शक्‍तीचा सिद्धांत

श्री. दुर्गेश परुळकर

विश्‍वातील सर्वांत मोठे न्‍यायालय म्‍हणजे इतिहास ! इतिहासाच्‍या न्‍यायालयात दिला गेलेला निर्णय किंवा न्‍याय नेहमीच शक्‍तीशाली राष्‍ट्राच्‍या किंवा व्‍यक्‍तीच्‍या बाजूने दिला गेला आहे. इतिहासाने न्‍याय, नैतिकता आणि सत्‍य यांना अनुसरून कधीही निकाल दिला नाही. न्‍याय, नैतिकता आणि सत्‍य यांना अनुसरून इतिहासाने निकाल दिला असता, तर हिंदुस्‍थानच्‍या भूसीमा कधीच आक्रसत (कमी) गेल्‍या नसत्‍या. हिंदुस्‍थानने कधीही कुणावरही आक्रमण केले नाही. कुणाच्‍याही जीवनमूल्‍यांना नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न सुद्धा हिंदुस्‍थानने केलेला नाही. तसेच कुणाचीही धर्मस्‍थळे आणि धर्मग्रंथ यांना नष्‍ट केले नाही. हिंदुस्‍थानची बाजू नेहमीच न्‍याय, नैतिकता आणि सत्‍य यांची होती, तरीसुद्धा त्‍याचा काहीही उपयोग झाला नाही. हिंदुस्‍थानकडे शक्‍ती असूनही तिचा योग्‍य प्रकारे उपयोग अतिरेकी अहिंसेच्‍या आहारी जाऊन कधी केला गेला नाही. इतिहासाने मात्र नेहमीच बलवंताची बाजू घेतली आहे. ज्‍यांनी कर्मापेक्षा विचारांना आणि शक्‍तीपेक्षा न्‍यायाला अधिक महत्त्व दिले, त्‍यांना कधीही इतिहासाच्‍या न्‍यायालयात न्‍याय मिळाला नाही. राष्‍ट्र बलवान झाल्‍यावाचून कधीही न्‍याय मिळत नाही आणि मिळणार नाही. हा इतिहासाच्‍या न्‍यायालयाने सांगितलेला शक्‍तीचा सिद्धांत आपण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ लेखक आणि व्‍याख्‍याते, डोंबिवली. (६.३.२०२३)