इस्‍लामी राजवटीत रामनामाचा उपयोग

श्रीराम संपूर्ण हिंदु समाजाचे आराध्‍य दैवत आहेत म्‍हणून स्‍वातंत्र्यवीर सावरकर म्‍हणतात, ‘‘ज्‍या दिवशी हिंदु समाज प्रभु श्रीरामांना विसरेल, त्‍या दिवशी हिंदुस्‍थानला ‘राम’ म्‍हणावे लागेल.’’ याचा अर्थ ज्‍या दिवशी हिंदु समाजाला श्रीरामांचे विस्‍मरण होईल, त्‍याच दिवशी हिंदुस्‍थान ‘राष्‍ट्र’ म्‍हणून या भूतलावर अस्‍तित्‍वात रहाणार नाही. रामराज्‍य हे केवळ आपल्‍या देशातच नव्‍हे, तर संपूर्ण जगातील सर्वांत ‘आदर्श राज्‍यव्‍यवस्‍था असलेले राज्‍य’ म्‍हणून मान्‍यता पावलेले आहे. या राज्‍यातील मानवी समाज हा स्‍वयंशासित समाज होता. श्रीराम हे न्‍यायनिष्‍ठ, धर्मनिष्‍ठ, संस्‍कृतीनिष्‍ठ आणि नीतीमान मर्यादा पुरुषोत्तम म्‍हणून सर्वांनाच वंदनीय आहेत. नैतिकतेचा उदय झाला की, विकृतीचा अस्‍त होऊन संस्‍कृतीच्‍या दिवाळीचा आरंभ होतो. यासाठीच प्रभु श्रीरामांचे स्‍मरण असेल, तर हिंदु समाज राजकीय पारतंत्र्यात जरी गेला, तरी ‘हिंदु राष्‍ट्र’ म्‍हणून जिवंत रहातो. २८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘इस्‍लाम म्‍हणजे अरबी साम्राज्‍याच्‍या अतृप्‍त तृष्‍णेचा आततायी आविष्‍कार, प्रभु श्रीरामांमुळे हिंदुस्‍थानचे इस्‍लामी राष्‍ट्रात रूपांतर न होणे, हिंदु धर्म आणि राष्‍ट्र जिवंत ठेवण्‍यासाठी समर्थांनी ‘दासबोधा’तून केलेले मार्गदर्शन, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

भाग १ मार्गिका : https://sanatanprabhat.org/marathi/657771.html

श्री. दुर्गेश परुळकर

६. हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना झाल्‍यावर समर्थांनी केलेला उद़्‍घोष

राजमाता जिजाबाई यांच्‍या शिवबाने रोहिडेश्‍वराच्‍या मंदिरात हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या स्‍थापनेची शपथ घेतली. छत्रपती शिवरायांनी त्‍यांच्‍या काळातील सर्व इस्‍लामी सत्तांना स्‍वतःच्‍या टाचेखाली दाबून ‘हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना’ केली. त्‍या वेळी समर्थ रामदासस्‍वामी म्‍हणाले…

‘‘बुडाला औरंग्‍या पापी । म्‍लेंचसंव्‍हार जाहाला ।
मोडलीं मांडली छेत्रें । आनंदवनभुवनीं ॥

अर्थ : पापी औरंगजेबाचा नाश झाला. म्‍लेंच्‍छसंहार झाला. त्‍यांनी भग्‍न केलेली क्षेत्रे पुन्‍हा उभारली गेली. या भूमीवर पुन्‍हा ‘आनंदवन’ निर्माण झाले.

बुडाले भेदवाही ते । नष्‍ट चांडाळ पातकी ।
ताडिले पाडिले देवें । आनंदवनभुवनीं ॥

अर्थ : नीच, पातकी, भेद निर्माण करणारे, देवतांच्‍या मूर्ती तोडून-पाडून टाकणारे लोक नष्‍ट झाले. या भूमीवर पुन्‍हा ‘आनंदवन’ निर्माण झाले.

गळाले पळाले मेले । जाले देशधडी पुढें ।
निर्मळ जाहाली पृथ्‍वी । आनंदवनभुवनीं ॥

अर्थ : या देशाला त्रास देणारे लोक नाहीसे झाले आणि ही पृथ्‍वी जणू निर्मळ झाली. त्‍यामुळे या भूमीवर पुन्‍हा ‘आनंदवन’ निर्माण झाले.

उदंड जाहालें पाणी । स्नान संध्‍या करावया ।
जप तप अनुष्‍ठाने । आनंदवनभुवनीं ॥

अर्थ : स्नानसंध्‍या, जपतप आदी अनुष्‍ठाने करण्‍यासाठी आता अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. या भूमीवर पुन्‍हा ‘आनंदवन’ निर्माण झाले आहे.

बंड पाषांड उडालें । शुध आध्‍यात्‍म वाढलें ।
राम कर्ता राम भोक्‍ता । आनंदवनभुवनीं ॥’’

अर्थ : बंडखोर, पाखंडी वृत्ती नष्‍ट झाली आणि शुद्ध अध्‍यात्‍म वाढले. सर्वांना ‘श्रीरामच कर्ता आणि श्रीरामच भोक्‍ता आहे’, ही जाणीव होऊ लागली. या भूमीवर पुन्‍हा ‘आनंदवन’ निर्माण झाले.

७. श्रीरामाचे नाम आणि चरित्र यांची ओढ जनतेत निर्माण करण्‍यासाठी संत तुलसीदास यांनी केलेले कार्य

अकबराने अनेक हिंदूंना गुलाम बनवून असंख्‍य स्‍त्रियांनी स्‍वतःचे जनानखाने भरले. त्‍याच्‍या या अत्‍याचाराने हिंदूंमधील प्रतिकारशक्‍ती नष्‍ट होऊ नये, संस्‍कृतीनिष्‍ठा कमकुवत होऊ नये, हिंदु धर्म आणि राष्‍ट्र या पारतंत्र्याच्‍या गुलामीत लुप्‍त होऊ नये म्‍हणून त्‍या काळातील संत ‘आपण प्रभु श्रीरामाचे वारसदार असून आपली संस्‍कृती, आपले राष्‍ट्र आणि आपला धर्म यांचे रक्षण करण्‍यासाठी स्‍वतःची मानसिक अन् भावनिक शक्‍ती वाढवली पाहिजे’, अशी शिकवण देण्‍यासाठी जिवाचे रान करत होते. त्‍यासाठीच प्रभु श्रीरामाचे चरित्र लोकांसमोर मांडत होते. अकबराच्‍या काळातील संत तुलसीदास यांनी श्रीरामाचे नाम आणि चरित्र यांची ओढ जनतेत निर्माण करण्‍यासाठी दोहे, चौपदी अशा अनेक साहित्‍य प्रकारांचा उपयोग केला. प्रभु श्रीरामाचेच चरित्र मानवाला प्रतिकूलतेवर मात करण्‍यास प्रेरणा देणारे आहे. त्‍यासह परिस्‍थितीशी दोन हात करून दुष्‍टांसमोर न झुकण्‍याची शिकवण देणारे आहे. हे ध्‍यानात घेऊनच संत तुलसीदास यांनी रामनामाचा महिमा गात जनतेला श्रीरामांच्‍या पराक्रमाचे स्‍मरण करून दिले.

८. प्रभु श्रीरामांनी राक्षसी वृत्तीकडे दुर्लक्ष न करता त्‍यासाठी घालून दिलेला परिपाठ

प्रभु श्रीरामाने इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्‍याच्‍या रूपात आला आणि त्‍याने कपटकारस्‍थान केले; म्‍हणून त्‍याला धडा शिकवला. इंद्राचा मुलगा म्‍हणून त्‍याला सोडून दिले नाही. शूर्पणखा स्‍त्री होती; म्‍हणून तिच्‍या राक्षसी वृत्तीकडे प्रभु श्रीरामाने दुर्लक्ष केले नाही. विश्‍वामित्रांनी सुद्धा ‘ताटीका स्‍त्री आहे; म्‍हणून तिच्‍या राक्षसी वृत्तीकडे दुर्लक्ष करता येत नाही’, अशी शिकवण प्रभु श्रीरामांना दिली होती. ही शिकवण लक्षात ठेवूनच श्रीरामाने शूर्पणखेला कोणतीही सवलत दिली नाही. तिचे हृदय परिवर्तन केले नाही. अशा प्रकारे श्रीरामाने खर, दूषण, त्रिशिरा अशा अनेक राक्षसांना कंठस्नान घालून सर्वसामान्‍य जनता, सज्‍जन, ऋषीगण  आणि साधूजन यांना भयमुक्‍त करून सुरक्षित जीवन जगता येईल, अशी अनुकूल परिस्‍थिती निर्माण केली. अशा प्रभु श्रीरामाच्‍या भूमीला परदास्‍यात ठेवणे आणि त्‍या धर्माचा र्‍हास होईल, असे वागणे हे पाप आहे. यासाठी ‘रामचरितमानस’सारखा ग्रंथ लिहून प्रभु श्रीरामाचा महिमा कथन करण्‍यासाठी संत तुलसीदास यांनी लेखणी हाती धरली.

९. हिंदु राष्‍ट्र जिवंत ठेवण्‍यासाठी संतांनी केलेले प्रयत्न

महाराणा प्रतापसारख्‍या वीर पुरुषांची ही भूमी होती. संतांप्रमाणेच हे वीर राजे श्रीराम, श्रीकृष्‍ण यांचा वारसा पुढे चालवत होते. त्‍यांनी शत्रूसमोर स्‍वतःची मान झुकवली नाही. देशात परकीय सत्ता प्रस्‍थापित झाली. तरीसुद्धा त्‍या वेळच्‍या संतांनी श्रीरामाचे चरित्र हिंदु समाजाच्‍या विस्‍मृतीत जाऊ दिले नाही. राजकीयदृष्‍ट्या ‘हिंदूंचे राष्‍ट्र’ अस्‍तित्‍वात नसले, तरी सांस्‍कृतिक आणि धार्मिक दृष्‍ट्या हिंदु राष्‍ट्र जिवंत ठेवण्‍यासाठी सर्व संत महंतांनी अपार कष्‍ट घेतले. त्‍यासाठी त्‍यांनी प्रभु श्रीरामाच्‍या चरित्राचा म्‍हणजेच पर्यायाने रामायणाचा आधार घेतला.

१०. ‘हिंदु राष्‍ट्राचा पहिला दिवस’, याविषयी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले विवेचन

स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनीही इंग्रजी सत्ता आपल्‍या देशावर राज्‍य करत असतांना हिंदु बांधवांना स्‍वत्‍वाची जाणीव व्‍हावी, यासाठी ‘हिंदुत्‍व’ हा ग्रंथ लिहिला. त्‍यासह मुसलमानांची आक्रमकता आणि धर्मांतराचे राष्‍ट्रघातक कुकृत्‍य यांना आळा घालण्‍यासाठी शुद्धी चळवळ आरंभली. ‘प्रभु श्रीरामाचा वारसा जतन करायचा असेल, तर हिंदूंचे संख्‍याबळ टिकून राहिले पाहिजे. ते तसूभरसुद्धा घटता कामा नये’, यासाठी सावरकर यांनी जिवाचे रान केले. सावरकर यांनी लिहिलेल्‍या ‘हिंदुत्‍व’ या ग्रंथात ‘हिंदु राष्‍ट्राचा पहिला दिवस कोणता ?’, हे सांगतांना लिहिले, ‘‘अयोध्‍येच्‍या महाप्रतापी राजा रामचंद्राने जेव्‍हा लंकेमध्‍ये आपले विजयी पाऊल टाकले आणि उत्तर हिमालयापासून दक्षिण समुद्रापर्यंतची सर्व भूमी एक छत्री सत्तेखाली आणली.

त्‍याच दिवशी स्‍वराष्‍ट्र आणि स्‍वदेश निर्मितीचे जे महान कार्य हिंदूंनी अंगीकृत केले होते, त्‍या कार्याची परिपूर्ती झाली. भौगोलिक मर्यादेच्‍या दृष्‍टीने सुद्धा त्‍यांनी अंतिम सीमा हस्‍तगत केली. ज्‍या दिवशी अश्‍वमेधाचा विजयी घोडा कुठेही प्रतिरोध न होता अजिंक्‍य असाच अयोध्‍येला परत आला, ज्‍या दिवशी त्‍या अप्रमेय अशा प्रभु रामचंद्रांच्‍या, त्‍या लोकाभिराम राजभद्राच्‍या साम्राज्‍य सिंहासनावर सम्राटाच्‍या चक्रवर्तीत्‍वाचे निदर्शक असे श्‍वेत वस्‍त्र धरले गेले, त्‍याच दिवशी आर्य म्‍हणवणार्‍या नृपश्रेष्‍ठांनीच नव्‍हे, तर हनुमान, सुग्रीव, बिभीषण यांनीही त्‍या सिंहासनाला आपली भक्‍तीपूर्वक राजनिष्‍ठा सादर केली. तोच दिवस आपल्‍या खर्‍या खुर्‍या ‘हिंदु राष्‍ट्राचा’, ‘हिंदू जातीचा जन्‍मदिवस’ ठरला. तोच खरा आपला राष्‍ट्रदिन ! कारण आर्य आणि अनार्य यांनी एकमेकांमध्‍ये पूर्ण मिसळून एका नवीन अशा संघटित राष्‍ट्राला त्‍या दिवशी जन्‍म दिला.

येथील प्रत्‍येक गुहा, प्रत्‍येक टेकडी महर्षि व्‍यास, आद्यशंकराचार्य, समर्थ रामदासस्‍वामी, जगद़्‍गुरु संत तुकाराम महाराज यांची आठवण करून देते. भगीरथाने येथे राज्‍य केले, प्रभु श्रीरामाने येथेच वनवास भोगला, श्रीकृष्‍णाने आपल्‍या मधुर मुरलीने आसमंत भारून टाकला, तीच भूमी आमच्‍या हुतात्‍म्‍यांची वीरभूमी आणि योग्‍यांची कर्मभूमी आहे.’’

११. कृतज्ञता

‘या प्राणप्रिय मातृभूमीच्‍या रक्षणासाठी झटणार्‍या शत्रूला कडवी झुंज देण्‍याच्‍या प्रबळ इच्‍छशक्‍तीचा वारसा आणि प्रेरणा अनंत काळ भावी पिढीला मिळो’, अशी प्रभु श्रीरामचंद्रांकडे प्रार्थना अन् सर्व पूर्वजांना कृतज्ञतापूर्वक वंदन !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (१.२.२०२३)