जळगाव येथे ४ आणि ५ फेब्रुवारी या दिवशी ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’चे आयोजन ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

मंदिरांवरील आघातांच्या विरोधात राज्यभरातून मंदिर विश्‍वस्त एकवटणार !

जळगाव, २ फेब्रुवारी (वार्ता.) – मंदिरांना हिंदु धर्माचे शक्तीकेंद्र मानले जाते. पूर्वी राजे-महाराजे मंदिरांना दान देऊन मंदिरांची व्यवस्था पहात. त्यामुळे मंदिरांतूनही गुरुकुल, गोशाळा, वेदपाठशाळा, विश्‍वविद्यालय, अतिथींसाठी आश्रम अशी व्यवस्था केली जात. इंग्रजांनी हिंदूंची मंदिरे नियंत्रणात घेण्यास प्रारंभ केला. वर्ष १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला; मात्र मंदिरे निधर्मी सरकारच्या नियंत्रणात गेली. आज देशभरातील ४ लाख मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने तेथील भूमी, संपत्ती, दागिने आदींची लूट चालू आहे; मात्र भ्रष्टाचार्‍यांवर ठोस कारवाई होतांना दिसत नाही. आधुनिकतेच्या नावाखाली धार्मिक विधी, प्रथा आणि परंपरा यांमध्ये अयोग्य पद्धतीने हस्तक्षेप आणि परिवर्तन केले जात आहे. आपल्या ‘प्राचीन भारतीय मंदिर संस्कृती’चे रक्षण होण्यासाठी सर्व मंदिरांचे प्रभावी संघटन व्हावे, मंदिरांच्या विविध समस्यांवर उपाय काढावेत, तसेच मंदिरांचे सुनियोजन व्हावे, या उद्देशाने जळगाव येथे‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे निमंत्रित विश्‍वस्त, पुरोहित, मंदिरांशी संबंधित कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, लेखापरीक्षक आणि अधिवक्ते एकत्र येणार आहेत. ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘श्री गणपति मंदिर देवस्थान विश्‍वस्त मंडळ’, पद्मालय, जळगाव यांच्या वतीने ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी श्री सुदर्शन मॉटेल्स, जळगाव येथे ही मंदिर परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, समितीचे जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, श्री गणपति मंदिर देवस्थान विश्‍वस्त मंडळ, पद्मालयचे विश्‍वस्त डॉ. पांडुरंग पिंगळे, जळगाव येथील नवसाचा गणपति मंदिराचे अध्यक्ष श्री. अरुण पाटील उपस्थित होते.

डावीकडून श्री प्रशांत जुवेकर, सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री. सुनील घनवट, डॉ. पांडुरंग पिंगळे आणि श्री. अरुण पाटील

परिषदेत सहभागी होणारे मंदिर देवस्थाने !

या परिषदेला श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान; अष्टविनायक मंदिर ट्रस्ट; जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू; श्री तुळजापूर देवस्थान पुजारी मंडळ; श्री मुंबादेवी मंदिर, मुंबई; श्री रेणुकामाता मंदिर, माहूर; श्री कानिफनाथ देवस्थान, मढी; पुरोहित संघ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर नाशिक; श्री गणपति मंदिर देवस्थान मंडळ पद्मालय, जळगाव; श्रीराम मंदिर, जळगाव; श्री मंगळग्रह सेवा संस्थान, अमळनेर; सातपुडा निवासीनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान; संत गुलाबबाबा देवस्थान, अमरावती; श्रीस्वामीनारायण मंदिर, जळगाव; नवकार जैन टेम्पल ट्रस्ट; केरळीय क्षेत्र परिपालन समिती, मुंबई; श्री बालाजी महाराज संस्थान, देऊळगाव राजा, संभाजीनगर आदी ठिकाणचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार असून महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यांतून विविध मंदिरांचे ३०० हून अधिक विश्‍वस्त उपस्थित रहातील.

परिषदेत सहभागी होणारे मान्यवर !

या परिषदेत काशी येथील ज्ञानवापीसाठी लढा देणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन, ‘जैन इरिगेशन’चे आणि पद्मालय मंदिराचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सदगुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट आणि ‘सनातन संस्थे’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस उपस्थित रहाणार आहेत.

विविध विषयांवर मान्यवरांचे उद्बोधन, तसेच परिसंवाद आणि चर्चासत्र यांचे आयोजन !

अयोध्येत श्रीराममंदिराचे भव्य निर्माण उत्साहात चालू असणे, ही हिंदूंंसाठी आनंदाची गोष्ट आहे; मात्र दुसरीकडे हिंदूंच्या अनेक मंदिरांवर होत असलेले आघात रोखणेही आवश्यक आहे. यासाठी दोन दिवसीय मंदिर परिषदेमध्ये ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’ आणि ‘काशी-मथुरा-भोजशाळा मुक्तीसंघर्ष’, ‘मंदिरांतील वस्त्रसंहिता’, ‘मंदिरांतील पूजाअर्जा : अडचणी आणि उपाय’, ‘मंदिरांतून धर्मशिक्षण आणि धर्मपालन यांचा प्रचार’, ‘मंदिरांच्या कायदेशीर अडचणी आणि उपाय’ आदी विषयांवर मान्यवरांचे उद्बोधन, परिसंवाद आणि चर्चासत्र यांचे आयोजन करण्यात आले असून या सर्व विषयांवर सांगोपांग चर्चा होऊन मंदिर संघटनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. या परिषदेत मंदिर संस्कृतीच्या रक्षणार्थ महत्त्वपूर्ण ठरावही संमत करण्यात येणार आहेत.

मंदिर विश्‍वस्त, पुरोहित आणि भाविक यांच्यातील संघटन, समन्वय, संपर्क, सुरक्षा, तसेच मंदिरांना सनातन धर्माचे प्रचारकेंद्र बनवणे, या पंचसूत्रीच्या आधारे महाराष्ट्रातील मंदिरांचे राज्यव्यापी संघटन निर्माण करण्यात येणार आहे.

मंदिरे ही हिंदूंचे ऊर्जास्रोत असल्याने त्यांचे संरक्षण होणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु नंदकुमार जाधव

‘मंदिरे म्हणजे हिंदूंचे ऊर्जास्रोत आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. सनातन संस्थाही ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’त सहभागी होत आहे’, असे सद्गुरु नंदकुमार जाधव या वेळी म्हणाले.

महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेतील महत्त्वाची सूत्रे !

१. मंदिर क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या विश्‍वस्तांचा सन्मान
२. मंदिरांच्या संरक्षणार्थ परिसंवादांचे आयोजन
३. मंदिरविषयक धर्मशिक्षण देणार्‍या फलकांचे प्रदर्शन
४. मंदिर, अध्यात्म आणि राष्ट्र-धर्म विषयक विविध ग्रंथांचे प्रदर्शन