६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली देशपांडे (वय १४ वर्षे) हिला श्रीविष्णूचा द्वापरयुगातील अवतार ‘श्रीकृष्ण’ आणि कलियुगातील अवतार ‘श्री जयंत’ यांच्यात जाणवलेले साम्य !

‘श्रीविष्णूचा द्वापरयुगातील अवतार श्रीकृष्ण आणि कलियुगातील अवतार ‘श्री जयंत’ यांच्यामध्ये असलेले साम्य गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझ्या लक्षात आले. ते येथे दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेभाव

१. पृथ्वीवर दुराचार आणि रज-तम यांमध्ये वाढ झाल्याने श्रीविष्णूने द्वापरयुगात ‘श्रीकृष्ण’ अन् कलियुगात ‘श्री जयंत’ अवतार धारण करणे

द्वापरयुगामध्ये पृथ्वीवर दुराचार आणि रज-तम यांमध्ये वाढ झाल्यामुळे श्रीविष्णूने त्याचा आठवा अवतार, म्हणजेच श्रीकृष्णावतार धारण केला. त्याचप्रमाणे आता कलियुगामध्ये कलीच्या प्रभावामुळे समाजात दुराचार आणि रज-तम यांत पुष्कळ वाढ झाली आहे. त्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधणे कठीण झाले आहे. अशा वेळी ‘सर्व समाजाला ईश्वराशी एकरूप होता येऊन मोक्षप्राप्ती व्हावी’, यासाठी आणि धर्मसंस्थापना करण्यासाठी श्रीविष्णूने ‘श्री जयंत अवतार’ धारण केला आहे.

कु. सायली देशपांडे

२. द्वापरयुगामध्ये श्रीकृष्ण आणि कलियुगात श्री जयंत, म्हणजेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सहवास लाभण्यासाठी ऋषिमुनी अन् पुण्यात्म्ये यांनी पृथ्वीवर जन्म घेणे

द्वापरयुगामध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाल्यावर अनेक ऋषिमुनी आणि पुण्यात्म्ये यांनी कृष्णाचा सहवास लाभण्यासाठी अन् अनुभवण्यासाठी पृथ्वीवर गोप-गोपींच्या रूपात जन्म घेतला. त्याचप्रमाणे श्री जयंत अवतारामध्ये प.पू. गुरुमाऊलींच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) सहवासात राहून त्यांच्या छत्रछायेखाली साधना आणि सेवा करण्यासाठी विविध पुण्यात्मे अन् दैवी जीव यांनी पृथ्वीवर मनुष्यरूपात जन्म घेतला आहे.

३. द्वापरयुगामध्ये श्रीकृष्णाने आणि कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना विष्णुलोकाची अनुभूती घेण्याची संधी देणे

श्रीकृष्णाने पृथ्वीतलावर वृंदावन, गोकुळ, मथुरा आणि द्वारका अशा विविध ठिकाणी त्याच्या लीला करून तेथील लोकांना विष्णुलोकाचा अनुभव दिला. त्याचप्रमाणे परम पूज्यांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) विविध आश्रमांची स्थापना करून सर्व साधकांना भूवैकुंठ असलेल्या आश्रमांत राहून विष्णुलोकाची अनुभूती घेण्याची संधी दिली आहे.

४. श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्ती अन् वस्तू यांचा उद्धार होणे

श्रीविष्णूने त्याच्या कृष्ण अवतारामध्ये अनेक लीला केल्या. श्रीकृष्णाने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा विविध लीलांच्या माध्यमातून उद्धार केला. त्या प्रत्येक जिवाला त्याने मुक्त केले. त्याचप्रमाणे श्री जयंत अवतारामध्ये परम पूज्य त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला साधना सांगत आहेत. सर्वांना साधना सांगण्यासाठीच त्यांनी ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली आहे. या संस्थेमध्ये सहस्रोंच्या संख्येने साधक साधना करत आहेत. परम पूज्य त्यांना मोक्षप्राप्ती करून देऊन त्यांचा उद्धार करणार आहेत.

प.पू. गुरुमाऊलींच्या नित्य वापरात असलेल्या किंवा त्यांच्या संपर्कात येणार्‍या वस्तूंचाही ते उद्धार करत आहेत, उदा. त्यांच्या वापरातील वस्तूंचे रंग पालटतात. त्या वस्तूंमध्ये होणार्‍या पालटांच्या माध्यमातून त्या वस्तूंचाही उद्धार होतो.

५. श्रीकृष्णाच्या लीलांमधून आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या साधकांशी गमतीशीर बोलण्यातून साधकांना त्यांची अपार प्रीती अन् आनंद अनुभवता येणे

श्रीकृष्ण सतत गोपींच्या खोड्या काढत असे. तो गोपींची लोण्याची मडकी फोडत असे. तो त्याच्या गोपमित्रांच्या समवेत गोपींच्या घरातील लोणी चोरून खात असे. या सर्व लीलांच्या माध्यमातून तो सर्वांना आनंद अनुभवण्यास देत असे. यातून गोपींना श्रीकृष्णाची प्रीतीही अनुभवता आली. गुरुदेवही (परात्पर गुरु डॉ. आठवले हेही) त्यांना भेटणार्‍या साधकांशी गमतीशीर बोलून त्या साधकाला पुष्कळ आनंद देतात. त्यातून साधकांना गुरुदेवांची अपार प्रीती अनुभवता येते.

६. द्वापरयुगामध्ये श्रीकृष्णाने दुष्ट शक्तींचा नाश करणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले हेही कलियुगात समाजाला साधना शिकवून स्वभावदोष आणि अहं रूपी दुष्प्रवृत्तीचा नाश करत असणे

श्रीकृष्णाने द्वापरयुगामध्ये जन्म घेऊन पृथ्वीवरील सर्व दुर्जन, दुष्टशक्ती आणि राक्षस यांचा नाश केला. काळानुसार स्वभावदोष आणि अहं रूपी दुष्टशक्ती कलियुगात सर्वांमध्येच आहेत. त्यांचा नाश करण्यासाठी साधना हा एकच उपाय आहे. प.पू. गुरुदेवही (परात्पर गुरु डॉ. आठवले हेही) समाजाला साधना सांगून त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं रूपी दुष्प्रवृत्तींचा नाश करायला शिकवत आहेत.

– कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२२)