१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ झाले. या पार्श्वभूमीवर ११.६.२०२२ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाचे विधीवत पूजन करण्यात आले. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
श्री. किरण दुसे, कोल्हापूर
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ धर्मध्वजाची दोरी हळूहळू ओढत होत्या. तेव्हा शंखनाद चालू झाला. त्या वेळी मला २ मिनिटे ध्यान लागल्यासारखे वाटले. मला पायाखालची भूमी हलल्यासारखी वाटली.
२. धर्मध्वजाचे पूजन झाल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी साधकांना डोळे बंद करायला सांगितले. तेव्हा मला जाणवले, ‘निसर्ग स्तब्ध झाला आहे.’
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ, उपस्थित सद़्गुरु आणि संत धर्मध्वजाकडे पहात होते. तेव्हा मला दिसले, ‘ध्वज आकाशाला भिडला आहे.’ त्या वेळी ‘मला शरिरात प्रचंड ऊर्जा जाणवून १० हत्तींचे बळ मिळाले’, असे जाणवले.’
सौ. सविता चव्हाण, कराड, जिल्हा सातारा.
१. धर्मध्वजाचे पूजन होत असतांना मंत्रोच्चार चालू झाल्यावर मला वातावरण चैतन्यमय वाटू लागले. तेथे उपस्थित असलेल्या संतांकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला अनुभवता येत होते. मला हलकेपणा जाणवून माझे मन चैतन्याशी एकरूप झाले.
२. ध्वजारोहणाच्या वेळी मला आकाशात गरुडपक्षी आणि सूर्यनारायण यांचे दर्शन झाले.
३. चंदनाचा सुगंध येणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ध्वजारोहण केल्यावर मला चंदनाचा पुष्कळ सुगंध येत होता. मला सुगंध आल्यावर माझे मन निर्विचार होऊन माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा धावा होऊ लागला.
४. ‘धर्मध्वज केवळ आश्रमातच फडकत नसून पूर्ण ब्रह्मांडात फडकत आहे’, असे मला जाणवले.
५. हा सोहळा पहात असतांना माझी गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त होऊन माझा भाव जागृत झाला.
प.पू. गुरुदेवांनी मला ‘न भूतो न भविष्यति ।’ म्हणजे ‘पूर्वी कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही ’,असा सोहळा दाखवला, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !’
(सर्व सूत्रांचा दिनांक जून २०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |