इस्‍लामी राजवटीत रामनामाचा उपयोग

श्रीराम संपूर्ण हिंदु समाजाचे आराध्‍य दैवत आहेत; म्‍हणून स्‍वातंत्र्यवीर सावरकर म्‍हणतात, ‘‘ज्‍या दिवशी हिंदू समाज प्रभु श्रीरामांना विसरेल, त्‍या दिवशी हिंदुस्‍थानला ‘राम’ म्‍हणावे लागेल.’’ याचा अर्थ ज्‍या दिवशी हिंदु समाजाला श्रीरामांचे विस्‍मरण होईल, त्‍याच दिवशी हिंदुस्‍थान ‘राष्‍ट्र’ म्‍हणून या भूतलावर अस्‍तित्‍वात रहाणार नाही. रामराज्‍य हे केवळ आपल्‍या देशातच नव्‍हे, तर संपूर्ण जगातील सर्वांत ‘आदर्श राज्‍यव्‍यवस्‍था असलेले राज्‍य’ म्‍हणून मान्‍यता पावलेले आहे. या राज्‍यातील मानवी समाज हा स्‍वयंशासित समाज होता. श्रीराम हे न्‍यायनिष्‍ठ, धर्मनिष्‍ठ, संस्‍कृतीनिष्‍ठ आणि नीतीमान मर्यादा पुरुषोत्तम म्‍हणून सर्वांनाच वंदनीय आहेत. नैतिकतेचा उदय झाला की, विकृतीचा अस्‍त होऊन संस्‍कृतीच्‍या दिवाळीचा आरंभ होतो. यासाठीच प्रभु श्रीरामांचे स्‍मरण असेल, तर हिंदु समाज राजकीय पारतंत्र्यात जरी गेला, तरी ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणून जिवंत रहातो. श्रीरामांच्‍या पराक्रमाचा वारसा जतन करतांना कणखर आणि प्रतिकारनिष्‍ठ समाज त्‍या परवशतेच्‍या तिमिरात आपले अस्‍तित्‍व टिकवून ठेवू शकतो. या दृष्‍टीने पहाता हिंदु समाजाच्‍या राष्‍ट्रीय जीवनात प्रभु श्रीराम यांना अनन्‍यसाधारण महत्त्व आहे.

आपल्‍या देशाची संस्‍कृती ही शांतता, सहिष्‍णुता आणि मानवता यांचा पुरस्‍कार करणारी आहे. मानवाचे जीवन उन्‍नत व्‍हावे, यासाठी आपल्‍या देशातील ऋषिमुनी आणि पुण्‍यश्‍लोक राजे यांनी स्‍वतःचे संपूर्ण आयुष्‍य खर्ची घातले. त्‍या काळात राक्षसी प्रवृत्तीने संपूर्ण मानवी समाजाला त्रस्‍त करून सोडले होते. अनैतिकता आणि अत्‍याचार यांना पारावार राहिला नव्‍हता. अशा वेळी हातात शस्‍त्र धरून राक्षसी प्रवृत्ती नष्‍ट करण्‍यासाठी अनेक राजांनी आपल्‍या पराक्रमाची शर्थ केली. त्‍या सर्वांचा आदर्श होते श्रीराम !

श्री. दुर्गेश परुळकर

१. इस्‍लाम म्‍हणजे अरबी साम्राज्‍याच्‍या अतृप्‍त तृष्‍णेचा आततायी अविष्‍कार !

आपल्‍या देशावर पहिले इस्‍लामी आक्रमण केले ते महंमद बिन कासिमने ! ‘आपल्‍याकडील साधूसंतांच्‍या पंथासारखाच इस्‍लाम हा एक धार्मिक पंथ आहे’, अशी समजूत त्‍या काळातील लोकांची होती. ‘संत आणि त्‍यांचे अनुयायी कत्तल, बलात्‍कार, अत्‍याचार, छळ, बाटवाबाटवी, जाळपोळ, लुटमार करत नाहीत’, अशी दृढ श्रद्धा आपल्‍या त्‍या वेळच्‍या समाजाची होती. या श्रद्धेला इस्‍लामच्‍या आक्रमणाने पार धुळीला मिळवले. मूर्तीपूजा आर्य आणि ब्राह्मो समाज यांनाही मान्‍य नव्‍हती; पण म्‍हणून या दोन्‍ही समाजांनी कधीही मंदिरांवर घणाचे घाव घालून मंदिरातील मूर्ती भंग केल्‍या नाहीत ? कि मंदिरे भुईसपाट केली नाहीत ? मात्र इस्‍लामने मूर्तीपूजेला विरोध करतांना हिंदूंची अगणित मंदिरे उद़्‍ध्‍वस्‍त केली. हिंदूंच्‍या देवीदेवतांच्‍या मूर्ती भंग करण्‍यात इस्‍लाम धर्मियांना पौरुषत्‍व वाटत होते. वास्‍तविक पहाता इस्‍लाम हा धर्म किंवा पंथ नसून अरबी साम्राज्‍याच्‍या अतृप्‍त तृष्‍णेचा आततायी अविष्‍कार होता.

२. प्रभु श्रीरामांमुळे हिंदुस्‍थानचे इस्‍लामी राष्‍ट्रात रूपांतर न होणे

इस्‍लामी आक्रमकांनी जगातील अल्‍जेरिया, मोरक्‍को, सूदान, इजिप्‍त, जॉर्डन, इराण, इराक, अफगाणिस्‍तान, मलेशिया, इंडोनेशिया या देशांवर आक्रमण करून त्‍या देशांचे इस्‍लामी राष्‍ट्रात रूपांतर केले. आपल्‍या देशावर इस्‍लामच्‍या अनुयायांनी आक्रमण केले. स्‍वतःची सत्ता प्रस्‍थापित केली. आपल्‍या देशातील अनेक मंदिरे नष्‍ट केली; पण आपल्‍या हिंदुस्‍थानचे त्‍यांना इस्‍लामी राष्‍ट्रात रूपांतर करता आले नाही; कारण येथील समाज आणि राज्‍यकर्ते यांच्‍या हृदयात प्रभु श्रीरामांविषयीची श्रद्धा जागृत होती. रामायणाच्‍या संस्‍काराने निर्माण झालेली लढाऊवृत्ती आणि प्रतिकारनिष्‍ठा सहजासहजी नष्‍ट होणारी नव्‍हती. आजही ती प्रखरनिष्‍ठा जनतेच्‍या हृदयात तशीच जागी आहे.

३. हिंदूंनी प्रभु श्रीरामांचा इतिहास विसरावा, यासाठी करण्‍यात येत असलेले षड्‍यंत्र !

आपली सहस्रो वर्षांची पराभवाची परंपरा नष्‍ट करून विजयाची परंपरा निर्माण करणार्‍या छत्रपती शिवरायांवर त्‍यांची माता जिजाबाई यांनी रामायण आणि महाभारत यांचे संस्‍कार केले होते. याकडे आपल्‍याला दुर्लक्ष करता येत नाही. श्रीरामांच्‍या नामाचा महिमा एवढा आहे की, सीतामाईचे अपहरण करणार्‍या रावणाचा भाऊ बिभीषण हा प्रभु श्रीरामांचा भक्‍त होता. रावणाच्‍या विरोधात श्रीरामांच्‍या बाजूने उभा रहाणारा बिभीषण सात्त्विकता, सत्‍य आणि न्‍याय यांचा पुरस्‍कार करणारा संस्‍कृतीनिष्‍ठ आहे. प्रतिकूलतेत सुद्धा बिभीषणाने श्रीरामांच्‍या पदपथावरून वाटचाल चालू ठेवली. तोच वारसा आजही जतन केला जात आहे.

‘प्रभु श्रीरामांचा हा वारसा जोपर्यंत हिंदू समाज विसरत नाही, तोपर्यंत या देशात इस्‍लामी राजवट प्रस्‍थापित करता येणार नाही’, असा संदेश हिंदुस्‍थानचा इतिहास जगाला देतो. त्‍यासाठीच श्रीरामांचे चरित्र कलंकित करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. ‘श्रीराम कधीही जन्‍माला आले नाहीत, रामायण काल्‍पनिक आहे. तो इतिहास नाही’, असे जे सांगितले जाते, त्‍यामागचे कारणच हे आहे की, हिंदू समाजाला श्रीरामांचा विसर पडावा.

४. हिंदु धर्म आणि राष्‍ट्र जिवंत ठेवण्‍यासाठी समर्थांनी ‘दासबोधा’तून केलेले मार्गदर्शन

प्रभु श्रीरामांची आठवण छत्रपती शिवरायांच्‍या काळात अधिक प्रकाशमान केली ती समर्थ रामदासस्‍वामी यांनी ! आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही अशा इस्‍लामी सत्तांचा दबदबा होता. त्‍याच वेळी समर्थ रामदासस्‍वामी यांनी आपल्‍या संपूर्ण समाजाला प्रभु श्रीरामांचे विस्‍मरण होऊ नये, याची काळजी घेतली. त्‍यांनी ‘दासबोधा’च्‍या ११ व्‍या दशकातील ५ वा समास आणि १९ व्‍या दशकातील ९ वा समास यांतून न्‍यायनिष्‍ठ अन् बुद्धीनिष्‍ठ भूमिकेतून समाजाला केलेल्‍या बोधाला स्‍थळकाळाच्‍या मर्यादा नाहीत. परकीय आक्रमकांच्‍या, मानवी अत्‍याचाराच्‍या आणि राजसत्तेच्‍या काळात आपले अस्‍तित्‍व, आपली संस्‍कृती, आपला धर्म, आपले राष्‍ट्र जिवंत ठेवण्‍यासाठी काय करावे ? याविषयी अत्‍यंत प्रभावी शब्‍दात ‘दासबोध’ या ग्रंथातून समर्थ रामदासस्‍वामी यांनी मार्गदर्शन केले आहे.

देव मस्‍तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवावा की बुडवावा । धर्मसंस्‍थापनेसाठीं ॥

अर्थ : धर्मरक्षणासाठी आणि धर्माची संस्‍थापना करण्‍यासाठी देवाला श्रेष्‍ठ मानून त्‍याचा जयजयकार करावा अन् संपूर्ण प्रांत पिंजून काढावा.

मारितां मारितां मरावें । तेणें गतीस पावावें ।
फिरोन येतां भोगावें । महद़्‍भाग्‍य ॥

अर्थ : दुष्‍टांचा संहार करता करता मरण आले, तर चांगली गती प्राप्‍त होईल. जिवंत राहिल्‍यास स्‍वराज्‍याचा उपभोग घेण्‍याचे महद़्‍भाग्‍य प्राप्‍त होईल.

धटासी आणावा धट । उद्धटासी पाहिजे उद्धट ॥
खटनटासी खटनट । अगत्‍य करी ॥

– दासबोध, दशक १९, समास ९, श्‍लोक ३०

अर्थ : दांडग्‍यासाठी दुसरा दांडगा योजावा. उर्मट माणसास दुसरा उर्मटच योजला पाहिजे. लुच्‍चा असेल त्‍यास दुसर्‍या लुच्च्या माणसासमोर उभे करावे. याप्रमाणे ‘जशास तसे’ अगत्‍य योजावे.

राजकारणाची द्वारे । ती काय जाणती गव्‍हारे ।

समरांगणी रांडा पोरे । काय करिती ॥

– श्रीसमर्थांची गाथा, पद १५३०

अर्थ : राजकारणाच्‍या गोष्‍टी सामान्‍य लोकांना कळणार नाहीत. युद्धभूमीवर स्‍त्रिया आणि मुलांचे काहीही काम नाही.

मराठा तितुका मेळवावा । महाराष्‍ट्र धर्म वाढवावा ।
येविषयीं न करितां तकवा । पूर्वज हांसती ॥

अर्थ : सर्व मराठ्यांना एकत्र करावे आणि सर्वत्र महाराष्‍ट्र धर्म वाढवावा. हे कार्य करण्‍यासाठी परिश्रम घेतले नाहीत, तर पूर्वज आपला उपहास करतील.

बहुत लोक मेळवावे । एक विचारें भरावे ।
कष्‍ट करोनी घसरावें । म्‍लेंच्‍छावरी ॥

अर्थ : पुष्‍कळ लोकांचे संघटन करावे. त्‍यांना (धर्मसंस्‍थापनेच्‍या) एकाच विचाराने प्रेरित करावे. त्‍यासाठी पुष्‍कळ श्रम घ्‍यावेत आणि मग शत्रूवर तुटून पडावे.

५. तत्‍कालीन भेदरलेल्‍या समाजाला रामनाम सांगून समर्थांनी आश्‍वस्‍त करणे !

मुसलमानांच्‍या राजवटीत मंदिरांचा विध्‍वंस केला जात होता, देवाच्‍या मूर्ती फोडल्‍या जात होत्‍या, देवालये उद़्‍ध्‍वस्‍त केली जात होती. अशा वेळी धर्म आणि संस्‍कृती टिकून रहावी अन् त्‍यासह समाजाने घाबरून जाऊ नये; म्‍हणून समर्थांनी बुद्धीपुरस्‍सर मारुति मंदिरांची ११ ठिकाणी स्‍थापना केली. ही सारी ११ मंदिरे प्रभु श्रीरामांचा दास-वीर मारुतीची होती. भेदरलेल्‍या, घाबरलेल्‍या समाजाला समर्थांनी ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा १३ अक्षरांचा महामंत्र दिला. यालाच ‘त्रयोदशाक्षरी मंत्र’ म्‍हणतात.

(क्रमशः)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, ​डोंबिवली​. (१.२.२०२३)​

भाग २ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/658107.html