२८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या असलेल्या १४० व्या जयंतीनिमित्त विशेष वृत्तमालिका !
शतपैलू सावरकर
२१ ते २८ मे या कालावधीत सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘विचार जागरण सप्ताह’ चालू आहे. यास्तव ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू केली आहे. या माध्यमातून सावरकरांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’कडून हा छोटासा अभियानरूपी प्रयत्न !
कोणतेही राष्ट्र वैभवशाली तेव्हा होते, जेव्हा स्वत:ची भाषा, संस्कृती, परंपरा यांचा आदर करते. भाषा हे कोणत्याही राष्ट्राच्या संस्कृतीच्या जवळ जाण्याचे उत्कृष्ट माध्यम आहे. या माध्यमातूनच कोणतीही संस्कृती दुसर्या संस्कृतीवर आक्रमण करू शकते. केवळ शब्दांतूनच नाही, तर संपूर्ण संस्कृतीच्या माध्यमातून आक्रमण होते. हाच धोका ४०० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणला होता. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र राजव्यवहारकोश सिद्ध केला. त्या वेळी राज्यकारभाराची भाषा फारसी होती; परंतु लोकांना ती समजत नव्हती. त्यामुळे महाराजांनी राजभाषाकोश सिद्ध केला.
मराठी आणि संस्कृत भाषा यांना महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी शिवरायांनी ‘राजव्यवहारकोश’ या श्रेष्ठ ग्रंथाची निर्मिती केली. हा ग्रंथ रघुनाथ हणमंते आणि अन्य विद्वान यांच्या साहाय्याने वर्ष १६७८ मध्ये सिद्ध केला गेला. शिवरायांच्या नंतर जर कुणी ही गोष्ट जाणली असेल, तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्यांनी भाषाशुद्धीचे महत्त्व जाणले आणि त्यासाठी अथक परिश्रमही घेतले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असेच प्रयत्न तुर्कस्तानच्या केमाल पाशा याने केले होते. तो सत्तेत असल्यामुळे त्याचे प्रयत्न सगळ्यांना समजले; पण स्वातंत्र्यवीर सावरकर सत्तेत नसल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांविषयी क्वचित्च कुणाला ठाऊक असेल. मातृभाषेच्या म्हणजेच मराठीच्या भाषाशुद्धीसाठी सावरकर यांनी अथक परिश्रम घेतले. पूर्वी इंग्रजी, फारसी अशा परकीय भाषांतील कित्येक शब्दांचा उपयोग होत होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्या शब्दांसाठी स्वकीय भाषांतील प्रतिशब्द शोधून काढले, तसेच नवीन शब्द सिद्धही केले.
त्यांनी सिद्ध केलेल्या कित्येक शब्दांचा आजही आपण उपयोग करत आहोत. मला वाटते की, क्रांतीकारकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे भाषाशुद्धीसाठी कार्य केलेला अन्य कुणी क्रांतीकारक नसावा. त्यामुळे सावरकर यांनी भाषाशुद्धीसाठी केलेले प्रयत्न हे त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.