१६ जून २०२३ या दिवशीपासून श्री रामनाथ देवस्थान, गोवा येथे चालू झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…
‘भारत देशाला ‘भारतमाता’ असे संबोधले जाते. जगातील दुसर्या कोणताही देश देशाला ‘माता’ असे संबोधन करत नाहीत. आपण कधी ऐकले का, चीन माता की जय ? अमेरिका माता की जय ! परंतु जेव्हा भारत देशाचा जयघोष केला जातो, तेव्हा मोठ्या अभिमानाने छाती फुगवून म्हटले जाते, ‘भारतमाता की जय !’ परंतु दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की, आपल्या देशाची गौरवगाथा आज आमच्या मुलांना ऐकवली जात नाही; उलट आमच्या मुलांना सांगितले की, ज्या ज्या कला, विद्या आपण शिकलो आहोत, त्या आपण सर्व इंग्रज भारतात आल्यानंतरच शिकलो आहोत.
मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीचा एवढा परिणाम भारतियांमध्ये भिनला आहे की, आम्ही देहाने जरी हिंदु असलो; परंतु आमची बुद्धी मात्र इंग्रजाळलेली आहे. भारताचा भूतकाळ अत्यंत गौरवशाली आहे आणि तो आपण जाणून घेतला पाहिजे. जर आपण दक्षिण भारतातील मंदिरे पाहिली, आमच्या पुराणकालीन मंदिरांना पाहिले, तर लक्षात येईल की, ती आपण सहस्रो वर्षांपूर्वी बांधली आहेत. मदुराईचे (तमिळनाडू) मीनाक्षी मंदिर, खजुराहोची पौराणिक मंदिरे, रामेश्वरम्चे मंदिर, कैलास मंदिर, अशी अगणित मंदिरे आहेत की, जी सहस्रो वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहेत. ती मंदिरे बांधणारे प्राचीन भारतीय लोक उत्तम अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) ज्ञान कसे जाणत असतील ? त्या काळी त्यांनी एवढी प्रचंड मंदिरे कशी निर्माण केली असतील ? एवढे मोठमोठे खडक एकावर ठेवण्यासाठी कोणती ‘क्रेन’ तेव्हा असेल ? त्या काळी एवढ्या मोठ्या शिळा वर कशा चढवल्या असतील ? एवढे उंच मंदिराचे बांधकाम कसे केले जात असेल ? सहस्रो वर्षांनंतरही शेकडो प्राचीन मंदिरे जशीच्या तशी उभी आहेत. अशा मंदिरांची निर्मिती कशी केली जाते ? हे विदेशातील लोकांना अद्यापही ठाऊक नाही; परंतु आपल्या भारतीय लोकांना ते ज्ञान अतीप्राचीन काळापासून ज्ञात होते. आमची मंदिरे आमची श्रद्धा, प्रेरणा आणि चैतन्य देणारे केंद्र आहे अन् अशा आमच्या श्रद्धा केंद्रांवर परकीय आक्रमकांकडून कठोर प्रहार करण्यात आले. आक्रमकांनी ५ लाखांहून अधिक मंदिरे तोडली, ही आपल्यासाठी अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे.
‘हिंंदु जनजागृति समिती’ मंदिर संरक्षणाची सेना बनवण्याचे कार्य करत आहे ! – सुश्री रामप्रियाश्रीजी (माई) अवघड
मंदिरे उभारली पाहिजेत, ती पुष्कळ भव्य व्हायला पाहिजेत; पण मला असे वाटते की, नवीन मंदिरे उभारण्याच्या ऐवजी प्रथम जी प्राचीन पुरातन मंदिरे आहेत, त्यांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. पुष्कळ भव्य मंदिर उभारायचे असेल, तर त्यांच्या रक्षणासाठी सेनाही उभी करायला पाहिजे. मंदिर संरक्षणाची ती सेना बनवण्याचे कार्य ‘हिंंदु जनजागृति समिती’ करत आहे; कारण ही गोष्ट अत्यंत आवश्यक आणि अनिवार्य आहे. त्यानंतरच मंदिरांची निर्मिती करायला पाहिजे.
१. हिंदु मंदिरांची निर्मिती करण्यामागील कारणे
आज अनेक जण मंदिरांच्या व्यवस्थापनाविषयी चिंतन करत आहेत. आपण पुरातन काळापासून हिंदु मंदिरांची निर्मिती का करतो ? मंदिरांच्या निर्मितीचा कोणता उद्देश आहे ? मंदिरांचे संरक्षण करणे अनिवार्य का आहे ? आमचे संत, राजे-महाराजे यांनी भव्य मंदिरांची निर्मिती का केली ? याचा उल्लेख राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ‘ग्रामगीते’मध्ये केला आहे. ते म्हणतात,
सामुदायिकतेचे साधन । गावाच्या आनंदाचे स्थान ।
मंदिर म्हणजे पाठशाळा । चाले शिक्षणाचा सोहळा ॥
जागवावी गाव संस्कृति । वाढवावे लोकप्रतिनिधी ।
याची केंद्रे म्हणुनी होती । मठमंदिरे सर्व ही ॥
सर्वांभूति प्रेमभाव । वाढवावा गुणगौरव ।
याचसाठी गावोगावी । मंदिर केली निर्माण ॥
म्हणूनी संती । घातला पाया । लोकी चरित्र नीती वाढाया ।
अभ्यासिकांसी एकांत द्याया मंदिरा योगे ॥
यासाठी मंदिरांची निर्मिती करण्यात आली, त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत –
अ. पहिले कारण हे होते की, ज्या स्थानावर मंदिर असते, त्याच्या आसपासचा संपूर्ण परिसर चैतन्याने भरून जातो.
आ. दुसरे कारण आहे की, लोकांना जर आपल्या स्वतःमध्ये शील आणि नीतीमत्ता वाढवायची असेल, तर त्यांना साधना करावी लागते. साधना करण्यासाठी साधकांना एकांत स्थान मिळावे, यासाठी सुद्धा आपल्या मंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे.
इ. तिसरे कारण हे होते की, लोकांना चालता फिरता सहज मंदिरे दिसली पाहिजेत. त्यामुळे मंदिरात स्थापन केलेल्या देवतांच्या मूर्ती लोकांना पहाता येतील. त्यामुळे लोक देवतांची पूजा, उपासना करता करता स्वतःच्या अंतरातील देवत्व जागृत करतील. लोकांनी तसा प्रयत्न करावा, हा यामागचा उद्देश आहे. केवळ मूर्तींची पूजा केल्यामुळे हे घडणार नाही, तर त्या मूर्तीची उपासना करता करता मूर्तीसारखी प्रतिभा प्रजाजनांंच्या अंतरात जागृत व्हावी, यासाठी संत आणि राजे-महाराजे यांनी जागोजागी मंदिरांची निर्मिती केली आहे. याच समवेत लोकांना सद़्वृत्तींचा विसर पडला, तर हीच मंदिरे त्यांना सद़्विचारांची प्रेरणा देत रहातात.
ई. आमच्या मंदिरांच्या निर्मितीचा चौथा उद्देश असाही होता की, महान विभूतींच्या पुण्यतिथी, महोत्सव या निमित्ताने लोकांना एकत्रित आणणे, त्यांना संघटित करणे आणि पुढे जाऊन त्यांना शास्त्रविद्या शिकवणे. मंदिरांच्या माध्यमातून शास्त्राची उपासना शिकवली गेली पाहिजे. मंदिर निर्मितीचा उद्देशच नेहमी हाच होता की, जेथे ‘मंदिर म्हणजे पाठशाळा । चाले शिक्षणाचा सोहळा ।’ म्हणजेच लोकांना धर्मशिक्षण देण्यासाठी मंदिरांची निर्मिती केली जात होती.
२. मंदिरांमध्ये हिंदूंचे संघटन झाल्यास सर्व मंदिरे सुरक्षित रहातील !
असे असले, तरी दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की, आज काही मंदिरांची स्थिती अशी आहे की, तेथे जेव्हा आरती केली जाते, तेव्हा टाळ, मृदुंग, झांज हे यंत्रांद्वारे वाजवण्यात येत असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी मी समाजमाध्यमावर असे एक चलचित्र (व्हिडिओ) पाहिले की, ज्यामध्येे २०-२५ लहान मुले हातात टाळ, मृदुंग, डमरू, ढोल इत्यादी घेऊन आरती करत आहेत. तेथे पुष्कळ हिंदूंची गर्दी झाली होती. येथे लक्षात घ्यावे लागेल की, जेव्हा प्रत्येक मंदिरात असे दृश्य दिसेल, त्याच वेळी सर्व मंदिरे सुरक्षित रहातील.
३. युवा वर्गाने हनुमानाच्या उपासनेस आरंभ करण्याची आवश्यकता !
आजच्या हिंदु युवकांना संघटित करण्याची आणि मंदिरांशी जोडण्याची आवश्यकता आहे. आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट ही आहे की, आम्ही अमरावतीमध्ये रहात होतो. तेथे रविनगरमध्ये एक हनुमानाचे मंदिर आहे. हनुमान ज्याला ‘वायुपुत्र’ असे म्हटले जाते आणि ‘वायु’ हा शब्द उलट केला, तर तो शब्द ‘युवा’ असा होतो. भारतातील युवा वर्गाने जर वायुपुत्राच्या उपासनेस आरंभ केला, तर पुष्कळ मोठी गोष्ट साध्य होईल. तेथे नामसंकीर्तनाच्या निमित्ताने प्रत्येक शनिवारी ‘सुंदरकाण्ड’ पठणासाठी ५० ते १०० मुले एकत्र येतात. आज आश्चर्यजनक म्हणजे सध्या तेथे ४० ते ५० सहस्र लोक एकत्र बसून हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करतात. जेव्हा भारताचा हिंदु युवावर्ग जोडला जाईल, तेव्हा अशा गोष्टी साध्य होतील. आपण हिंदु युवक आणि मुले यांना राष्ट्र-धर्म कार्यासाठी जोडून घेणे, ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.
४. हिंदु पालकांनी मुलांना मंदिरात नेण्यासाठी एक वेळ सुनिश्चित करावा !
बहुतेक हिंदु मुलांना माता-पिता असे सांगतात की, तुला अभ्यास, शाळा, शिकवणी यांसाठी तू एवढा वेळ द्यायचा आहेस; परंतु हिंदु माता-पिता मुलांना असे सांगत नाहीत की, तुला मंदिरात जाण्यासाठीही एवढा वेळ द्यायला पाहिजे. त्यामुळे मुलांना असे वाटते की, जसे अभ्यास करणे, शाळेत जाणे, शिकवणीला जाणे आवश्यक आहे, तसे मंदिरात जाणे एवढे आवश्यक नाही. त्यामुळे प्रत्येक पालकांनी ते मुलांचा जसा प्रत्येक गोष्टीसाठी ठराविक वेळ सुनिश्चित करतात, तसेच त्यांनी मुलांना मंदिरात घेऊन जाण्यासाठीही एक वेळ सुनिश्चित केली पाहिजे.
५. मुलांना परकीय आक्रमकांचा इतिहास सांगून त्यांना पराक्रमी बनवायला हवे !
आमच्या मुलांना आपल्या मंदिरांचा इतिहास माहिती असला पाहिजे. कुतूबमिनार कुणी बनवला ? ताजमहाल कुणी बांधला? हेसुद्धा आमच्या मुलांना ठाऊक आहे; परंतु सोरटी सोमनाथचे मंदिर कुणी तोडले ? एकेकाळी अत्यंत भरभराटीत असलेल्या अयोध्येला आज कुणी उजाड केले ? हे आमच्या मुलांना का ठाऊक नाही ? मंदिरे पुष्कळ भव्य उभारण्यात आली; परंतु जे सनातनी हिंदु आहेत, त्यांना सक्षम आणि पराक्रमी बनवणे, हीसुद्धा तेवढीच आवश्यक गोष्ट आहे. केवळ पुराणाचे वाचन करून हे होणार नाही, तर त्यासह त्या मुलांना पराक्रमी ही बनवले पाहिजे. आपण केवळ रामनामाचा जप करून चालणार नाही, तर त्याच्यासह रामकार्य करणारी सेनाही उभी केली पाहिजे.
६. रामनामासह रामकार्यात योगदान देण्याचे महत्त्व
आम्हाला एकांतात राहून रामनामाचा जप करणे, आपली साधना करत रहाणे, हा आपला सहज स्वभाव झाला आहे; परंतु एक दिवस कथा सांगत असतांना कथेमध्ये एक विषय आला. जेव्हा हनुमान उड्डाण करून प्रथम लंकेत पोचला, तेव्हा त्याची भेट रावणाचा भाऊ बिभीषणाशी झाली. तेव्हा बिभीषणाने अत्यंत हताश होऊन हनुमानाला विचारले ,‘‘हे हनुमान, मी एवढा रामनामाचा जप करतो; परंतु मला आजपर्यंत प्रभु रामाचे दर्शन झाले नाही. ते का झाले नाही ?’’ तेव्हा हनुमान म्हणतो, ‘‘तुम्ही रामनामाचा पुष्कळ जप केला; परंतु नीट स्मरण करून मला सांगा की, तुम्ही रामकार्यात प्रत्यक्ष किती योगदान दिले आहे ? रामनामाचा जप करणार्याने कितीही जप केला असेल; परंतु जर त्याने रामकार्यात काहीच योगदान दिले नसेल, तर त्याची भक्ती सफल होत नाही.’’ ही गोष्ट मी कधी वाचलीच नव्हती. मी कथा सांगत असतांना त्या दिवशी तो प्रसंग कदाचित् माझ्यासाठीच आला असेल आणि काही काळानंतरच माझी ‘हिंदु जनजागृती समिती’शी भेट झाली अन् त्यानंतर आम्ही कार्याशी जोडलो गेलो.
७. हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीचे संतांचे ब्रह्म वाक्य निश्चितच सत्य होणार !
शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते की, जसे संतांनी म्हटले आहे, ‘वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.’ हे वाक्य संतांनी उच्चारले आहे. हे अत्यंत अनुभवी लोकांचे कथन आहे, तर ते ब्रह्म वाक्य आहे. त्यामुळे ते निश्चितच सत्य होणार आहे.’
– सुश्री रामप्रियाश्रीजी (माई) अवघड, अध्यक्षा, रामप्रिया फाऊंडेशन, अमरावती.
संपादकीय भूमिकामंदिरे ही हिंदूंच्या धर्मशिक्षणाची आणि संघटनाची केंद्रे असल्याने त्यांचे रक्षण होणे आवश्यक ! |