Indian Youth Political Engagement : ८१ टक्के भारतीय तरुणांचा राजकीय पक्षांवर विश्वास नाही ! – सर्वेक्षणाचे निरीक्षण

नवी देहली – ‘व्हॉइस फॉर इन्क्लूजन’ (समावेशासाठी आवाज), ‘बिलाँगिंग अँड एम्पॉवरमेंट’ (आपुलकीची भावना आणि सक्षमीकरण) आणि ‘प्रोजेक्ट पोटेंशियल’ (क्षमतेसंदर्भातील प्रकल्प) यांच्या अहवालानुसार ८१ टक्के भारतीय तरुणांमध्ये देशभक्तीची तीव्र भावना आहे; मात्र राजकीय पक्षांवर त्यांचा विश्वास नाही. हा अहवाल ४ सहस्र ९७२ तरुणांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. हे सर्वेक्षण जून ते ऑगस्ट २०२४ या काळात करण्यात आले आहे.

अहवालातील प्रमुख निरीक्षणे !

१. वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अनेक तरुणांकडून मतदान करण्यात आले नाही. यातून लक्षात आले की, भारतीय तरुण हळूहळू राजकारणापासून दूर जात आहेत.

२. देशातील २९ टक्के तरुण राजकारणापासून पूर्णपणे दूर आहेत. २६ टक्के तरुण  कोणत्याही पक्षाशी संलग्न नसतांनाही राजकीय चर्चेत भाग घेतात. केवळ ११ टक्के तरुण कोणत्यातरी पक्षाचे सदस्य आहेत.

३. ४९ टक्के तरुणांना सामाजिक सेवा उपक्रम चालू करायचा आहे; परंतु त्यांपैकी ५८ टक्के तरुणांना निधीची कमतरता आहे आणि ३९ टक्के तरुणांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे.

४. तरुण पारंपरिक राजकारणापेक्षा सूत्रांवर आधारित सहभागाला प्राधान्य देत आहेत. ते पर्यावरण, लिंग समानता, शिक्षण आणि बेरोजगारी यांसारख्या सूत्रांवर अधिक सक्रीय आहेत. (यातून ते ‘वोकिझम्’ या फसव्या सामाजिक न्यायाचा मुखवटा ओढलेल्या साम्यवादाकडे जाता कामा नये, याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. – संपादक) भारतातील तरुण आता केवळ मतदार राहिलेले नाहीत, त्यांना धोरणनिर्मितीत सहभाग हवा आहे.

संपादकीय भूमिका

गेल्या ७८ वर्षांचा इतिहास पाहिल्यावर तरुणांचाच नाही, तर आबालवृद्धांचाही राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नाही. भविष्यात जनतेने पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !