Ram Navami Rallies Across Bengal : बंगाल : रामनवमीला २ सहस्र मिरवणुकींत एकूण १ कोटी हिंदू सहभागी होणार !

  • बंगालचे भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांची माहिती

  • ‘जय श्रीराम’च्या घोषणा बंद करण्याची शक्ती तुमच्यात नसल्याचे सांगत तृणमूल काँग्रेसला दिले थेट आव्हान !

भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी

कोलकाता (बंगाल) – पुढील वर्षी बंगालमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय तापमान वाढू लागले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामधील राजकीय संघर्ष वाढत आहे. बंगालमध्ये रामनवमीची सिद्धता चालू झाली आहे. या वेळी रामनवमी उत्सव महाकुंभ वर्षाशी जुळत आहे. त्यामुळे हे एक गौरवशाली वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे बंगालमधील आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी, ‘या वर्षी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. राज्यभरात रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये लाखो हिंदू सहभागी होतील. या मिरवणुका रोखण्याचा तृणमूल सरकारने कोणताही प्रयत्न केल्यास त्याला कडाडून विरोध केला जाईल’, अशा प्रकारे थेट आव्हान दिले आहे. ‘जय श्रीराम’च्या घोषणा बंद करण्याची शक्ती तुमच्यात नाही’, असेही अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला उद्देशून म्हटले आहे.

१. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका विशिष्ट समुदायाचे तुष्टीकरण करत असल्याचा आरोप करत अधिकारी यांनी म्हटले की, त्यांची सत्ता आता केवळ थोड्या काळासाठी आहे.

२. ते पुढे म्हणाले की, हिंदू भारतावर राज्य करतील आणि जो बंगालमधील हिंदूंची काळजी घेईल, तो बंगालवर राज्य करेल. सर्व हिंदूंनी झेंडे आणि कपाळावर टिळा लावून मिरवणुकींमध्ये सहभागी व्हावे. हिंदू आता एका समुदायाचे उघड तुष्टीकरण आणि रामनवमी उत्सव चिरडून टाकण्याचे प्रयत्न सहन करणार नाहीत.

३. सुवेंदू अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘६ एप्रिल या दिवशी रामनवमीनिमित्त राज्यभरात २ सहस्रांहून अधिक मिरवणुका काढल्या जातील, ज्यामध्ये १ कोटी हिंदू सहभागी होतील. गेल्या वर्षी १ सहस्र मिरवणुकांमध्ये ५० लाख हिंदू सहभागी झाले होते.’

४. गेल्या दुर्गापूजेच्या कालावधीत राज्यात हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करण्यात आली होती. अशा घटनांमागे जिहादी घटक आहेत आणि तृणमूल काँग्रेसचे काही नेते त्यांना साहाय्य करत आहेत, असा आरोपही अधिकारी यांनी या वेळी केला.