‘‘डॉक्टर, माझे सगळे रिपोर्ट्स (अहवाल) आले आहेत ! सोनोग्राफीनंतर तुम्ही ‘अँटी म्युलेरियन हार्माेन’ची (‘antimullerian hormone’ची – ए.एम्.एच्.) पातळी अल्प असण्याची शक्यता आहे’, असे म्हणाला होता. तसाच अहवाल आला आहे. मला पुष्कळ ताण आला आहे…मी आई होऊ शकेन ना ?’’ ‘भारतीय स्त्रियांमध्ये मासिक पाळी लवकर थांबते. त्यामुळे वंध्यत्वाच्या घटना वाढत आहेत’, अशी बातमी रियाने कुठेतरी वाचली होती. त्यामुळे तिच्या चिंतेत भर पडली होती. वरची बातमी हे अर्धसत्य आहे. भारतीय स्त्रियांमध्ये मासिक पाळी लवकर थांबण्याचे प्रमाण थोडे अधिक आहे; पण त्यामुळे वंध्यत्व वाढते, हे पूर्णतः खरे नाही. आपण ही समस्या नीट समजून घेऊया.
१. गर्भधारणा होत नसल्याने पती-पत्नी धास्तावणे
रियाचे वय होते ३३ वर्षे ! सध्याच्या पद्धतीनुसार तिचा विवाह वयाच्या २९ व्या वर्षी झाला; पण त्या दोघांची पालक होण्याची मानसिक सिद्धता नव्हती. मग त्यात अजून १ – २ वर्षे गेली. मग कोणताही योग्य वैद्यकीय सल्ला न घेता आणि तपासण्या न करता ते गर्भधारणेसाठी प्रयत्न करत राहिले. त्यात अजून दीड वर्ष वाया गेले; पण गर्भधारणा होतच नसल्याने ते दोघे थोडेसे धास्तावले होते. रियाची ‘ए.एम्.एच्.’ पातळी अल्प झाली म्हणजे नक्की काय झाले ? ते समजून घेऊया.
२. स्त्रीबीजांची संख्या झपाट्याने न्यून झाल्यावर जननक्षमता मंदावणे
जननक्षमतेसाठी स्त्रीच्या अंडाशयात म्हणजे ‘ओव्हरी’त पुरेशी स्त्रीबीजे असणे अत्यावश्यक आहे. मुलगी जन्माला आल्यापासून तिची मासिक पाळी चालू होईपर्यंत या अविकसित स्त्रीबीजांची संख्या भरपूर असते. नंतर मात्र ही संख्या न्यून होण्यास प्रारंभ होतो. साधारणपणे स्त्रीची पाळी थांबेपर्यंत अंडाशयातील स्त्रीबीजे तिला पुरतात; पण काही स्त्रियांमध्ये या स्त्रीबीजांची संख्या झपाट्याने न्यून होते. त्यामुळे जननक्षमता उतरणीला लागते. भारतीय स्त्रियांमध्ये ही जननक्षमता वयाच्या ३० व्या वर्षापासून अल्प होऊ लागते आणि ३५ व्या वयानंतर ती वेगाने घसरणीला लागते.
३. ए.एम्.एच्. हा हॉर्मोन स्त्रीबीजांची संख्या चांगली ठेवत असल्याने त्याचे प्रमाण योग्य असणे स्त्रीच्या जननक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक !
‘सीरम ए.एम्.एच्.’ ही तपासणी आपल्याला स्त्रीच्या जननक्षमतेची नेमकी कल्पना देते. ए.एम्.एच्. म्हणजे अँटी म्युलेरियन हार्माेन हा स्त्रीबीजांची संख्या चांगली रहाण्यासाठी धडपडत असतो. त्याचे प्रमाण अल्प झाल्यावर स्त्रीबीजे वेगाने न्यून होतात. त्यामुळे ए.एम्.एच्.चे प्रमाण योग्य असणे, हे स्त्रीच्या जननक्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. अल्प झालेल्या ए.एम्.एच्. पातळीमुळे गर्भधारणा अवघड होते. तसेच वारंवार गर्भपात होण्याचे प्रमाण वाढते.
४. तिशीच्या आसपास स्त्रियांनी गर्भधारणेचा निर्णय घेणे सयुक्तिक !
पाळी बंद होण्याआधी जवळपास १३ ते १४ वर्षे ‘ए.एम्.एच्.’ अल्प होण्यास प्रारंभ होतो. त्यामुळे वयाच्या तिशीच्या आसपास स्त्रियांनी गर्भधारणेचा निर्णय घेणे सयुक्तिक ठरते. यामध्ये काही प्रमाणात जनुकीय कारणेही असू शकतात. ‘ए.एम्.एच्.’ पातळी अल्प झालेल्या स्त्रियांची पाळी इतर स्त्रियांच्या मानाने लवकर थांबते.
५. पुरेशी स्त्रीबीजे न मिळाल्यास करावयाचा उपाय !
‘ए.एम्.एच्.’ची पातळी एका प्रमाणाबाहेर खाली गेली, तर ‘आय.व्ही.एफ्.’ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) तंत्रज्ञान वापरूनही गर्भधारणा अवघड होते; कारण पुरेशी स्त्रीबीजेच मिळू शकत नाहीत. अशा वेळी दुसर्या स्त्रीची स्त्रीबीजे आणि पतीचे शुक्राणू वापरून गर्भ निर्माण करता येतो. गर्भधारणा हवी असलेल्या स्त्रीच्या गर्भाशयात तो रुजण्यासाठी सोडला जातो. यामध्ये बाळ स्त्रीच्या पोटातच तिचे स्वतःच म्हणूनच वाढणार असते. तरीही जनुकीय पालकत्व हवे असल्यामुळे पुष्कळ स्त्रिया हा उपाय नाकारतात. खरे तर तिच्या शरिरातील रक्तामासावर वाढलेले हे बाळ सर्वार्थाने तिचेच असते, हे समजून घेतले, तर बर्याच स्त्रियांची मानसिक व्यथा अल्प होईल.
६. ‘ए.एम्.एच्.’ पातळी वाढवण्यासाठी औषधे घ्यावीत !
‘ए.एम्.एच्.’ पातळी वाढवण्यासाठी काही औषधे आणि उपाय उपलब्ध आहेत. सध्या ‘आय.व्ही.एफ्.’ तंत्रज्ञानामध्ये ‘ए.एम्.एच्.’ अल्प असलेल्या स्त्रियांच्या ओव्हरीतूनही अधिकाधिक स्त्रीबीजे मिळवण्यासाठी काही नवीन संशोधन आणि उपाय उपलब्ध आहेत. त्यांचाही वापर करता येऊ शकतो.
७. जननक्षमतेचा अंदाज घ्या आणि व्यसने टाळा !
वरील माहितीचा उपयोग करून तरुण मुली आणि जोडपी काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. सध्या विवाह विलंबाने होत असल्याने तरुण जोडप्यांना लगेचच मूल नको असते; पण अतीविलंबही हानीकारक ठरू शकतो. वयाची ३० वर्षे पूर्ण होण्याच्या आत गर्भधारणेचे नियोजन करणे उत्तम; पण काही कारणाने ते शक्य नसेल, तर मग निदान ‘ए.एम्.एच.’ ही चाचणी करून जननक्षमतेचे अनुमान घेणे सयुक्तिक आहे; मात्र गर्भधारणेच्या संदर्भात स्त्रीचे वय हा सर्वांत महत्त्वाचा आणि मोठा घटक आहे, हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे.
वजन नियंत्रणात ठेवणे, सिगारेट, दारू, तंबाखू (सिगारेट, हुक्का अशा कोणत्याही स्वरूपात) आदी व्यसने टाळणे, योग्य आहार यांकडे विशेष लक्ष द्यावे.
८. पालकत्व स्वीकारण्यासाठी परिपक्वता हवीच, नाही का ?
रियाची ए.एम्.एच्. पातळी अल्प असली, तरी ती पुष्कळ खाली गेलेली नव्हती. आम्ही उपचार चालू केल्यावर ४ मासांतच तिला बाळाची चाहूल लागली. योग्य वेळी योग्य उपचार हे महत्त्वाचे ठरते. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गर्भधारणा वेळेवर होणे हे महत्त्वाचे आहेच; पण एक कोवळा जीव या जगात आणण्याच्या आधी पती-पत्नींचे नाते परिपक्व आहे ना ? भोवतालची परिस्थिती अनुकूल आहे ना ? हे पडताळून पहाणे या गोष्टींना पर्याय नाही.
– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ञ, कोथरूड, पुणे. (२७.४.२०२३)
टीप : ए.एम्.एच्. हा बहुतेक वेळेस सर्वसमावेशक गर्भधारणेच्या शक्यतेच्या तपासणीचाच एक भाग असतो आणि यामध्ये महिलेच्या गर्भाशयातील गुणवत्तापूर्ण बीजांडाच्या पेशींची संख्या दर्शवण्यासाठीही याचा उपयोग केला जाऊ शकतो अथवा गरोदरपणात महिलेची बीजांडे सिद्ध करण्याची क्षमता यावरून फलित होऊ शकते.
प्रसूतीनंतर मासिक पाळी कधी येते ?‘‘मॅडम, प्रेगनन्सी (गर्भधारणा) कशी असेल ? माझे ६ मासांचे बाळ अजून अंगावर पित आहे ! मासिक पाळी चालूच झाली नाही अजून माझी.’’ आमच्या चिकित्सालयात (‘क्लिनिक’मध्ये) थोड्या िदवसांनी हा संवाद झडतोच. प्रसूतीनंतर मासिक पाळी चालू होण्याचा काळ प्रत्येक स्त्रीनुसार पालटतो. काही स्त्रियांना लगेच पुढील मासात पाळी चालू होऊ शकते, तर काही जणींना वर्षभर पाळी येत नाही. असे असले, तरी या काळात गर्भधारणाही राहू शकते. ‘बाळ अंगावर दूध पीत असेल, तर दिवस रहात नाहीत’, ही जुन्या पिढीतील अशास्त्रीय समजूत आहे. प्रसूतीनंतर काही काळ मासिक पाळी चालू झाली, तरी ती अनियमित असू शकते. तसेच रक्तस्रावाचे प्रमाण अल्प असणे हेही सर्वसाधारण आहे. प्रसूतीनंतर शरीर पूर्ववत् होण्याचा काळ ६ आठवड्यांचा असतो. लैंगिक संबंध २ मासांनंतर येऊ शकतात; पण प्रत्येक संबंधांच्या वेळी कंडोम वापरणे आवश्यक आहे. मासिक पाळी आली नाही, तरी प्रत्येक मासाला एक गर्भनिदान चाचणी घरच्या घरी करणे उत्तम ! म्हणजे नको असलेली गर्भधारणा राहिल्यामुळे होणारा मनस्ताप वाचू शकतो. प्रसूतीनंतर स्तनपान चालू असतांना घेता येणार्या काही गर्भनिरोधक गोळ्याही उपलब्ध आहेत; परंतु गोळ्यांमुळे अनियमित रक्तस्राव, वजन वाढणे असे दुष्परिणाम दिसू शकतात. एका प्रसूतीनंतर ‘कॉपर टी’ हे सर्वांत उत्तम गर्भनिरोधक आहे. मासिक पाळीच्या पाचव्या दिवशी ती बसवली जाते. स्तनपानाच्या काळात ‘कॉपर टी’ गर्भाशयात अधिक चांगली बसू शकते. त्यामुळे अधिक रक्तस्राव होण्याची संभाव्यता बरीच न्यून होते. मैत्रिणींनो, जुन्या-पुराण्या चुकीच्या समजूतींमध्ये अडकून स्वत:ची हानी करून घेण्यापेक्षा शास्त्रीय माहिती घेऊन स्वत:ची काळजी घेणे उत्तम नाही का ? – डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ञ, कोथरूड, पुणे. |