लहान मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी सोपा उपाय

‘सध्या लहान मुलांना धूळ, धूर, अत्याधिक ऊन, सूक्ष्म जंतू इत्यादी अनेक प्रकारच्या ‘ॲलर्जी’ (विशिष्ट पदार्थांचे शिररावर होणारे त्रासदायक परिणाम) संभावतात. यामुळे काही पालक त्यांच्या पाल्यांची काळजी घेण्यात अतिशयोक्ती करतांना दिसतात; पण मुलांची रोगप्रतिकार क्षमता नैसर्गिकरित्या वाढण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून प्रयत्न होत नाहीत.

वैद्य समीर मुकुंद परांजपे

खरे तर मुलांना सर्व पदार्थ आणि वातावरण यांची त्यांना सवय व्हायला हवी. त्यामुळे मुले लहान असतात तेव्हाच त्यांना अधूनमधून माती, ऊन, पाऊस, थंडी इत्यादी वातावरणात स्वच्छंद मनोसक्त खेळू द्यावे. यामध्ये मुलांना स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाची शिकवण मिळावी; म्हणून पालकांनी मुलांना कोणत्याही सूचना देऊ नये. त्यांच्यावर पुष्कळ निर्बंध न लावता, मोकळेपणाने खेळून त्यांच्या बालपणाचा आनंद लुटू द्यावा. त्यांच्यावर लांबून लक्ष नक्की ठेवावे; किंतु त्यांच्या खेळामध्ये आडकाठी आणू नये.

प्रतिकात्मक चित्र

यामध्ये जर कोणते मूल धडपडले, त्याला जरा लागले, तरी काही बिघडत नाही. त्याही अनुभवातून मुलांना जाऊन स्वतःला सावरण्यास शिकू दे. बाहेरील धूळ, धूर, अत्याधिक ऊन इत्यादींविषयी चिंता करू नये. त्यांच्या त्वचेला या सर्व वातावरणाची सवय होऊ द्यावी. मुले उन्हात खेळ्यावर त्यातून त्यांना सूर्याची ऊर्जा आणि ‘विटॅमिन डी’ मिळून त्यांची रोगप्रतिकार क्षमता नैसर्गिकरित्या वाढणार आहे.

 (सौजन्य : वैद्य समीर मुकुंद परांजपे)

कधीतरी मुलांना गोठ्यात नेऊन खेळवावे. तिथे त्यांचा संपर्क गायी, म्हशी, वासरू, गोमय आणि गोमूत्र यांच्याशी येऊन तेथील वातावरणाची मुलांना ओळख होईल. या सर्वांमुळे मुले नैसर्गिकरित्या अधिक सक्षम आणि सुदृढ होतील; म्हणून आवश्यक ती काळजी घेऊन लहान मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी हा साधा-सोपा उपाय अवश्य करून त्याचा मुलांना होणारा लाभ अनुभवा !’ (२४.१.२०२३)

– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी.
(संपर्कासाठी ई-मेल :  [email protected])