आंदोलन करतांना टाळ-मृदुंग घेत विरोधकांकडून विठ्ठल आणि वारकरी संप्रदाय यांचा अवमान !

हिवाळी अधिवेशन २०२२

गायरान घोटाळाप्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात विरोधकांचे आंदोलन !

अभंगांच्या चालीवर आंदोलन करतांना महाविकास आघाडीतील आमदार

नागपूर, २७ डिसेंबर (वार्ता.) – वाशिम येथील गायरान भूमी घोटाळा प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात २७ डिसेंबर या दिवशी विधानभवनाच्या पायर्‍यांवर महाविकास आघाडीतील आमदारांनी आंदोलन केले. या वेळी विरोधकांनी पांढरी टोपी आणि हातात टाळ-मृदुंग घेत अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत शिंदे-भाजप सरकारचा निषेध केला. या वेळी विरोधकांनी आंदोलन करतांना अब्दुल सत्तार यांच्यावर रचलेले अंभग म्हटले. त्यामुळे हिंदु देवता विठ्ठल, अभंग आणि वारकरी संप्रदाय यांचा अवमान झाला आहे. वारकरी संप्रदायांतील वारकरी मंदिर आणि तीर्थक्षेत्र अशा पवित्र ठिकाणी टाळ-मृदुंग घेऊन अभंग आणि भजन म्हणतात. मग राजकीय प्रश्नावर आंदोलन करतांना विरोधकांनी अभंगाच्या चालीवर टाळ-मृदुंग यांचा वापर करणे योग्य आहे का ?, असा प्रश्न वारकरी संप्रदायातून उपस्थित केला जात आहे.

या वेळी विरोधकांनी ‘गायरान भूमी घोटाळा प्रकरणी अब्दुल सत्तार यांनी त्यागपत्र द्यावे’, अशी जोरदार मागणी केली. वारकरी संप्रदायात विविध कीर्तनकार आणि वारकरी कीर्तन करत असतांना टाळ-मृदुंग वाजवून अभंग म्हणत असतात. विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करतांना विरोधकांनी हातात टाळ-मृदुंग घेण्याची आवश्यकता होती का ?, तसेच अब्दुल सत्तार यांनी केलेल्या भूमी घोटाळ्यावर अभंगाच्या स्वरूपात रचना करून तसे अभंग म्हणणे कितपत योग्य आहे ?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

वरील  ट्विट  प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे  प्रसिद्ध केले आहे. – संपादक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांसह महाविकास आघाडीतील आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनाचा शेवट करतांना ‘पुंडलिक हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ असेही विरोधकांनी म्हटले, तसेच आंदोलनाच्या वेळी मधे मधे आमदारांनी फुगडीही खेळली. खरेतर वारकरी अभंग आणि कीर्तन पूर्ण झाल्यावर असा श्लोक म्हटला जातो. विधीमंडळाच्या ठिकाणी असा श्लोक म्हटला जात नाही.

अभंग स्वरूपात टाळ वाजवत आणि चाली लावून असे केले विडंबन…

१. ‘भूखंड घ्या कुणी गायरान घ्या, भूखंड घ्या कुणी शिंदेना द्या, कुणी सरकारला द्या कुणी भूखंड घ्या कुणी सत्तारला द्या.’
२. ‘शेतकरी हैराण सरकार खाते गायरान, विदर्भ आहे हैराण सरकार खाते गायरान…’ असे अभंगाच्या चालीवर आमदारांनी म्हटले.