(शतधौत घृत म्हणजे १०० वेळा धुतलेले तूप)
१. विविध ‘क्रिम्स’ने भरलेली विदेशातून आलेली ‘मेकअप पेटी’ आणि तिच्यावरून झालेली चर्चा !
‘डिसेंबर मास हा विदेशातील नातेवाइक इकडे येण्याचा काळ असतो. मग अर्थातच अलिबाबाच्या गुहेसारख्या विस्मयजनक गोष्टी त्यांच्या सामानातून बाहेर येतात. त्या इतक्या चित्रविचित्र, देखण्या, मुलायम आणि आकर्षक असतात की, त्यांची आवश्यकता, उपयोग, लाभ, तोटा या कशाचाही विचार करायला बुद्धी जागेवर रहातच नाही. ‘विदेशातील गोष्टींचा दर्जा बघा किती चांगला असतो !’, असे एक अनावश्यक प्रमाणपत्र आपणच देऊन टाकतो.
अशाच एका घरी विदेशातून ‘मेकअप पेटी’ आली होती. मी भेटायला म्हणून गेले, तेव्हा मला ती कौतुकाने दाखवण्यात आली. प्राची तर पुष्कळ आनंदी होती. तिच्या मैत्रिणींसमोर तिचा भाव खाऊन झाला होता. आगामी कुणाकुणाच्या लग्नात याचा किती चांगला उपयोग होईल, ही स्वप्नेही पाहून झाली होती. यातील रंगीबेरंगी पेट्यांव्यतिरिक्त माझे लक्ष गेले, ते विविध क्रीम्सच्या डब्यांकडे ! किती प्रकारची क्रीम्स ! बापरे ! दिवसा, रात्री, अंघोळीनंतर, अंघोळीच्या आधी, चेहर्याला, हाताला, पायाला, टाचेला, नखांना, ओठाला…. ! पण मी काय म्हणते ? ही सगळी ‘केमिकल्स’ आहेत, म्हणजे घातक आहेत ना हो ? निदान प्रतिदिन तरी वापरायला नकोत ना ?
प्राचीच्या आईने सरळसरळ माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून शत्रूवर नेम धरला. ‘‘काहीतरी बोलू नकोस ! (हे शब्द आणि हा आवाजाचा ‘टोन’ (पद्धत) आता घरोघरी परिचित आहे.) इतकी महागाची पेटी आणली आहे आत्याने, तसेच दर्जेदारही आहे. ठेवून काय तिची पूजा करायची ? एखाद्या वर्षात यातील सगळ्या गोष्टी ‘डेट-बार’ (वापरण्याचा कालावधी दिनांक) होतील आणि वापरता येणार नाहीत. ‘महागामोलाची गोष्ट वाया गेली’, असे म्हणत तेव्हा तुम्हीच उसासे टाकत बसाल. फुकटचा ‘शॉट’ (धक्का) लावतात डोक्याला !’’ प्राचीची तणतण चालू झाली. मग माझ्याकडे बघून ती म्हणाली, ‘‘तुम्ही समजवा जरा हिला (आईला). विदेशात नवीन नवीन संशोधन करून अशा गोष्टी बनवतात. सगळे जग वापरते.’’
२. कृत्रिम सौंदर्यप्रसाधनांविषयी तरुण मुलीचे केलेले प्रबोधन !
‘‘हा तुझा अपसमज आहे बरं का ! सौंदर्यप्रसाधनांमध्ये जी रसायने वापरली जातात, त्यावर विशेष संशोधन जगातच कुठे झालेले नाही अजून. त्यांचा दर्जेदारपणाही फारसा सिद्ध झालेला नाही. त्यावर नियंत्रण ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा नाही. त्यामुळे सगळा आनंद आहे ! एकदा संकेतस्थळावर जाऊन अभ्यास कर थोडा. यातील कित्येक रसायने ही थेट कर्करोग निर्माण करणारी आहेत’’, मी सांगितले. ‘‘असे कसे होईल ? मग त्यावर बंदी आली असती ना ?’’ तिचा अजाण प्रश्न !
‘‘बंदी येत नाही; कारण तेथेही भ्रष्टाचार चालतो.’’ मी थोडक्यात सांगितले. ‘‘पण सगळे वापरतात… आपल्या नट्याही ! कुणाला काय झाले?’’ तिचे आपले चालूच होते.
‘‘अगं, तोंड रंगवल्यावर नट्या चांगल्याच दिसतात. तेव्हाच त्या आपल्यासमोर येतात. आजारी असतांना कशा येतील ? त्यांचे आजार आपल्याला कळतही नाहीत.’’ मी समजूत घालत होते.
‘‘पण याला आयुर्वेदात काही पर्याय नाही का ? बाकीचे जाऊ दे, प्रतिदिनच्या या १०० क्रीम्सना तरी पर्याय असेल ना काहीतरी !’’ प्राची बोलली.
‘‘आम्ही आमच्या काळी तेल-हळद, साय, दूध-हळद, दूध-लिंबू, दूध-बेसन, दही असे काय काय वापरायचो. ते आजच्या मुलींना नको असते. एकतर कंटाळा आणि ते असे आकर्षक वेष्टनात येत नाही ना ? म्हणून’’, मी उत्तर दिले.
‘‘मग तुम्ही सांगा ना एखादा पर्याय असेल तर ?’’ वैद्य लोकांना कोण, कधी, कसे गुगली टाकेल, ते सांगता येत नाही.
‘‘हो, आहे ना ! ‘शतधौत घृत’ आहे की आपले. मस्त काम करते.’’ ‘‘म्हणजे काय?’’ प्राचीने लगेच विचारले. ‘‘म्हणजे १०० वेळा धुतलेले तूप ! ईईईईईई ! त्याला वास येत असेल तुपाचा.’’
तूप म्हटले की, नव्या पिढीला नक्की कुठे शूळ (दुखणे) चालू होतो, हा माझ्यासाठी संशोधनाचा विषय आहे. वास असतो; पण सौंदर्यप्रसाधन म्हणून वापरतांना आम्ही तो मास्क करतो. हवे ते सुगंध देता येतात त्याला. याखेरीज ‘क्रीम बेस’ दिला की, त्याचा तुपकटपणाही अल्प होतो.’’
३. शरिरासाठी उपयुक्त असलेले ‘शतधौत घृत’ !
‘‘ते कसे वापरायचे ?’’ प्राचीच्या आईलाच उत्सुकता अधिक. ‘‘रात्री झोपण्यापूर्वी अर्धा घंटा तुम्ही ते तोंडवळ्याला आणि हाता-पायांना लावू शकता. त्याने थंडीत त्वचा फुटत नाही, त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत, काळे डाग असतील, तर हळूहळू अल्प होतात. त्वचा मृदू आणि गौरवर्णी होते. टाचेच्या भेगांनाही ते लावता येते. क्वचित् कधी मेकअप केला, तर तो काढल्यावर तोंड धुऊन शतधौत लावावे. इतकेच काय, भाजल्याची आग आणि डाग यांवरही याचा उपयोग आहे. त्वचेला कुठेही आग होत असेल, तर याने आग शांत होते. डोळ्यांभोवतीच्या काळ्या डागांवरही हे उपयोगी आहे. करू तेवढे उपयोग.’’
‘‘मी उद्या येतेच तुमच्याकडे. सिद्ध आहे ना ?’’ प्राचीची आई एकदम आनंदित होऊन म्हणाली. प्राचीने विरोध केला नाही. यातच तिचा होकार आला.
दाहशामक नि मॉईश्चरायझर, लावा कुठेही भाजल्यावर ।
सौंदर्य देते शुद्ध स्वभावे, घरोघरी ‘शतधौत’ असावे ॥
– वैद्या सुचित्रा कुलकर्णी, चिकित्सक, लेखिका, व्याख्यात्या, समुपदेशक
(साभार : दैनिक ‘तरुण भारत’)