भगवंताच्याही नेत्रांत अश्रू यावे, अशी भक्त आणि भगवंत यांची दिव्य भेट !

ब्रह्मोत्सव सोहळ्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांतून १० सहस्रांहून अधिक साधक आले होते. ब्रह्मोत्सवात श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचा रथ जसजसा पुढे येऊ लागला, तसे उपस्थित साधकांचा भाव अत्यंत दाटून आला. सर्वांचे हात आपोआपच जोडले गेले, तर काही साधकांना हुंदका अनावर झाला. भावाश्रूंच्या माध्यमातून भाव, भक्ती आणि शरणागती यांचा जणू अभिषेकच झाला ! 

सर्व जण डोळे भरून साक्षात् श्री महाविष्णुचेच दर्शन घेत होते. रथयात्रेत सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचेही हात पूर्णवेळ जोडलेलेच होते ! उपस्थित प्रत्येक साधकाला ते हात जोडून नमस्कार करत होते. मागच्या रांगांमध्ये बसलेल्या साधकांना दिसावे; म्हणून हात उंचावून नमस्कार करत होते ! साधकांचा भाव पाहून श्रीमन्नारायणाच्या नेत्रांतही अश्रू तरळले होते ! साधकांना पाहून त्यांचाही कंठ दाटून आला ! सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे हे पाणावलेले नेत्रच सांगतात, भक्त भगवंताच्या दर्शनाची जितक्या आतुरतेने वाट पहात असतात, तितकाच भगवंतही भक्तांच्या भेटीसाठी व्याकुळ झालेला असतो ! भगवंत भक्तांच्या बंधनात बांधलेला असतो. निर्गुणातील भेट प्रतिदिनच होत असली, तरी सगुणभेटीचा आनंदही अवर्णनीयच असतो !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या धर्मकार्यातील रथाचे महत्त्व !

प.पू. भक्तराज महाराज यांनी शिष्य डॉ. आठवले यांना आशीर्वादस्वरूप दिलेला रथ सार्वजनिक सभांच्या व्यासपिठाच्या मागे लावलेला कृष्णार्जुन रथाचा पडदा वर्ष २०२२ मधील रथोत्सवात गुरुदेव विराजमान झालेला रथ

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

वर्ष २०२२ आणि वर्ष २०२३ या दोन्ही वर्षीच्या जन्मोत्सवांच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी रथारूढ श्रीविष्णुरूपात साधकांना दर्शन दिले. या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कार्यातील विविध रथांचे मला स्मरण झाले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्यातील रथाचे महत्त्व या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

अमृत महोत्सवातील डॉ. आठवले यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांना चांदीचा श्रीकृष्णार्जुनाचा रथ देणे

‘शिष्य डॉ. जयंत आठवले यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवात कसलीही उणीव ठेवली नाही. त्यामुळे प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी अमृत महोत्सवाच्या दिवशी डॉक्टरांना बोलावून घेतले आणि त्यांना पाऊण घंटा श्रीकृष्ण-अर्जुनाचे माहात्म्य सांगितले. नंतर त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना चांदीचा श्रीकृष्णार्जुनाचा रथ दिला. रथ देतांना प.पू. भक्तराज महाराज परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाले, ‘‘यापुढे हा रथ (गुरूंच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याचा रथ) तुम्हाला सांभाळायचा आहे. गोव्याला आपला आश्रम होईल, तेथे हा रथ ठेवा.’’ (‘प.पू. बाबांनी दिलेला चांदीचा श्रीकृष्णार्जुनाचा हा रथ आता रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ठेवलेला आहे.’ – संकलक)’ – श्री. प्रकाश जोशी, फोंडा, गोवा. (मे २०१६)  

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सार्वजनिक सभांच्या वेळी व्यासपिठावर लावलेल्या कृष्णार्जुनाचे चित्र असलेल्या कापडी फलकाचा इतिहास

२ अ. फलक मोठा असल्याने चित्र पूर्णपणे उघडून रंगवता न येणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी कला क्षेत्रात प्रशिक्षण नसलेल्या साधकांकडून ते पूर्ण करून घेणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वर्ष १९९७ आणि १९९८ मध्ये विविध राज्यांत सार्वजनिक सभा घेतल्या होत्या. या सभांसाठी व्यासपिठाच्या पार्श्वभूमीवर कुरुक्षेत्रावरील रथात बसलेल्या कृष्णार्जुनाचे चित्र असलेला कापडी फलक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या मुंबई येथील सदनिकेत परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता. विशेष म्हणजे, जागा लहान असल्याने ते चित्र पूर्णपणे उघडून रंगवता येत नव्हते, तरीही परात्पर गुरु डॉक्टरांनी कला क्षेत्रात प्रशिक्षण नसलेल्या साधकांकडून ते पूर्ण करून घेतले होते.

२ आ. परात्पर गुरु डॉक्टर काही घंटे तिरक्या स्थितीत बसल्यावर साधकांनी रथातील श्रीकृष्णाच्या चित्राची बाह्यरेषा काढणे : हे चित्र तयार करतांना रथातील सारथ्याच्या जागी श्रीकृष्ण ज्या पद्धतीने बसलेला आहे, तसे चित्र काढणे साधकांना जमत नव्हते. त्यामुळे शेवटी परात्पर गुरु डॉक्टर आसंदीत तशा तिरक्या स्थितीत काही घंटे बसून राहिले आणि साधकांनी श्रीकृष्णाच्या चित्राची बाह्यरेषा (आउटलाइन) काढली.

३. वर्ष २०२२ मध्ये महर्षींच्या आज्ञेने साजर्‍या झालेल्या रथोत्सवात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्वतः रथारूढ होऊन १ ते २ सहस्र साधकांना दर्शन देणे

त्यानंतर वर्ष २०२२ मध्ये सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथोत्सव साजरा करण्यात आला. त्या वेळी प्रत्यक्ष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले श्रीविष्णुरूपात रथात बसले होते आणि या निमित्ताने साधकांना त्यांचे जवळून दर्शन घेण्याची संधी मिळाली होती. या रथोत्सवाच्या वेळी त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाची संधी केवळ १ ते २ सहस्र साधकांना मिळाली होती. या रथोत्सवासाठी वापरण्यात आलेला रथ बाहेरून तात्पुरता घेतला होता.

४. वर्ष २०२३ मध्ये सप्तर्षींच्या आज्ञेने साजर्‍या झालेल्या ब्रह्मोत्सवात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर साधकांनी तयार केलेल्या रथामध्ये आरूढ होणे आणि त्यांनी १० सहस्रांहून अधिक साधकांना दर्शन देणे

११.५.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. या ब्रह्मोत्सवाच्या वेळी साधकांनी तयार केलेल्या सात्त्विक रथामध्ये सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव विराजमान झाले होते. या वेळी या ब्रह्मोत्सवाच्या माध्यमातून ‘याची देही याची डोळा’ त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाची संधी त्यांच्याच कृपेने १० सहस्रांहून अधिक साधकांना मिळाली. हे या सहस्रो जिवांचे भाग्यच आहे. वर्ष १९९५ पासून वर्ष २०२३ पर्यंत वरील सर्व घटना पहाता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या धर्मकार्यामधील रथाचे महत्त्व आपल्या लक्षात येते. ‘या ब्रह्मोत्सवाच्या माध्यमातून भगवंत भक्तांच्या अधिक जवळ आला आहे’, ही अनुभूती या दिवशी सहस्रो साधकांनी घेतली.

वर्ष १९९५ पासून वर्ष २०२३ पर्यंत वरील सर्व घटना पहाता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या धर्मकार्यामधील रथाचे महत्त्व आपल्या लक्षात येते.

५. साधकांना एकाच जन्मात अनेक अवतारांचे दर्शन देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘राम आप है, कृष्ण आप है, नारायण के अवतार आप है ।’ वर्ष २०१५ पासून वर्ष २०२३ पर्यंतच्या प्रत्येक जन्मोत्सवात सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या साधक भक्तांना श्रीराम, श्रीकृष्ण, श्री सत्यनारायण, शेषशायी श्रीविष्णु, या रूपांमध्ये दर्शन दिले आहे. ‘एकाच जन्मात अनेक अवतारांचे दर्शन होणे’, हे आम्हा साधकांचे महद्भाग्य आहे.

संपूर्ण विश्वाचा सांभाळ करणार्‍या श्रीविष्णुस्वरूप गुरूमाऊलीची भक्ती करण्यासाठी कितीही जन्म घेतले, तरी ते अल्पच आहेत. ‘हे लिखाण परम कृपाळू सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीनेच करवून घेतले’, याबद्दल मी तिच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (२०.५.२०२३)      

भक्ताच्या भेटीसाठी आतुर झालेल्या भगवंताची लीला !    

अ. ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना वर्ष १९९५ मध्ये चांदीचा रथ देणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी वर्ष १९९८ मध्ये सार्वजनिक सभेच्या वेळी व्यासपिठाच्या पार्श्वभूमीवर कुरुक्षेत्रावरील रथात बसलेल्या कृष्णार्जुनाचे चित्र असलेला कापडी फलक लावणे’, या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा धर्मकार्य करण्याविषयीचा अर्जुनभाव (शिष्यभाव) होता.’

आ. त्यानंतरच्या कालावधीत ते स्वतः भगवंतस्वरूप झाले आणि त्यांनी समस्त साधकांना अर्जुनभावात नेले, म्हणजेच त्यांना भक्त बनवले. हेच ते भक्त आणि भगवंत यांमधील अतूट नाते होय.

इ. भक्ताच्या भेटीसाठी भक्तापेक्षा भगवंतच अधिक आतुर असतो. त्यामुळे भक्त आणि भगवंत यांमधील अंतर न्यून होण्यासाठी अन् आपल्या सर्व भक्तांना भेटण्यासाठी अत्यंत व्याकुळ होऊन वैकुंठातील श्रीविष्णूने सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या माध्यमातून भूतलावर अवतार धारण केला आहे. ‘ब्रह्मोत्सवाच्या माध्यमातून आपल्या १० सहस्र भक्तांना एकाच वेळी दर्शन देणे, सगळ्यांना उच्चतम भावस्थिती अनुभवण्यास देणे आणि भक्त अन् भगवंत यांमधील अंतर दूर करणे’, हीच आपल्या नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीची लीला आहे.

ई. या ठिकाणी मला द्वापरयुगातील श्रीकृष्णाची तीव्रतेने आठवण झाली. श्रीकृष्णाने आपल्या परम भक्त गोपींना उच्चतम भावाची अनुभूती एकाच वेळी दिली होती. तीच भावाची उच्चतम अवस्था सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ३ तपांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सतत साधनारत असलेल्या आपल्या भक्तांना प्रदान केली आहे. ही त्यांची श्रीकृष्णलीलाच आहे. – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर