मुलांनो, स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवून आनंदी जीवनाची प्रचीती घ्या !

स्वभावदोषांची सूची करा ! नियमित ५ सूचनासत्रे करा ! चुकांसाठी शिक्षा किंवा प्रायश्चित्त घ्या !

१. व्याख्या

‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ म्हणजे स्वभावदोष दूर करण्यासाठी पद्धतशीरपणे आणि नियमित अवलंबण्याची प्रक्रिया.

२. महत्त्व

२ अ. सुखी अन् आदर्श जीवन जगता येणे : स्वभावदोषांमुळे जीवनाची अपरिमित हानी होते. जीवन दुःखी आणि निराशाजनक होते. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमुळे दोषांवर नियंत्रण येऊन गुणांचा विकास होतो; म्हणून जीवन सुखी अन् आदर्श बनते.

२ आ. अनेक स्वभावदोष असलेले व्यक्तीमत्त्व कोणाला आवडेल का ? : स्वतःतील भित्रेपणा, अबोलपणा, इतरांचा विचार न करणे यांसारखे स्वभावदोष दूर केल्यामुळे व्यक्तीमत्त्वाचा खरा विकास होतो. असे दोषरहित व्यक्तीमत्त्वच समोरील व्यक्तींवर किंवा समाजात छाप पाडू शकते.

२ इ. जीवनातील कठीण प्रसंगांना सहजपणे तोंड देता येणे : अनेक मुलांचे कठीण प्रसंगात मानसिक संतुलन बिघडते. प्रक्रियेमुळे मन एकाग्र आणि खंबीर होण्यासह विवेकबुद्धीही जागृत होते. त्यामुळे कठीण प्रसंगातही स्थिर रहाता येते.

२ ई. सध्याच्या स्पर्धात्मक युगात पुढे रहाता येणे : प्रक्रिया राबवल्याने मनाची शक्ती व्यय होत नाही. व्यक्तीच्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर होऊन स्पर्धात्मक युगात पुढे रहाता येते.

३. दोषांवर मात करण्यासाठी प्रक्रिया राबवा !

३ अ. स्वतःमधील स्वभावदोषांची सूची (यादी) बनवणे

३ अ १. उद्धटपणा, हट्टीपणा, लहरीपणा, वेळेचे पालन न करणे, दुसर्‍यांना दोष देणे, अव्यवस्थितपणा, आळस, एकाग्रता नसणे, स्वतःच्या वस्तू इतरांना न देणे, खोटे बोलणे, भित्रेपणा, चिडचिडेपणा, रागीटपणा असे दोष मुलांमध्ये असू शकतात. त्यांची सूची करून तीव्र दोष निवडा.

३ अ २. स्वतःच्या चुका शोधा !

आपल्याकडून दिवसभरात घडलेल्या चुका स्वभावदोष-निर्मूलन सारणीत लिहाव्यात. दैनंदिन व्यवहार करतांना ‘माझ्या चुका शोधायच्याच आहेत’, असा निश्चय करून सतर्कता बाळगल्यास स्वतःच्या बर्‍याच चुका लक्षात येतात. काही चुका स्वतःच्या लक्षात येत नाहीत. यासाठी आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र यांचे साहाय्य घ्या !

३ आ. ‘स्वयंसूचना’ म्हणजे काय ?

स्वतःकडून झालेली चुकीची कृती, मनातील अयोग्य विचार आणि व्यक्त झालेली किंवा मनात उमटलेली अयोग्य प्रतिक्रिया यांत पालट होऊन तेथे योग्य कृती होण्यासाठी किंवा योग्य प्रतिक्रिया निर्माण होण्यासाठी स्वतःच अंतर्मनाला योग्य सूचना द्यावी लागते, तिला ‘स्वयंसूचना’ म्हणतात. १ सूचना

५ वेळा मनात म्हणावी. अशी दिवसभरात ५ सत्रे करावीत.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !’)