अकार्यक्षम अग्‍नीशमन यंत्रणा !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव जिल्‍ह्यातील चोपडा येथे एका घराच्‍या दुसर्‍या माळ्‍याला शॉर्ट सर्किटमुळे मध्‍यरात्री १.३० वाजता आग लागली होती. चोपडा पालिकेचे दोन अग्‍नीशमन दलाचे बंब घटनास्‍थळी पोचले; मात्र दोन्‍ही बंबांचे पाईप फाटलेले होते, व्‍हॉल्‍व्‍ह नादुरुस्‍त, कर्मचारी अप्रशिक्षित, कर्मचार्‍यांकडे संरक्षित उपकरणे नव्‍हती. त्‍यामुळे तात्‍काळ आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. पोलिसांनी अखेर अन्‍य गावांतून अग्‍नीशमन बंब मागवले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. याठिकाणी पहिल्‍या आणि दुसर्‍या मजल्‍यावर निवास, तर तळमजल्‍यावर कापड दुकान होते. किती हानी झाली ? हे पहाण्‍यासाठी दुसर्‍या मजल्‍यावर गेले असता त्‍यात ३० वर्षीय दुकानमालकाचा गुदमरून मृत्‍यू झाला होता. आता यंत्रणा कुचकामी असल्‍यामुळे झालेल्‍या मृत्‍यूचे दायित्‍व कुणाकडे ? काही केले तरी कुटुंबियांना गेलेली व्‍यक्‍ती कुणीच परत आणून देऊ शकणार नाही. हे सर्व ऐकल्‍यानंतर स्‍वातंत्र्याच्‍या ७५ वर्षांनंतर आपली प्रगती हीच का ? असा प्रश्‍न कुणाच्‍याही मनात येणार.

अग्‍नीशमन यंत्रणा ही आपत्‍काळात वापरावयाची यंत्रणा आहे. हीच यंत्रणा कमकुवत किंवा अकार्यक्षम असेल, तर या ठिकाणचा अन्‍य प्रशासकीय कारभार कसा चालू असेल ? याचा विचारच न केलेला बरा, असेच जनतेला वाटते. हे सर्व पाहून संतापलेले व्‍यापारी आणि नागरिक यांनी याविरोधात पालिकेवर मोर्चा काढला. मोर्च्‍यातील अनेकांनी तर ‘आम्‍ही यापुढे ज्‍या शहरातून अग्‍नीशमन यंत्रणा मागवली त्‍या शहराच्‍या पालिकेत कर भरू’, अशी भूमिका मांडली. जनतेचा हा संताप नैसर्गिक आहे. जिल्‍ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे घटनास्‍थळी आल्‍यावर त्‍यांनी ‘पालिकेला अद्ययावत अग्‍नीशमन बंब द्यावा’, अशी सूचना जिल्‍हाधिकार्‍यांना केली. आता या सूचनेचे पालन होईल आणि नवीन अग्‍नीशमन बंब येईलही; परंतु सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवणार्‍या व्‍यक्‍ती सुधारण्‍यासाठी काय करणार ? कारण पालिकेमध्‍ये सर्व प्रकारच्‍या कार्यपद्धती घातलेल्‍या असतात; परंतु तिचे पालन करणार्‍या व्‍यक्‍ती सक्षम नाहीत. कदाचित् शिक्षणाने सक्षम असतील; परंतु आपले दायित्‍व सक्षमपणे सांभाळण्‍यासाठी जी संवेदनशीलता लागते ती या प्रसंगातून जाणवत नाही. यासाठी प्रशासकीय यंत्रणांमध्‍ये झालेल्‍या चुकांना तात्‍काळ कठोर शिक्षा करून पुन्‍हा असे होऊ नये, यासाठीची उपाययोजना काढणे आवश्‍यक आहे. अन्‍यथा ‘पहिले पाढे पंचावन्‍न’, असेच व्‍हायला नको.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव