शिवाच्या दोन अवस्था मानल्या आहेत. त्यांतील एक समाधी अवस्था आणि दुसरी म्हणजे तांडव किंवा लास्य नृत्य अवस्था. समाधी अवस्था, म्हणजे निर्गुण अवस्था आणि नृत्यावस्था म्हणजे सगुण अवस्था. ‘एखादी निश्चित घटना अथवा विषय अभिव्यक्त करण्यासाठी जे अंगचालन केले जाते, त्याला ‘नटन अथवा नाट्य’ अशी संज्ञा आहे. हे नटन जो करतो तो नट होय. नटराज या रूपात शिवाने नाट्यकला प्रवर्तित केली, अशी पारंपरिक धारणा आहे. शिव हा आद्यनट आहे, अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला नटराज हे बिरुद लागले आहे. ‘ब्रह्मांड ही नटराजाची नृत्यशाला आहे. तो जसा नर्तक आहे, तसाच त्याचा साक्षीही आहे. जेव्हा त्याचे नृत्य चालू होते, तेव्हा त्या नृत्याच्या झंकाराने सर्व विश्वव्यापाराला गती मिळते आणि जेव्हा त्याचे नृत्य विराम पावते, तेव्हा हे चराचर विश्व आपल्यात सामावून घेऊन तो एकटाच आत्मानंदात निमग्न होऊन रहातो’, अशी नटराज कल्पनेमागची भूमिका आहे. थोडक्यात नटराज हे ईश्वराच्या सकल क्रियाकलापाचे प्रतीरूप आहे. नटराजाचे नृत्य हे सृष्टी, स्थिती, संहार, तिरोभाव (मायेचे आवरण) आणि अनुग्रह (मायेतून बाहेर पडण्यासाठी कृपा) या पाच ईश्वरी क्रियांचे द्योतक मानले जाते.
(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘शिव भाग १’)
नृत्य आणि संगीत साधना अन् त्याविषयी संशोधन !
संगीत (गायन-वादन) आणि नृत्य या कलांची आराध्य देवता भगवान शिव आहे. ‘शिवाच्या डमरूच्या नादातून या विश्वाची निर्मिती झाली आहे’, असे शास्त्रात सांगितले आहे. त्याचप्रमाणे नृत्याची आराध्य देवताही भगवान नटराज (भगवान शिव) आहे.
सर्व कलांचा उगम हा परमेश्वरापासूनच झाला आहे. त्याने कलाप्रिय जिवांना त्याच्या प्राप्तीसाठी हा साधनामार्ग दाखवला आहे; परंतु आजकाल या कलांचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी करण्यात येत आहे. त्यातही सत्त्वगुण प्रधान कलेचा लोप होऊन रज-तम प्रधान कलांचाच विकास होऊन त्यातून या पारंपारिक कलांचे अधःपतन होत आहे. ‘भगवत्प्राप्ती हाच या कलांचा मूळ उद्देश आहे’, हे पुन्हा जनमानसावर बिंबवून या कलांच्या माध्यमातून साधनारत होऊन सात्त्विकतेकडे जाण्याचा मार्ग आज समाजाला दाखवण्याची आवश्यकता आहे. वर्ष २०१६ पासून हेच कार्य महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार चालू आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार संगीतविभागाच्या कार्याचा २०१६पासून आरंभ झाला. संगीत ही आकाशतत्त्वाशी संबंधित कला आहे. त्यामुळे या कलेतून मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील अनुभूती लवकर घेता येतात. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधकांना संगीत-नृत्याचा सराव करतांना शिवाशी संबंधीत अनुभूती आलेल्या आहेत. संगीत आणि नृत्य यांविषयी अद्वितीय संशोधन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. अनेक मान्यवरांनी या संशोधनाला प्रतिसाद दिला आहे.