#Exclusive : स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी साम्यवाद्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध ! – अनुपम मिश्रा, संपादक, दैनिक ‘प्रयागराज टाईम्स’, उत्तरप्रदेश

२१ ते २८ मे या कालावधीत सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘विचार जागरण सप्ताह’ चालू होता. यास्तव दैनिक ‘सनातन प्रभात’मधून ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू केली होती. या माध्यमातून सावरकरांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्याचा प्रयत्न केला गेला. आज या वृत्तमालिकेचा अंतिम भाग येथे प्रसारित करत आहोत.

शतपैलू सावरकर

२८ मे, प्रयागराज, उत्तरप्रदेश (वार्ता.) – सद्य:स्थितीत भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी पक्ष आणि विशेषकरून साम्यवादी विचारसरणीचे लोक हिंदुत्वाच्या विचारसरणीला पूरक नाहीत. याचे खापर ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर फोडतांना दिसतात. प्रारंभीपासून अशीच स्थिती होती का ? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे.

श्री, अनुपम मिश्रा

१९२०, तसेच १९३० च्या दशकांत जेव्हा साम्यवादी विचारसरणीचे पक्ष उदयास येत होते, तेव्हा त्यांचे संस्थापक मानवेंद्रनाथ राय हे स्वत: सावरकर यांना ‘देशभक्त’ म्हणायचे. सावरकरांना भेटायच्या आधी रॉय स्वतःचा पोशाख पालटून भारतीय वेशभूषा करायचे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य हिरेंद्रनाथ मुखर्जी, श्रीपाद अमृत डांगे आदींनी त्यांच्या लिखाणात सावरकर यांचे कौतुक केले आहे. साम्यवादी आणि हिंदु महासभा यांची जुनीच जवळीक होती.

खरी अडचण गांधीवाद्यांनी जेव्हा समाजवाद सोडून हिंदुत्वाच्या सूत्रावर राजकारण करण्यास चालू केले, तेव्हा निर्माण झाली. त्या वेळी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि साम्यवादी विचारसरणीच्या लोकांना लक्षात आले की, आतापर्यंत आपण ज्या सूत्रांवर म्हणजेच जात, भाषा, धर्म, क्षेत्र या आधारावर ‘देशाला तोडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबली, त्याला सावरकर यांच्या प्रखर देशभक्तीमुळे धोका निर्माण झाला आहे. येथूनच साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनी सावरकर यांना विरोध चालू केला; कारण प्रश्‍न त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात साम्यवादी विचारसरणीच्या लोकांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव केला आहे, ही वस्तुस्थिती आहे, असे वक्त्व्य येथील ‘प्रयागराज टाइम्स’चे संपादक श्री. अनुपम मिश्रा यांनी केले. ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते.