‘वर्ष २०२४ मध्ये शाकंभरी नवरात्रीनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत श्री दुर्गादेवीचे पूजन आणि सप्तशती पाठाचे वाचन केले जात होते. हे धार्मिक विधी होतांना तेथे श्री दुर्गादेवीचे चित्र ठेवण्यात आले होते. या चित्राचे श्री दुर्गादेवी आणि श्री गुरु यांच्या कृपेने केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

१. श्री दुर्गादेवीच्या चित्रात जाणवलेले सूक्ष्म स्तरावरील पालट आणि त्यांमागील शास्त्र
१ अ. श्री दुर्गादेवीच्या चित्राकडे पाहिल्यावर प्रथम मारक आणि नंतर तारक शक्ती जाणवणे : मी पहिल्यांदा चित्राकडे पाहिल्यावर मला पुष्कळ मारक शक्ती जाणवली. ‘या मारक शक्तीमुळे माझ्यावर आध्यात्मिक स्तरावर उपाय होत आहेत’, असे मला जाणवले. काही वेळाने हळूहळू शक्ती सहन होण्याएवढी झाल्यावर मला तारक शक्ती अनुभवता आली. मला आलेल्या या अनुभूतीमुळे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत याच क्रमाने सूक्ष्म स्तरावर प्रक्रिया घडली असावी’, असे मला जाणवले.
१ आ. श्री दुर्गादेवीच्या मुखमंडलावर अधिक सजीवता जाणवणे : श्री दुर्गादेवीच्या चित्राचे परीक्षण करतांना माझे लक्ष अधिक करून श्री दुर्गादेवीच्या मुखमंडलाकडे जात होते. मला चित्रातील श्री दुर्गादेवीच्या मुखमंडलावर अधिक सजीवता जाणवत होती. ‘श्री दुर्गादेवीच्या चित्रात ब्रह्मांडातील व्याप्त देवीतत्त्व आकृष्ट होत असून ती शक्ती (क्रियाशक्ती) समष्टी कार्यासाठी प्रक्षेपित होत असल्याचे हे प्रतीक आहे’, असे मला जाणवले.
१ इ. देवीने बोटात धरलेले चक्र संथ गतीत फिरतांना आणि देवीचा आशीर्वाद देणारा हात गुलाबी झालेला दिसणे : श्री दुर्गादेवीच्या चित्राकडे पाहिल्यावर देवीने बोटात धरलेले चक्र संथ गतीत फिरतांना दिसते. तसेच श्री दुर्गादेवीचा आशीर्वाद देणारा हात अधिक गुलाबी झालेला दिसतो. ‘श्री दुर्गादेवीच्या चित्राकडून प्रक्षेपित होत असलेल्या मारक शक्तीमुळे चक्र संथ गतीने फिरतांना, तर तारक शक्तीमुळे आशीर्वाद देणारा हात अधिक गुलाबी झालेला दिसत आहे’, असे जाणवले.
१ ई. श्री दुर्गादेवीच्या संपूर्ण चित्रातून प्रकाश किरणांच्या स्वरूपात बाहेर पडत असतांना दिसणे : श्री दुर्गादेवीच्या संपूर्ण चित्रातून प्रकाश किरणांच्या स्वरूपात बाहेर पडतांना दिसतो. हा प्रकाश संपूर्ण खोलीत अनुमाने ६ मीटर अंतरापर्यंत कार्यरत झालेला दिसतो. ‘श्री दुर्गादेवीच्या चित्रातून काळानुसार समष्टीसाठी आवश्यक सगुण-निर्गुण चैतन्य प्रक्षेपित होत असण्याची ही प्रचीती आहे’, असे माझ्या लक्षात आले.
१ उ. श्री दुर्गादेवीला वाहिलेली फुलांची माळ सूक्ष्मातून हलतांना दिसते. ‘श्री दुर्गादेवीला वाहिलेली फुलांची माळ हलल्यावर त्यातून आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.
१ ऊ. देहभान अल्प होणे आणि ध्यान लागणे : श्री दुर्गादेवीच्या चित्राकडे पाहिल्यावर देह, मन आणि बुद्धी यांवर थेट शक्ती पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित झालेली जाणवते. शक्तीच्या थेट प्रक्षेपणामुळे मन आणि बुद्धी काही वेळ निर्विचार झाल्याने स्वतःच्या देहाचा तोल जात असल्याचे जाणवते. प्रत्यक्षात शक्तीमुळे देहभान अल्प होण्याची ही अनुभूती आहे. यानंतर काही वेळाने हळूहळू डोळे बंद होऊन ध्यान लागते.
२. श्री दुर्गादेवीच्या चित्राची अन्य आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

२ अ. श्री दुर्गादेवीच्या चित्रात असलेले शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांचे प्रमाण : श्री दुर्गादेवीच्या चित्रात शक्तीचे प्रमाण ४० टक्के, तर भाव, चैतन्य, आनंद आणि शांती या सर्वांचे प्रमाण प्रत्येकी १५ टक्के आहे. यांतून चित्रात सगुणत्व (शक्ती) अधिक आहे. ‘वर्तमानकाळात समष्टी कार्यासाठी सगुणत्व आवश्यक आहे. यामुळे निर्गुणाचा प्रभाव असला, तरीही शक्ती कार्यरत आहे आणि अन्य सर्व ऊर्जा (भाव, चैतन्य, आनंद अन् शांती) समप्रमाणात कार्यरत आहेत’, असे लक्षात आले.
२ आ. श्री दुर्गादेवीच्या चित्रातून जनलोक ते चवथ्या पाताळापर्यंत शक्ती प्रक्षेपित होत होती. या चित्रातून पाताळाच्या दिशेने मारक शक्ती आणि जनलोकाच्या दिशेने तारक शक्ती अधिक प्रमाणात कार्यरत होती.
२ इ. ‘सर्वत्रच्या साधकांना साधना करण्यासाठी शक्ती मिळत आहे’, असे जाणवणे : श्री दुर्गादेवीच्या चित्रातील चैतन्य थेट माझ्या सहस्राराच्या माध्यमातून मूलाधारचक्रापर्यंत जात होते. या प्रक्रियेमुळे मूलाधारचक्रातील शक्ती जागृत होत असल्याने मला ‘माझा तोल जाणार’, असे वाटत होते आणि काही वेळानंतर माझे थेट ध्यान लागत होते. ‘सर्वत्रच्या साधकांवर अल्प-अधिक प्रमाणात हीच प्रक्रिया होऊन त्यांना साधना करण्यासाठी शक्ती मिळत आहे’, असे जाणवले.
२ ई. ‘श्री दुर्गादेवीच्या चित्रातून प्राधान्याने तेजतत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे लक्षात आले.
३. श्री दुर्गादेवीच्या चित्रात झालेल्या दैवी पालटांमागील शास्त्र
‘पातळीनुसार साधना’ आणि ‘काळानुसार साधना’ हे अध्यात्मातील सिद्धांत आहेत. या सिद्धांतानुसारच ईश्वरही भक्ताच्या पातळीनुसार आणि त्या काळानुसार त्याने केलेल्या उपासनेचे फळ देतो. यामुळे भक्ताला आवश्यक ती शक्ती पंचमहाभूतांतील विविध माध्यमांतून प्राप्त होते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी उच्च असून ते समष्टी संत आहेत. यामुळे शाकंभरी नवरात्रीनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत श्री दुर्गादेवीचे पूजन आणि सप्तशती पाठाचे वाचन होतांना काळानुसार समष्टीसाठी सगुण शक्ती आवश्यक असल्याने त्या उपासनेची शक्ती श्री दुर्गादेवीच्या चित्रातून प्रगट झाली.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांसारखे उच्च आध्यात्मिक पातळीचे संत सगुणाच्या बंधनाच्या पलीकडे असतात. यामुळे त्यांच्या संपर्कातील वस्तू आणि अन्य घटक हेही सगुण बंधनाच्या पलीकडे जाऊन चैतन्य प्रक्षेपण करण्याचे माध्यम होतात. असेच श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भातही घडत आहे. त्यामुळे चित्र कलेच्या अनुषंगाने तेवढे सात्त्विक नसले, तरीही त्यातून अधिक प्रमाणात शक्तीशी, तसेच भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्याशी संबंधित, तसेच अन्य विविध सूक्ष्म अनुभूती प्राप्त होतात.
४. कृतज्ञता
‘श्री दुर्गादेवी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला हे सूक्ष्म परीक्षण करता आले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२४)
|