केर काढणे आणि हाताने लादी पुसणे या दैनंदिन कृतींतून होणारे आध्यात्मिक स्तरावरील लाभ समजून घ्या !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘आपण प्रतिदिन सकाळी घरातील केर काढतो, तसेच लादी पुसतो. घराची स्वच्छता केल्यानंतर घरातील वातावरण प्रसन्न होते. याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे. आजकाल पूर्वीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने, म्हणजे उजव्या हाताने (लादीवर ढोपरे न टेकवता, उकिडव्याने) लादी पुसण्यापेक्षा शारीरिकदृष्ट्या सोयीचे वाटत असल्याने अनेक जण ‘मॉप’ने लादी पुसतात. (‘मॉप’ हे लादी पुसण्यासाठीचे एक उपकरण आहे. याचा वापर करून उभ्याने लादी पुसता येते.) ‘केर काढणे आणि लादी पुसणे या दैनंदिन कृती केल्याने ती करणारा अन् वास्तू यांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतात?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन या चाचणीत पुढील प्रयोग करण्यात आले.

१. अ. केर काढणे आणि ‘मॉप’ने लादी पुसणे : या चाचणीत सहभागी एका स्त्रीने पहिल्या दिवशी घरातील एका खोलीचा केर काढला आणि ‘मॉप’ने लादी पुसली. केर काढण्यापूर्वी, केर काढल्यानंतर आणि ‘मॉप’ने लादी पुसल्यानंतर तिच्या आणि खोलीच्या (चारही दिशांनी)‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.

१. आ. पारंपरिक पद्धतीने लादी पुसणे : दुसर्‍या दिवशी तिने घरातील त्याच खोलीचा केर काढला आणि पारंपरिक पद्धतीने लादी पुसली. लादी पुसण्यापूर्वी अन् पुसल्यानंतर तिच्या आणि खोलीच्या (चारही दिशांनी) ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. पहिल्या आणि दुसर्‍या दिवशीच्या निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाकून केर काढतांना
पारंपरिक पद्धतीने उजव्या हाताने लादी पुसतांना
मॉपने लादी पुसतांना
यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.


२. केर काढणे आणि दोन्ही प्रकारे लादी पुसणे या कृती केल्याने स्त्री अन् खोली यांच्यावर झालेले परिणाम

पहिल्या दिवशी केर काढणे आणि ‘मॉप’ने लादी पुसणे, या कृती केल्यानंतर स्त्री अन् खोली यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. दुसर्‍या दिवशी स्त्रीने पारंपरिक पद्धतीने हाताने लादी पुसल्यानंतर तिच्यातील अन् खोलीतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

३. निष्कर्ष

केर काढणे आणि लादी पुसणे या दैनंदिन कृतींचा कृती करणारा आणि वास्तू यांवर सकारात्मक परिणाम होतात. ‘मॉप’ने लादी पुसण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने लादी पुसल्यावर स्त्री अन् खोली यांच्यातील सकारात्मक ऊर्जा (सात्त्विकता) पुष्कळ अधिक प्रमाणात वाढल्याचे चाचणीतून दिसून आले. यातून ‘मॉप’ने लादी पुसण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने लादी पुसणे अधिक लाभदायी आहे, असे लक्षात येते.

सौ. मधुरा कर्वे

४. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

४ अ. केर काढणे आणि लादी पुसणे या कृती केल्याने स्त्रीला आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : चाचणीतील स्त्रीने कटीत (कमरेत) वाकून उजव्या अंगाला झुकून केर काढला. त्यानंतर तिने पारंपरिक पद्धतीने म्हणजे उजव्या हाताने (लादीवर ढोपरे न टेकवता, उकिडव्याने) लादी पुसली. या कृती करतांना शरिराच्या होणार्‍या मुद्रेमुळे तिची सूर्यनाडी जागृत झाल्यामुळे तिच्याभोवती संरक्षक कवच निर्माण झाले. त्यामुळे केर काढणे आणि हाताने लादी पुसणे या कृती करतांना तिच्यावरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण अल्प होऊन तिची सात्त्विकता पुष्कळ वाढली.

४ आ. केर काढणे आणि लादी पुसणे या कृतींमुळे वास्तूची शुद्धी होणे : स्त्रीने खोलीचा केर काढल्याने तेथील रज-तमात्मक स्पंदने अल्प झाली. लादी पुसतांना पाण्यातील आपतत्त्वामुळे भूमीवरील त्रासदायक स्पंदनांचे उच्चाटन झाले. त्यामुळे वास्तूची शुद्धी झाली.

४ इ. ‘मॉप’ने लादी पुसण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने लादी पुसणे अधिक लाभदायी असणे : पारंपरिक पद्धतीने लादी पुसतांना शरिराची जशी मुद्रा होते, तशी ‘मॉप’ने पुसतांना होत नाही. दुसरे म्हणजे पारंपरिक पद्धतीने लादी पुसतांना ओले कापड मध्ये मध्ये स्वच्छ करून धुऊन घेतले जाते. त्यामुळे लादी चांगल्या प्रकारे स्वच्छ होते. तसेच तेथील त्रासदायक स्पंदने नाहीशी होऊन चैतन्य निर्माण होते. त्यामुळे घराची स्वच्छता केल्यानंतर मनाला प्रसन्न जाणवते.

५. केर काढणे आणि लादी पुसणे या कृती करतांना वास्तूत निर्माण होणारी सात्त्विकता टिकून रहाण्यासाठी करावयाचे प्रयत्न

केर काढण्यापूर्वी भावपूर्ण प्रार्थना करून नामजप करत केर काढावा. लादी पुसण्यासाठी वापरायच्या पाण्यात चिमूटभर विभूती घालावी. विभूतीतील सात्त्विकतेमुळे विभूतीयुक्त पाण्याने लादी पुसल्यावर लादीवरील त्रासदायक स्पंदने नष्ट होण्यास साहाय्य होते. लादी पुसण्यापूर्वी ‘भूमीवर आलेले त्रासदायक स्पंदनांचे आवरण पाण्यातील चैतन्याने नष्ट होऊ दे’, अशी जलदेवतेला प्रार्थना करावी. लादी पुसण्यासाठी वापरत असलेले ओले कापड मध्ये मध्ये स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. लादी पुसल्यावर उदबत्ती लावून घरात निर्माण झालेली सात्त्विकता टिकून रहाण्यासाठी वास्तूदेवतेला प्रार्थना करावी.

वयोमानामुळे किंवा शारिरीक व्याधींमुळे काही लोकांना कमरेत वाकून केर काढणे किंवा हाताने लादी पुसणे शक्य होत नाही. त्यामुळे ते उभ्याने या कृती करतात. अशा वेळी त्यांनी स्वतःभोवती संरक्षक कवच निर्माण होण्यासाठी आपल्या इष्टदेवतेला भावपूर्ण प्रार्थना करावी, तसेच नामजप करत प्रत्येक कृती करावी. त्यामुळे या कृती करतांना त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होईल.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.१२.२०२२)

ई-मेल : [email protected]

संपादकीय भूमिका

  • दैनंदिन जीवनात पाश्चात्त्यांच्या कृतींचे अंधानुकरण करण्यापेक्षा हिंदु धर्माप्रमाणे आचरण करून घराची सात्त्विकता वाढवा !