अयोग्‍य गोष्‍टींची नोंद न घेतल्‍यास महिला आयोगाच्‍या खुर्चीवर बसण्‍याचा अधिकार नाही ! – चित्रा वाघ, उपप्रदेशाध्‍यक्षा, भाजप

भाजप उपप्रदेशाध्‍यक्षा चित्रा वाघ

मुंबई – माझा उर्फी हिला नाही, तर तिच्‍या ‘नंगानाच’ वृत्तीला विरोध आहे. ज्‍या ठिकाणी समाज महत्त्वाचा असतो, त्‍या ठिकाणी राजकारण करू नये; परंतु दुर्दैवाने आपल्‍या राज्‍यात तसे झाले नाही. याची नोंद घेत नसाल, तर महिला आयोगाच्‍या खुर्चीवर बसण्‍याचा अधिकार नाही, अशी टीका भाजपच्‍या महाराष्‍ट्र उपप्रदेशाध्‍यक्षा चित्रा वाघ यांनी ५ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केली. राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रूपाली चाकणकर यांना अशी विचारणा चित्रा वाघ यांनी केली आहे. या वेळी चित्रा वाघ म्‍हणाल्‍या, ‘‘अशा प्रकारचा नंगानाच महाराष्‍ट्राला शोभनीय नाही. असे नगण्‍य कपडे घालून अंगप्रदर्शन किती योग्‍य आहे ? ‘वेब सिरीज’च्‍या ‘पोस्‍टर्स’वर अंगप्रदर्शन करतात म्‍हणून महिला आयोगाने नोटीस काढली. तो आयोग असा नंगानाच कसा सहन करतो ? हा दुटप्‍पीपणा आहे. व्‍यक्‍तिस्‍वातंत्र्याच्‍या नावाखाली हा नंगानाच सहन करणार नाही.’’