविषयी काही प्रमाणात असलेल्या जाणिवा संपतात आणि त्यांची आंतरिक स्थिती आणखी सूक्ष्म होते.

श्री. राम होनप

३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या मुद्रेतून टप्प्याटप्याने घडणारे कार्य

अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी दोन्ही हातांची पाचही बोटे एकमेकांना जुळवून डोळे बंद केल्यावर त्यांच्यातील ‘चंद्रनाडी’ आणि ‘सूर्यनाडी’ यांचे कार्य मंदावते आणि ‘सुषुम्ना नाडी’चे कार्य वाढते.

आ. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांच्या गाढ ध्यानावस्थेला आरंभ होतो. त्यांना ‘गाढ निद्रा’, ‘दिव्य निद्रा’ किंवा एकात्म अवस्था’ प्राप्त होते. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि ईश्वर’ यांच्यात एकरूपता वाढलेली असते. त्याला ‘एकात्म अवस्था’, असे म्हटले आहे.

इ. एकात्म अवस्थेतून त्यांच्या निर्गुण स्थितीत वाढ होते.

ई. परिणामी परात्पर गुरु डॉक्टरांच्या माध्यमातून वातावरणात प्रक्षेपित होत असलेल्या ईश्वरी तत्त्वाचे प्रमाण आणखी वाढते. त्याचा समष्टीला लाभ होतो. याचे विश्लेषण पुढे दिले आहे.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘भुवन मुद्रे’चा सूक्ष्म लोकांवरील परिणाम

परात्पर गुरु डॉक्टरांची विविध सोहळ्यांत प्रामुख्याने ‘भुवन मुद्रा’ (टीप : वर छायाचित्र दिले आहे.) असते. त्याचा ‘सूक्ष्म लोकांवर परिणाम कसा होतो ?’ त्याचे विश्लेषण पुढे दिले आहे.

४ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी दोन्ही हातांचे अंगठे एकमेकांना जोडल्याचा सूक्ष्मातील परिणाम

४ अ १. भुवर्लाेक : परात्पर गुरु डॉक्टरांनी दोन्ही हातांचे अंगठे एकमेकांना जोडल्यावर त्यांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य उर्ध्व दिशेने प्रक्षेपित होते. त्यामुळे  भुवर्लाेकातील चांगल्या शक्तींना दैवी ऊर्जा प्राप्त होते, काही अतृप्त आत्म्यांना पुढील गती मिळण्यास बळ मिळते आणि चैतन्यामुळे वाईट भुतांना अग्नीने भाजल्याप्रमाणे वेदना होतात. त्यातून त्यांची काळी शक्ती काही प्रमाणात न्यून होते.

४ अ २. स्वर्गलोक : परात्पर गुरु डॉक्टरांच्या मुद्रेतून प्रक्षेपित होत असलेल्या चैतन्याने स्वर्गलोकात साधना करणार्‍या जिवांच्या आनंदात वाढ होते आणि त्यांना साधनेसाठी आणखी ऊर्जा प्राप्त होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांचा सोहळा स्वर्गलोकातून काही देव आणि अप्सरा उत्सुकतेने पहात असतात.

४ अ ३. महर्लाेक आणि जनलोक : येथील काही जिवांना साधनेसाठी आणखी ऊर्जा प्राप्त होते.

४ अ ३ अ. परात्पर गुरु डॉक्टरांची दोन्ही हातांची ‘तर्जनी’, ‘मध्यमा’ आणि ‘अनामिका’ एकमेकांना जोडल्याचा सूक्ष्मातील परिणाम : परात्पर गुरु डॉक्टरांच्या दोन्ही हातांची ‘तर्जनी’, ‘मध्यमा’ आणि ‘अनामिका’ यांतून अनुक्रमे ‘वायु’, ‘तेज’ आणि ‘आप’ या तत्त्वांचे प्रक्षेपण होते. त्यातून तत्त्वांचे ‘त्रिमिश्रण’, म्हणजेच एकत्रीकरण होते आणि यांतून सिद्ध झालेल्या ईश्वरी शक्तीचा परिणाम सप्तपाताळांतील वाईट शक्तींवर पुढीलप्रमाणे होतो.

४ अ ३ आ. सप्तपाताळांतील वाईट शक्तींवर होणारा परिणाम

१. सप्तपाताळांतील वाईट शक्तींनी साधनेने जमवलेली काळी शक्ती काही प्रमाणात न्यून होते.

२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या हाताच्या बोटांतून विविध दैवी शस्त्र-अस्त्रांची निर्मिती होते आणि त्यांचा मारा बलाढ्य वाईट शक्तींवर होतो. त्यामुळे त्यांचा जोर काही काळ न्यून होतो.

३. वाईट शक्तींना काही काळ स्वतःकडील आसुरी विद्यांचा विसर पडतो. परिणामी त्यांच्या वाईट कार्याला खीळ बसते.

४ आ. परात्पर गुरु डॉक्टरांची दोन्ही हातांची करंगळी एकमेकांशी जोडल्याचा सूक्ष्मातील परिणाम : या मुद्रेतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याने देश-विदेशांतील साधकांना आनंद मिळतो आणि त्यांना साधना करण्यासाठी शक्ती मिळते. या मुद्रेला ‘लीला मुद्रा’, असे म्हणतात.

४ आ १. लीला मुद्रा : साधक त्यांच्या भावानुसार परात्पर गुरु डॉक्टरांना ‘श्रीविष्णु’, ‘शिव’ आणि ‘श्रीकृष्ण’ इत्यादी रूपांमध्ये अनुभवतात. परात्पर गुरु डॉक्टरांच्या करंगळीच्या माध्यमातून निर्माण होणार्‍या चैतन्यामुळे साधकांना त्यांच्या भावानुसार परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये त्या त्या देवतांचे दर्शन होते. त्यामुळे या मुद्रेला ‘लीला मुद्रा’, असे म्हटले आहे.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.३.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.