प्रसंग १ : गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्ण सिद्ध नसणे : डॉक्टर, एक महिन्यापासून ब्लीडिंग (रक्तस्राव) होत आहे. कालपासून अजूनच ते वाढलंय. पोटातही दुखत सारख.. थकून गेलीये हो मी ! सतत रक्तस्रावाने पांढरा पडलेला चेहरा आणि ४५ वर्षांतच थकलेलं शरीर घेऊन आलेल्या महिला रुग्णाच्या डोळ्यांत पाणी होते. मी रुग्ण महिलेच्या नवर्याकडे बघून म्हटले, ‘‘अहो, पण गेल्या वेळी आपले याविषयी बोलणे झाले होते. त्यांना गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्याविषयी काही विचार केलात का तुम्ही ?’’ रुग्ण महिलेचा नवरा हताशपणे म्हणाला, ‘‘मॅडम, अजून दोन डॉक्टरांनीपण हिला हेच सांगितलंय. आम्ही सगळे समजावून थकलो; पण ही शस्त्रक्रियेसाठी सिद्धच होत नाही. हिच्या या सततच्या आजारपणाने मी आणि मुलंपण कंटाळून गेलो आहोत.’’
प्रसंग २ : गर्भाशय काढून टाकण्याची रुग्णाने अतीघाई करणे : ३७ वर्षांची रुग्ण महिला पतीसमवेत सर्व सिद्धतेनिशी आली होती. ती म्हणाली, ‘‘डॉक्टर, मला आता ही (गर्भाशय) कटकट नकोय. काढून टाकायची आहे मला ही गर्भपिशवी. सारखं अंगावरून पांढरं जातंय.’’ मी म्हणाले, ‘‘अगं, तुला या शस्त्रक्रियेची आवश्यकताच नाही. तुझं वय पुष्कळ अल्प आहे आणि साध्या औषधोपचारांनी तुझा त्रास न्यून होऊ शकतो. शस्त्रक्रियेचा हट्ट बरा नाही.’’ अशा सल्ल्यांनंतर दुर्दैवाने असे रुग्ण कधीकधी दुसरीकडे जाऊन शस्त्रक्रिया करून घेतात. यामध्ये खेड्यापाड्यातील स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. विशेषकरून ऊसतोड कामगार स्त्रिया मासिक पाळीच्या त्रासाने कामाचे दिवस खराब होऊ नयेत; म्हणून काही कारण नसतांना गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करून घेतात. यात त्यांना उत्तेजन देणारे त्यांचे कामावरील मुकादम आणि दुर्दैवाने अनैतिक ‘प्रॅक्टिस’ करणारे काही आधुनिक वैद्य सामील असतात. अतिशय अल्प वयात होणार्या या शस्त्रक्रिया थांबवण्यासाठी आता सरकारनेही पावले उचलली आहेत.
१. गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेची प्राथमिक माहिती !
बघितलेत ना, हा आश्चर्यचकित करणारा विरोधाभास ? सध्याच्या आपल्या समाजातील स्थितीविषयी हे निखळ सत्य आहे. गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे ‘हिस्टेरेक्टॉमी’ (hysterectomy). ही बर्यापैकी वादात सापडलेली शस्त्रक्रिया आहे. याची नितांत आवश्यकता असणार्या स्त्रिया वर्षानुवर्षे दुखणं अंगावर काढतात आणि अजिबात गरज नसलेल्या स्त्रिया विशेषकरून ग्रामीण भागात सर्रास ही शस्त्रक्रिया करून घेतांना दिसतात. म्हणून ठरवलं की, आज जरा ‘हिस्टेरेक्टॉमी’विषयी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया) माहिती घेऊया.
२. शारीरिक त्रासाच्या कोणत्या प्रकारात ही शस्त्रक्रिया अपरिहार्य ठरते ?
२ अ. गर्भाशयाला किंवा गर्भाशयाच्या मुखाला (सेर्व्हिक्स) झालेली किंवा होऊ शकणारी कर्करोगाची लागण ! : आपल्या देशात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वांत अधिक आहे. याविषयीची तपासणी लैंगिक संबंध चालू झाल्यापासून प्रतीवर्षी स्त्रीने करून घेणे अपेक्षित आहे; मात्र भारतातील स्त्रिया आणि समाज यांमध्ये स्वतःच्या आरोग्याविषयी कमालीची अनास्था असल्यामुळे ही तपासणी जवळजवळ केलीच जात नाही. चाळीशीच्या आसपास असलेल्या स्त्रियांना अंगावरून पांढरे जाणे, खाज सुटणे, संबंधांनंतर लाल जाणे असे त्रास चालू झाल्यावरच त्या स्त्रीरोगतज्ञांकडे येतात. अशा वेळी कर्करोगाच्या निदानासाठी ‘ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस’ आणि ‘लिक्विड बेस्ड सायटोलॉजी’(HPV + LBC) यांसारख्या अचूक तपासण्या करता येतात. या तपासण्यांमध्ये कर्करोगाचा धोका आढळल्यास ही शस्त्रक्रिया तातडीने करून घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी जराही चालढकल न करता स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला ऐकणे आणि शस्त्रक्रिया करून घेणे हेच रुग्णाच्या हिताचे असते.
२ आ. फायब्रॉईडच्या गाठी मोठ्या आणि अधिक संख्येत असणे : फायब्रॉईडच्या गाठी कर्करोगाच्या शक्यतो कधीच नसतात; पण त्या ५ सें.मी.च्यावर, संख्येने अधिक अन् गर्भाशयाच्या मध्यभागी असतील, तर पुष्कळ त्रासदायक ठरू शकतात. अशा प्रकरणांमध्ये (केसेसमध्ये) अनियमित आणि अतीरक्तस्राव दिसून येतो.
बर्याच वेळा स्त्रियांनी हे दुखणे अंगावर काढल्याने शरिरातील रक्ताचे प्रमाण अक्षरशः निम्म्यावर येते. मग रक्त भरून लगेच शस्त्रक्रिया करणे भाग पडते. ही वेळ येऊ नये, यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे हितकारक आहे. एखाद-दुसरी गाठ असेल, तर फक्त गाठ काढून गर्भाशय तसेच ठेवता येऊ शकते; पण हे स्त्रीरोगतज्ञच ठरवू शकतात.
२ इ. हॉर्मोन्सचे असंतुलन : हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळेसुद्धा अनियमित अतीरक्तस्राव होऊ शकतो. रुग्ण तरुण असेल, तर हॉर्मोन्सच्या गोळ्यांनी हा रक्तस्राव थांबवला जाऊ शकतो; पण रुग्णाचे वय ४० च्या जवळ असेल, तर हॉर्मोन्सच्या गोळ्या धोकादायक ठरू शकतात. मग काही वेळा गर्भाशय काढण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. अशा वेळी आधी क्युरेटिंग (गर्भपिशवी स्वच्छ करणे) करून बायोप्सी घेतली जाते आणि त्यावर निर्णय ठरवला जातो. ‘कर्करोगाची शक्यता आहे’, असे वाटल्यास शस्त्रक्रिया केली जाते.
२ ई. ‘इंडोमेट्रिओसीस’ आजार असल्यास : ‘इंडोमेट्रिओसीस’ नावाच्या आजारात रुग्णाला सतत पोटदुखी आणि कंबरदुखी यांचा त्रास असतो, तसेच गर्भाशयाशेजारी असणार्या अंडाशयाच्या वेगवेगळ्या आजारांसाठीसुद्धा ही शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
२ उ. गर्भाशय खाली घसरणे : कधीकधी योनीमार्ग आणि गर्भाशयाला आधार देणारे स्नायू अन् पेशी शिथील झाल्यामुळे गर्भाशय खाली घसरते, याला ‘प्रोलॅप्स’ असे म्हणतात. अशा वेळी लघवीची पिशवीसुद्धा गर्भाशयासह खाली येते. अशा घटनांमध्ये स्त्रियांना एकावेळी लघवी पूर्ण न होणे, लघवीचा जंतूसंसर्ग होणे असे त्रास होतात. बाळंतपणाच्या वेळी बाळाचे वजन अधिक असणे, अवघड प्रसूती अशा घटनांमध्ये हे प्रमाण जास्त आढळते. या स्त्रियांमध्ये योनीमार्गाद्वारे गर्भाशय काढण्याची आणि त्याच वेळी योनीमार्गाची जागा आवळून घेण्याची शस्त्रक्रिया केली जाते. या व्यतिरिक्तही गर्भाशय काढण्याची काही कारणे असू शकतात. प्रत्येक रुग्णाच्या वैद्यकीय अहवालांवर ते अवलंबून आहे.
३. गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया कोणत्या पद्धतीने करतात ? कोणती पद्धत योग्य ठरेल ?
ही शस्त्रक्रिया मुख्यतः तीन पद्धतीने करता येते.
३ अ. पोटावरून टाक्यांची शस्त्रक्रिया (ॲबडॉमिनल हिस्टेरेक्टॉमी) : या पद्धतीत ओटीपोटावर ९ ते १० सें.मी.चा छेद घेऊन पारंपरिक पद्धतीने गर्भाशय काढले जाते. मोठा फायब्रॉईड किंवा कर्करोगाची गाठ असल्यास ही पद्धत अधिक सोयीची आहे. तसेच विशेष गुंतागुंतीची केस असेल, तर ही पद्धत उत्तम !
३ आ. योनीमार्गाद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया (व्हॅजिनल हिस्टेरेक्टॉमी) : या पद्धतीने शक्यतो ‘प्रोलॅप्स’ असणार्या स्त्रियांची शस्त्रक्रिया केली जाते. या स्त्रियांच्या योनीमार्गात काही प्रमाणात टाके घातले जातात. काही वेळा ‘प्रोलॅप्स’ नसतांनाही योनीमार्गाद्वारे ही शस्त्रक्रिया करता येते.
३ इ. दुर्बिणीद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कोपिक हिस्टेरेक्टॉमी) : ही सध्याची सर्वांत प्रगत पद्धत आहे. या पद्धतीत पोटावर ४ अतिशय छोटे छेद देऊन त्यातून शस्त्रक्रियेची साधने पोटात घालून शस्त्रक्रिया केली जाते आणि गर्भाशय योनीमार्गातून बाहेर काढले जाते. ही पद्धत रुग्णासाठी अतिशय सोयीस्कर आणि श्रेयस्कर आहे. विशेषकरून मधुमेह असलेल्या, तसेच स्थूल असलेल्या स्त्रियांमध्ये टाके लगेच भरून येतात. त्या लगेच हालचाल किंवा प्रतिदिनची कामे चालू करू शकतात. या पद्धतीत एकूणच रुग्णांची बरे होण्याची प्रक्रिया वेगाने होते.
गर्भाशय शस्त्रक्रियेविषयीची ही माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल.
४. व्याधीग्रस्त अवयव वेळीच काढा !
लक्षात ठेवा, आपल्या शरिरातील कोणताही अवयव व्याधीग्रस्त झाला असेल, तर तो वेळेत काढणे श्रेयस्कर आणि सुरक्षित असते; पण काही सबळ कारण नसतांना शस्त्रक्रिया केल्यास त्याचा त्रास होऊ शकतो.
– डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्वतज्ञ, कोथरूड, पुणे. (साभार : फेसबुक)