प्रखर देशप्रेमी आणि स्‍वाभिमानी महाराणा प्रताप !

‘बादशहा अकबराच्‍या समवेतच्‍या लढाईत राणा प्रताप यांचा पराभव झाल्‍याने त्‍यांना सैनिकांसह अरण्‍यात जावे लागले. जवळ धनधान्‍य नाही. सुगावा लागल्‍यास मोगल येऊन पकडतील असे हालाखीचे दिवस नशिबी आले. त्‍यांच्‍यातील स्‍वाभिमान आणि देशप्रेम दर्शवणारा एक प्रसंग दिला आहे.

 

राणा प्रताप यांचा नातेवाईक राजा मानसिंह हा अकबराचा मांडलिक बनला होता. बादशहाच्‍या दरबारात तो मोठ्या पदावर ऐशारामात रहात होता. जेव्‍हा त्‍याला राणा प्रताप यांच्‍या हालअपेष्‍टांविषयी कळले, तेव्‍हा तो त्‍यांना भेटायला जंगलात आला. नमस्‍कार-चमत्‍कार झाल्‍यावर त्‍याने विषयाला हात घातला. ‘‘अरे, राणा तू या जंगलात एखाद्या दरिद्री माणसासारखा हालअपेष्‍टा काढत आहेस; म्‍हणून मी दयाळू अकबर बादशहाशी तुझ्‍या संदर्भात बोललो. तू जर बादशहाचा मांडलिक होऊन त्‍याला सलाम करशील, तर तो तुला क्षमा करील. तुला तुझे पूर्ण राज्‍य परत मिळेल आणि तू आरामात अन् वैभवात पुन्‍हा राहू शकशील.’’ त्‍यावर राणा प्रताप यांनी त्‍याच्‍याकडे घृणास्‍पद कटाक्ष टाकून म्‍हटले, ‘‘मी हे कदापी करणार नाही.’’ त्‍यावर राजा मानसिंहाने त्‍यांना समजावण्‍याचे बरेच प्रयत्न केले; पण त्‍यांचा निर्णय ठाम होता. शेवटी हताश होऊन राजा मानसिंहाने त्‍यांना विचारले, ‘‘मी जातो; पण मला सांग की, तू या हालअपेष्‍टांच्‍या जीवनाला स्‍वीकारतोस; पण मांडलिकत्‍व नको म्‍हणतोस, असे का ?’’ राणा प्रताप यांनी दिलेले उत्तर इतिहासात अजरामर आहे. ते म्‍हणाले, ‘‘मानसिंह, माझ्‍या मृत्‍यूनंतर येणार्‍या राजपुतांच्‍या पिढ्या माझी आठवण अमर ठेवतील. ते त्‍यांच्‍या मुलाचे नाव ‘प्रताप’ ठेवतील; मात्र तुझ्‍या नावावर लोक थुंकतील. तुला देशद्रोही म्‍हणून पिढ्यान्‌पिढ्या शाप देतील; म्‍हणून मी मोगल बादशहा अकबराचा गुलाम होऊ इच्‍छित नाही.’’ (संदर्भ : संकेतस्‍थळ)

महाराणा प्रताप यांच्‍यासारख्‍या राष्‍ट्रपुरुषांमुळेच भारत देश परकियांचे आघात सहन करूनही आजतागायत टिकून राहिला. राष्‍ट्रपुरुषांमधील स्‍वाभिमान, धर्मप्रेम, देशप्रेम आदी गुण स्‍वत:तही निर्माण करून देश आणि धर्म यांचा गौरव वाढवूया !