उज्‍जैन येथील राजा विक्रमादित्‍याचे अलौकिक सिंहासनस्‍थळ !

राजांच्‍या काळात सिंहासनाला महत्त्व असायचे; कारण न्‍यायदानासारखे महत्‌कार्य तेथूनच पार पडत असे. एका सिंहासनाच्‍या संदर्भात घडलेला वैशिष्‍ट्यपूर्ण प्रसंग येथे दिला आहे.

१. राजा विक्रमादित्‍याच्‍या पूर्वी सिंहासन बत्तिशीच्‍या जागेवरील टेकडीवर बसून निरक्षर व्‍यक्‍तींनीही न्‍यायदान करणे

महाराज विक्रमादित्‍य ज्‍या जागी बसून न्‍यायदान करत, येथे सिंहासन बत्तिशी आम सभाही भरत होती. राजा विक्रमादित्‍य यांच्‍या अगोदरही येथे पुष्‍कळ ऊर्जा होती. हे स्‍वयंसिद्ध स्‍थान होते. राजाच्‍या अगोदर या ऊर्जापूर्ण टेकडीवर बसून कोणतीही व्‍यक्‍ती न्‍यायनिवडा करत होती. सर्व लोकांना ‘ही व्‍यक्‍ती शिकलेली नाही; पण तरीही ती न्‍याय, रामायण, श्रीमद़्‍भगवद़्‍गीता आणि भागवत या विषयांवर चर्चा करते’, याचे आश्‍चर्य वाटायचे.

२. माता हरसिद्धीने दिलेल्‍या आशीर्वादानंतर विक्रमादित्‍यांनी न्‍यायनिवाडा करणे

विक्रमादित्‍य महाराज भर्तृहरीच्‍या आशीर्वादाने येथे पोचले. भर्तृहरीने त्‍यांना माता हरसिद्धीची उपासना करण्‍याचे मार्गदर्शन केले. हरसिद्धीने विक्रमादित्‍यांना आशीर्वाद दिला, ‘या टेकडीवर तुमचे सिंहासन आहे. मी येथे ३२ दुर्गांच्‍या रूपात राहीन.’ तेव्‍हापासून विक्रमादित्‍य वरूचि, सुरीशंकु, अमरसिंह, खटकरपारा, क्षपणक, वेताळभट्ट, कवी कालीदास, वराहमिहीर, धन्‍वंतरी भर्तृहरि या नवरत्नांशी चर्चा करून येथे न्‍यायनिवाडा करत.

३. देवतांनी प्रसन्‍न होऊन विक्रमादित्‍य यांना आशीर्वाद म्‍हणून सोन्‍याचे सिंहासन भेट देणे

एकदा इंद्रलोकात देवतांमध्‍ये कोणत्‍यातरी कारणावरून भांडण झाले होते. तेव्‍हा इंद्रदेव म्‍हणाले, ‘‘अवंतिकानगरीचा राजा विक्रमादित्‍य हा एकमेव राजा आहे की, जो देवतांचा न्‍याय करू शकतो.’’ तेव्‍हा देवतांनी आपल्‍या शक्‍तीने महाराजा विक्रमादित्‍य यांना इंद्रलोकी नेेले. तेथे त्‍यांनी देवतांचा न्‍याय केला. देवतांनी प्रसन्‍न होऊन विक्रमादित्‍यांना आशीर्वाद म्‍हणून सोन्‍याचे सिंहासन भेट दिले. इंद्रदेवाच्‍या सांगण्‍यावरून महाराजा विक्रमादित्‍य यांनी अवंतिकानगरीत नवग्रह मंदिर उभारून शनीची उपासना केली.  – पंडित रघुनंदन शर्मा, पुजारी, विक्रमादित्‍य महाराज नवरत्न दरबार आसन, उज्‍जैन. (२७.८.२०१४)