सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारत्वामुळेच घडलेली लीला !
‘६.४.२०२३ या हनुमान जयंतीच्या दिवशी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला ‘त्यांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांकडे पाहून काय जाणवते ?’, हे पहायला सांगितले. त्यांच्या देवघरामध्ये २ कप्पे आहेत. खालच्या कप्प्यात दत्त, श्री सरस्वती, श्री लक्ष्मी, गणपति आणि श्री दुर्गादेवी ही सनातन-निर्मित देवतांची चित्रे आहेत, तर वरच्या कप्प्यात मारुति, श्रीराम, श्रीकृष्ण आणि शिव ही सनातन-निर्मित देवतांची चित्रे, तसेच मध्यभागी प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आहे.
६.४.२०२३ (हनुमान जयंती) या दिवशी शक्तीची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होत असतांना काढलेली देवघराची छायाचित्रे !
शक्तीची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होत असल्यामुळे या छायाचित्रांकडे पहातांना डोळ्यांना जडत्व जाणवते.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांतून पुष्कळ प्रमाणात चांगली शक्ती प्रक्षेपित होत असून ती शक्ती सहन न होणे
मी प्रथम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील वरच्या कप्प्यातील देवतांकडे पाहिले. मला त्या देवतांकडून पुष्कळ प्रमाणात चांगली शक्ती प्रक्षेपित होतांना जाणवली. मग मी खालच्या कप्प्यातील देवतांकडे पाहिले, तेव्हा मला खालच्या कप्प्यातील देवतांकडून शक्तीची स्पंदने त्याहून थोडी अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतांना जाणवली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘देवतांच्या चित्रांतून इतक्या प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत आहे की, त्या देवतांच्या चित्रांकडे केवळ २ – ४ सेकंदच पहाता येत आहे. त्याहून अधिक वेळ पहाता येत नाही.’’
२. प्रसंग कठीण असो किंवा अन्य कोणताही, गुरूंकडून शक्तीची नव्हे, तर भाव आणि आनंद यांचीच स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असणे अन् हेच गुरूंचे महत्त्व असणे
खालच्यापेक्षा वरच्या कप्प्यातील देवतांकडून प्रक्षेपित होणार्या शक्तीचे प्रमाण थोडे अल्प होते. याचे कारण शोधण्यासाठी मी दोन्ही कप्प्यांतील देवतांची तुलना केली. तेव्हा मला लक्षात आले, ‘वरच्या कप्प्यात देवतांच्या चित्रांसोबत प.पू. भक्तराज महाराज यांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या गुरूंचे) छायाचित्र आहे आणि त्यांच्याकडे पाहून मात्र भाव अन् आनंद यांची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात (प्रत्येकी ३५ टक्के) प्रक्षेपित होत आहेत; पण शक्तीची स्पंदने अगदी अल्प प्रमाणात (२ टक्के) प्रक्षेपित होत आहेत. त्यामुळे वरच्या कप्प्यातून प्रक्षेपित होणार्या शक्तीचे प्रमाण थोडे अल्प आहे.’ मी हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘यातून गुरूंचे महत्त्व लक्षात येते ! प्रसंग कठीण असो किंवा अन्य कोणताही, गुरूंकडून मात्र भाव आणि आनंद यांचीच स्पंदने प्रक्षेपित होतात. गुरूंकडून मारक शक्ती प्रक्षेपित न होता नेहमी तारक शक्तीच प्रक्षेपित होते.’’
३. सनातन संस्थेचे साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न करीत असणे आणि या महान कार्यात साधकांना साहाय्य करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांतून हनुमान जयंतीच्या दिवशी शक्ती प्रक्षेपित होऊ लागणे
सध्याचा काळ हा कलियुगांतर्गत कलियुगातील एक छोटेसे कलियुग संपून छोटेसे सत्ययुग अवतरित होण्याच्या मधील संधिकाळ आहे. सध्या आपण बघतो की, जगभर अधर्म माजला आहे. लोकांचे एकमेकांशी नीतीने, सत्याने वागणे दुर्मिळ झाले आहे. हीन-दीन कर्मे लोकांकडून होत आहेत. सत्ययुग यायचे असेल, तर कलियुगातील अधर्म आणि तामसिकता दूर करावी लागेल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ अध्यात्मप्रसार करून हे प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सनातन संस्था’ समाजातील लोकांना धर्माचरण आणि साधना शिकवून सात्त्विक बनवत आहे. त्याचा परिणामही दिसून येत आहे. आता हिंदु राष्ट्राची, म्हणजेच ईश्वरी राज्याची मागणी जोर धरत आहे. हे सर्व ईश्वराच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही; पण त्यासाठी आधी आपण एक पाऊल पुढे टाकावे लागते. तसे केले तरच ईश्वराची कृपा लाभते. सनातन संस्था ईश्वरी राज्य स्थापन होण्यासाठी प्रयत्न करत असल्याने त्या कार्याला देवतांची कृपा लाभत असल्याच्या अनुभूती सनातनचे साधक घेत आहेत. यामध्ये आणखी पुढच्या टप्प्याची स्थुलातून येणारी अनुभूती, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांतून शक्ती प्रक्षेपित होऊ लागल्याची अनुभूती येणे. अशा प्रकारे देवतांची तत्त्वे निर्गुण स्तरावरून थोडीफार सगुण स्तरावर कार्यरत झाल्याशिवाय साधक ‘ईश्वरी राज्याची स्थापना करणे’, एवढे महान कार्य करू शकत नाहीत; म्हणूनच आता देवतांची तत्त्वे कार्यरत होऊन त्यांची शक्ती प्रक्षेपित होऊ लागण्याला ६.४.२०२३ या हनुमान जयंतीच्या दिवशी आरंभ झाला.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांतून प्रक्षेपित होत असलेली शक्ती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांतून किती मोठ्या प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत होती, हे कळण्यासाठी ६.४.२०२३ या हनुमान जयंतीच्या दिवशी देवतांच्या चित्रांमधून प्रक्षेपित झालेल्या शक्तीचे प्रमाण मला जे जाणवले, ते येथे सारणीमध्ये दिले आहे. तुलनेसाठी २ आणि ४ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) देवतांच्या चित्रांमधून प्रक्षेपित झालेल्या शक्तीचे प्रमाणही दिले आहे. तसेच हनुमान जयंतीनंतर पुढे १ आठवडा देवतांच्या चित्रांमधून प्रक्षेपित झालेल्या शक्तीमध्ये मला काय पालट जाणवला, तेही सारणीमध्ये दिले आहे.
टीप : देवघरातील ज्या देव आणि देवी यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या शक्तीचे प्रमाण नगण्य असल्याने ते जाणवले नाही, ते ० टक्के दिले आहे.
९.१२.२०२२ या दिवशी शक्तीची स्पंदने अल्प प्रमाणात प्रक्षेपित होत असतांना काढलेली देवघराची छायाचित्रे !
शक्तीची स्पंदने अल्प प्रमाणात प्रक्षेपित होत असल्यामुळे या छायाचित्रांकडे पहातांना डोळ्यांना हलकेपणा जाणवतो.
४ अ. हनुमान जयंतीच्या दिवशी (६.४.२०२३) देवतांकडून पुष्कळ प्रमाणात शक्ती प्रक्षेपित झाली असणे : या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या देवघरातील देवतांकडून पुष्कळ प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आणून दिले. त्या दिवशी देवघरातील खालच्या कप्प्यातून ४५ टक्के (छायाचित्र १) आणि वरच्या कप्प्यातून ३५ टक्के (छायाचित्र २) शक्ती प्रक्षेपित होत होती. (‘हा भेद का आहे ?’, याचे उत्तर सूत्र क्र. २ मध्ये दिले आहे.) यामुळे तेथील देवतांकडे काही सेकंदही बघता येत नव्हते. या तुलनेत त्याच्या अगोदर ४ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) (९.१२.२०२२ या दिवशी) देवघरातील खालच्या कप्प्यातून ० टक्के (छायाचित्र ३) आणि वरच्या कप्प्यातून २ टक्के (छायाचित्र ४) शक्ती प्रक्षेपित होत होती. त्यानंतर २ मासांनी (महिन्यांनी) (२७.२.२०२३ या दिवशी) हे प्रमाण अगदी थोडेसे वाढले होते, म्हणजे दोन्ही कप्प्यांतून २ टक्के झाले होते; पण हनुमान जयंतीच्या दिवशी ते पुष्कळच वाढले होते. याचा अर्थ ईश्वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्यासाठी हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर देवतांची तत्त्वे कार्यरत झाली होती. हनुमानामध्ये प्रकट शक्ती अधिक आहे.
४ आ. हनुमान जयंतीपासून देवतांची कार्यरत शक्ती ईश्वरी राज्याच्या स्थापनेच्या कार्यासाठी १० पटींनी वाढली असणे : हनुमान जयंतीनंतर दुसर्या दिवशी देवतांमधून प्रक्षेपित होणारी शक्ती थोडी अल्प झाली. त्या दिवशी देवघरातील खालच्या आणि वरच्या कप्प्यांतून २५ टक्के शक्ती प्रक्षेपित होत होती. (आदल्या दिवशी ती अनुक्रमे ४५ टक्के आणि ३५ टक्के होती.) त्यानंतर पुढील आठवडाभर देवघरातील खालच्या आणि वरच्या कप्प्यांतून प्रक्षेपित होणार्या शक्तीचे प्रमाण सातत्याने २० टक्के होते. त्यापुढे आणखी ७ दिवसांनीही ते प्रमाण तेवढेच होते. याचा अर्थ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील खालच्या आणि वरच्या कप्प्यांतून प्रक्षेपित होणार्या शक्तीचे प्रमाण २ मासांपूर्वी जे २ टक्के होते, ते आता १० पट वाढून २० टक्के झाले होते. हे प्रमाण आता सातत्याने तेवढे टिकून आहे. याचा अर्थ देवतांची कार्यरत शक्ती आता ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी १० पटींनी वाढली आहे.
४ इ. देवघरातील ८ देवतांच्या चित्रांपैकी श्रीराम, गणपति आणि श्री दुर्गादेवी या ३ देवतांकडून अधिक प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होणे आणि त्यामागील कारणे : गणपति, दत्त, श्रीराम, श्रीकृष्ण, शिव, श्री लक्ष्मी, श्री दुर्गादेवी आणि श्री सरस्वती या आठ देवतांच्या चित्रांपैकी हनुमान जयंतीच्या दिवशी श्रीराम, गणपति आणि श्री दुर्गादेवी या ३ देवतांकडून सर्वाधिक प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत होती. याची कारणे पुढीलप्रमाणे लक्षात आली.
१. श्रीरामाच्या चित्रातून अधिक प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होण्याचे कारण म्हणजे ईश्वरी राज्याची स्थापना करण्यासाठी, म्हणजेच रामराज्य येण्यासाठी श्रीरामाचे तत्त्व कार्यरत होणे आवश्यक आहे. यामुळेच श्रीरामाचे साहाय्य आणि कृपाशीर्वाद या कार्यासाठी साधकांना मिळेल.
२. पृथ्वीवर रामराज्य येण्यासाठी आधी अधर्म आणि तामसिकता दूर झाली पाहिजे. या कार्यासाठी देवीची मारक शक्ती आवश्यक आहे. यासाठीच श्री दुर्गादेवीच्या चित्रातून अधिक प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत होती.
३. अधर्म आणि तामसिकता दूर करणे, तसेच रामराज्य स्थापन करणे, यांसाठी सात्त्विक बुद्धीची आवश्यकता आहे. बुद्धीची देवता गणपति आहे. याबरोबरच गणपति हा दशदिशांचा स्वामीसुद्धा आहे. तो दशदिशांतील अडथळे दूर करतो. या दोन्ही कार्यांसाठी गणपतीकडून शक्ती अधिक प्रमाणात प्रक्षेपित होत होती.
हनुमान जयंतीनंतर पुढेही रामराज्याचा निर्माता श्रीराम याची शक्ती सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होत होती, हे वरील सारणीमध्ये दिसून येते. यावरून श्रीरामच साधकांकडून हे कार्य करवून घेणार आहे, हे लक्षात येते.
५. आश्रमातील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांतून शक्ती प्रक्षेपित होऊ लागल्यावर आश्रमातील ध्यानमंदिर आणि देवळे येथील देवतांमधूनही तेवढ्याच प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होऊ लागणे
‘जशी सनातनच्या रामनाथी आश्रमामधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांतून शक्ती प्रक्षेपित होऊ लागली होती, तशीच आश्रमातील ध्यानमंदिरातील सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांतूनही शक्ती प्रक्षेपित होत आहे का ?’, हे मी पाहिले. तेव्हा मला तेथील देवतेच्या चित्रांतूनही तेवढ्याच प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले. तसेच त्या देवतांमधील श्रीराम, श्री दुर्गादेवी आणि गणपति याच देवतांमधून अधिक प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत असल्याचेही जाणवले. यामुळे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवतांमधील पालट आणि ध्यानमंदिरातील देवतांमधील पालट सारखेच होते’, हे लक्षात आले. तसेच आश्रमामध्ये श्रीसिद्धिविनायक, श्री भवानीदेवी आणि सेतूरक्षक मारुति यांची देवळेही आहेत. तेथील मूर्तींमधूनही अनुक्रमे गणपति, श्री दुर्गादेवी आणि मारुति यांच्या चित्रांप्रमाणेच तेवढ्याच प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत होती. यातून लक्षात येते की, सर्व ठिकाणीच हे पालट झाले आहेत.
५ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे प्रणेते असल्याने या पालटांचे केंद्रबिंदू तेच असणे : या पालटांचे केंद्रबिंदू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू, उदा. त्यांच्या खोलीतील देवघरातील देवतांची चित्रे आहेत. आतापर्यंत असे अनुभवायला आले आहे की, आधी तिथे पालट होतो आणि मग तो पालट तशाच अन्य वस्तूंमध्ये ‘रेझोनन्स इफेक्ट’मुळे होतो. (‘रेझोनन्स इफेक्ट’ म्हणजे तंबोर्यांच्या एकाच प्रकारच्या दोन तारांपैकी त्यांतील एकीला ताण देऊन सोडल्यावर जो नाद उत्पन्न होतो, तोच नाद तंबोर्याच्या तशाच दुसर्या तारेमधून आपोआप निर्माण होतो.) सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे प्रणेते असल्याने त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्याशी संबंधित वस्तूंमध्ये प्रथम पालट होतो आणि त्यानंतर तो अन्यत्र दिसून येतो.
६. देवतेच्या चित्रांतून प्रक्षेपित होणार्या शक्तीचा अनुभवलेला परिणाम
६ अ. ‘आता देवच कसे कार्य करत आहे’, याची अनुभूती येत असणे : ६.४.२०२३ या दिवशी झालेल्या हनुमान जयंतीपासून देवतातत्त्व १० टक्क्यांनी अधिक कार्यरत झाल्याने साधक करत असलेले राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कार्य कसे सहजतेने अन् आपोआप होऊ लागले आहे, याची अनुभूती मला मागील ८ – १० दिवसांपासून येऊ लागली आहे. सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीसाठी समाजात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात सहभागी होतात, उदा. हिंदु राष्ट्रजागृती सभा, आंदोलने, हिंदु अधिवेशने इत्यादी. या कार्यक्रमांमध्ये जे अडथळे येतात, त्यांच्या निवारणासाठी संत, साधक मला संपर्क करून आध्यात्मिक उपाय करण्यास सांगतात. पूर्वी असे अडथळे आल्यावर मला १५ मिनिटे ते अर्धा घंटा (तास) नामजपादी आध्यात्मिक उपाय करावे लागायचे. तेव्हा ते अडथळे दूर व्हायचे; पण आता गेल्या १० दिवसांत संत, साधक यांनी एखादा अडथळा सांगितल्यावर मी तो दूर होण्यासाठी नामजपादी आध्यात्मिक उपाय करण्यास आरंभ केल्यावर अगदी २ – ३ मिनिटांतच तो अडथळा दूर झाल्याचा निरोप मला साधकांकडून येतो. याचा अर्थ मी तो आध्यात्मिक उपाय करण्यास केवळ आरंभ केला असूनही देवाच्या कृपेने तो अडथळा लगेच दूर झालेला असतो, म्हणजे देवानेच तो अडथळा दूर केलेला असतो. त्यामुळे मला देव आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. या अनुभूतीतून ‘आता देवच कसे कार्य करत आहे’, हे लक्षात येत आहे.
७. ‘आता देवच कार्य करत आहे’, ही अनुभूती येणे, ही लीला केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारत्वामुळेच घडली आहे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच देवतांची शक्ती कार्यरत झाल्याचे लक्षात आणून दिले. सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सर्वत्र ईश्वरी राज्य स्थापन होण्यासाठी गेली ३ दशके प्रयत्न करत आहेत. या कलियुगात केवळ भारतातच नाही, तर जगभर ‘ईश्वरी राज्य स्थापन करणे’ ही कठीणप्राय आणि अशक्य वाटणारी गोष्ट आहे. हे महान कार्य केवळ देवाचे अवतारत्व असणारी व्यक्तीच करू शकते. विविध महर्षींनी सांगितलेल्या नाडीपट्ट्यांमध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, हे अनेक उदाहरणे देऊन सांगितलेले आहे. या पृथ्वीवर ईश्वरी राज्य हे त्यांच्या अवतारत्वामुळेच येणार आहे. सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक यांचे त्यासाठीचे समष्टी प्रयत्न अपेक्षित असे झाल्यावर आता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळेच देवतांची तत्त्वे प्रत्यक्ष कार्यरत होण्यास आरंभ झाला आहे आणि त्याची अनुभूती साधकांना आता येत आहे. पूर्वी समष्टी कार्यासाठी साधकांना पुष्कळ कष्ट घ्यावे लागायचे आणि कधी कधी त्यामध्ये त्यांना अपयशही यायचे; पण आता संत, साधक यांच्याकडून ईश्वरी राज्य स्थापन करण्यासाठीचे समष्टी कार्य सहजतेने होऊ लागले आहे. हेच ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व ! आता त्यांच्या अवतारत्वाची प्रचीती संपूर्ण जगातील साधक, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, हितचिंतक अशा सर्वांनाच येत आहे.
८. कृतज्ञता
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्या कृपेमुळेच देवतांची तत्त्वे आता सगुणात येत असल्याच्या अनुभूती आम्हाला घेता येत आहेत. देवतांचे कृपाशीर्वाद आम्हाला मिळत आहेत. हे आमचे केवढे मोठे भाग्य ! सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच आम्हाला ईश्वरी राज्य स्थापन झाल्याचे बघता येणार आहे. आम्ही किती परम भाग्यवान आहोत !! तसेच केवळ ईश्वरी राज्य स्थापन होणेच नाही, तर स्वतःची आध्यात्मिक उन्नती होत असल्याचेही आम्हाला बघता येत आहे. हे तर आमचे अति परम भाग्य !!!’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.५.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |