‘डॉक्टर, आमचे आताच लग्न झाले आहे. खरेतर आम्हाला कमीत कमी १ वर्ष मूल नको; पण घरच्यांनी आम्हाला काही गर्भनिरोधक वापरायचे नाही, असे निक्षून सांगितले आहे ! काय करावे, काही कळत नाही.’ चिकित्सालयामध्ये अशा प्रकारचे गार्हाणे माझ्या कानावर नेहमी येत असते. विशेष म्हणजे ही समस्या समाजातील सर्व तरुण-तरुणींसमोर आहे. लग्न झाल्या झाल्या, ‘बघ हं, गोळ्या घेऊ नकोस ! त्या अमकीने मोठ्यांचे न ऐकता गोळ्या घेतल्या आणि आता ३ वर्षे झाली, दिवस रहात नाहीत !’, हाही एक हमखास संवाद असतो. नवीन लग्न झालेल्या आधीच कावर्या बावर्या झालेल्या मुलीला जवळजवळ भीतीच घातली जाते.
१. गर्भनिरोधक गोळ्यांविषयीचे अपसमज आणि तिचे काही लाभ
खरेतर वंशसातत्य (continuation of species) ही माणसातील सर्वांत प्रबळ भावना आहे. मुलाचे अथवा मुलीचे लग्न करतांना नकळतच प्रत्येक पालक आपल्या नातवाची अथवा नातीची वाट पहात असतो. त्यातून नव्या पिढीवर लवकरात लवकर गरोदरपणाची सक्ती केली जाते. असुरक्षित ऐनवेळी घेण्याच्या गोळ्यांपेक्षा गर्भनिरोधक गोळ्या पुष्कळच सुरक्षित असतात. प्रत्येक नवविवाहित जोडप्याला आम्ही या गोळ्या घेण्याविषयी सल्ला देतो. या गोळ्या फक्त अल्पवयातील मधुमेह, वाढलेला रक्तदाब, अतीलठ्ठपणा अशा काही प्रकरणांमध्ये देता येत नाहीत; पण या गर्भनिरोधक गोळ्यांविषयी लोकांमध्ये पुष्कळच अपसमज आहेत आणि कारण नसतांना त्याविषयी नवविवाहित जोडप्यांच्या मनात भीती घातली जाते.
या गोळ्यांमुळे स्त्रीची पाळी अनियमित असेल, तर तीही नियमित होते. गोळ्या नियमित घेतल्यास चुकून गर्भधारणा होण्याची शक्यता जवळपास नसतेच. त्यामुळे जोडप्याचे लैंगिक आयुष्यही अधिक निकोप रहाते. पाळी नियमित झाल्यामुळे गोळ्या थांबवल्यावर गर्भधारणाही लगेच होते. काही मुलींना चेहर्यावर अधिक प्रमाणात मुरूम वा फोड येत असतील, तर तेही या गोळ्यांमुळे पुष्कळ न्यून होतात. अशी खरेतर बहुगुणी गोळी आहे ही…
२. गर्भनिरोधक गोळ्या वैद्यकीय सल्ल्याने घेणे महत्त्वाचे !
पूर्वीच्या काळात काही स्त्रियांनी ‘माला डी’, ‘माला एन्’ या सरकारकडून विनामूल्य मिळणार्या गोळ्या कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याखेरीज, कोणत्याही वयात, कोणत्याही प्रमाणात (डोसमध्ये) घेतल्या. परिणामी साहजिकच काही महिलांना त्रास झाला आणि मग त्याचा डांगोरा पिटून या गोळ्या अपकीर्त करण्यात आल्या. आता सरकारी गोळ्याही पुष्कळ अल्प डोसच्या आणि उत्तम दर्जाच्या उपलब्ध आहेत. फक्त त्या चालू करण्याआधी एकदा स्त्रीरोगतज्ञांना जरूर भेटावे. भारतीय स्त्रियांची जनुकीयता लक्षात घेता आम्ही पुष्कळ अधिक वर्षे या गोळ्या घेण्याचा सल्ला देत नाही.
३. तरुण पिढीनेही तारतम्य बाळगून गर्भधारणेसाठी सुवर्ण समन्वय साधायला हवा !
आज काल नवरा-बायको दोघांनीही आपल्या करिअरसाठी पुष्कळ कष्ट घेतलेले असतात. कधी परदेशी जायची संधी, तर कधी बढती (प्रमोशन) मिळणार असते. अशा वेळी अनियोजित गर्भधारणेमुळे (unplanned pregnancy) त्यांचे जीवन पार विस्कटून जाते. वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. यातून उत्तम मार्ग म्हणजे परिणामकारक गर्भनिरोधक गोळ्या घेणे आवश्यक असते; कारण ‘कंडोम’पेक्षा ते अधिक श्रेयस्कर आणि सुरक्षित आहे. तसेच हवे तेव्हा व्यवस्थित नियोजन करून गर्भधारणा करता येऊ शकते. अर्थात् या सगळ्या गोष्टींसह तरुण पिढीनेही तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. योग्य वय येताच आणि अधिक वय वाढू न देता मूल होऊ देणे, हेही शहाणपणाचेच आहे. विदेशी संस्कृतीप्रमाणे वयाच्या ३० व्या वर्षांनंतर मुलाचा विचार करणे भारतीय मनाला आणि शरिरालाही हिताचे नाही, असे करण्यात गरोदर आणि बाळंतपणात गुंतागुंत होऊ शकते. तेव्हा तरुण आणि जुनी पिढी यांचा ‘वंशवेल उमलतांना’ सुवर्ण समन्वय साधला गेला, तरच याविषयीची समस्या उलगडू शकते, असे मला वाटते.’
– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्वतज्ञ, कोथरूड, पुणे. (१.६.२०२३)
(साभार : फेसबुक)
स्त्रियांची प्रसुती रजा १ वर्षाची करावी का ?प्रत्यक्षात महिलांना ६ मासांहून अधिक रजेची तितकी आवश्यकता नसते. ६ मासांहून अधिक रजा दिली गेल्यास महिलांसाठी असणार्या नोकरीच्या संधींवर त्याचा परिणाम होऊ शकतो की, जे महिलांना परवडणारे नाही. त्यामुळे नोकरीच्या संधीच उपलब्ध झाल्या नाहीत, तर प्रसुती रजा देऊन उपयोगच काय ? त्यामुळे ६ मासांची रजा पुरेशी आहे. अगदीच वाटले, तर महिला बर्याचदा पुढे २ ते ३ मास ही रजा वाढवून घेतातही; पण सरसकट तसा नियम करणे म्हणावे तितके रास्त होणार नाही. जितकी अधिक दिवस सुट्टी असेल, त्या काळात महिलांची करिअरमधील कौशल्य शिकण्याची, काम करण्याची इच्छाशक्ती हे सगळेच न्यून होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारे रजेचा कालावधी वाढवण्याची आवश्यकता नाही. – डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी (२८.५.२०२३) (साभार : फेसबुक) |