सप्तर्षींची कृपा संपादन करणार्‍या आणि ‘विश्वकार्य’ या टप्प्याचा प्रवास सहजतेने करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आतापर्यंत श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी आध्यात्मिक क्षेत्रात पुष्कळ मोठे कार्य केले असून यापुढेही त्यांच्याकडून पुष्कळ मोठे अद्वितीय आणि दैवी कार्य होणार आहे !


‘श्रीचित्‌‌शक्ति’ ही भगवंताच्या वैश्विक ज्ञानाशी संबंधित असून (सौ.) अंजली गाडगीळ यांचा साधनेतील ‘विश्वकार्या’चा टप्पा चालू असणे

२३.५.२०२० या दिवशी ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीचित्‌‌शक्ति’ (सौ.) अंजली गाडगीळ, असे संबोधावे’, असे महर्षींनी सांगितले. ‘श्रीचित्‌‌शक्ति’ ही भगवंताच्या वैश्विक ज्ञानाशी संबंधित असून त्यांचा साधनेतील ‘विश्वकार्या’चा टप्पा आता चालू आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी शरणागतीने वंदन करतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (वर्ष २०१९)

१. अवघ्या २०-२१ वर्षांत अध्यात्मातील खूप मोठा टप्पा पार करणारे एकमेवाद्वितीय ‘गाडगीळ दांपत्य’ !

‘सनातनला लाभलेला एक अनमोल ठेवा म्हणजे गाडगीळ दांपत्य ! या उभयतांचा साधनाप्रवास पाहिला, तर उच्चशिक्षित असूनही दोघेही विरक्त वृत्तीचे, उच्च कोटीचा भाव आणि देवावरील दृढ श्रद्धेने झोकून देऊन साधना करणारे अन् अहंभाव नसलेले आहेत. दोघांची प्रकृती आणि साधनामार्ग वेगवेगळे असले, तरी ते मार्ग एकमेकांना पूरक ठरले असून आज साधनेत दोघेही उच्च आध्यात्मिक पदावर आरूढ आहेत. सौ. अंजली गाडगीळ ‘श्रीचित्‌‌शक्ति’ आणि डॉ. मुकुल गाडगीळ ‘सद्गुरु’ या पदांवर आहेत. अवघ्या २० – २१ वर्षांच्या काळात त्यांनी अध्यात्मातील खूप मोठा टप्पा पार केला. हे अत्यंत कौतुकास्पद आहे.

२. स्थूल आणि सूक्ष्म, अशी दोन्ही कार्ये उत्तम प्रकारे करणार्‍या अन् मानवजातीला दुर्मिळ ज्ञान उपलब्ध करून देणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या स्थूल आणि सूक्ष्म, अशा कोणत्याही प्रकारचे कार्य उत्तम प्रकारे करू शकतात. असा एकही विषय नाही की, ज्यावर त्यांचे प्रभुत्व नाही. आतापर्यंत जवळजवळ सर्वच विषयांवर त्यांनी ज्ञान ग्रहण केले आहे. त्यांनी केलेले ज्ञानाचे लिखाण, त्या लिखाणातील त्यांची ओघवती भाषा आणि त्यांच्या ज्ञानाचा स्तर पाहिला की, त्यांच्या ज्ञानशक्तीची कल्पना येते. सद्यस्थितीत पृथ्वीवर कोठेही उपलब्ध नसलेले ज्ञान त्यांनी संपूर्ण मानवजातीला उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे या कशाचाच त्यांना अहंकार नाही.

३. अविरत प्रवास करून सप्तर्षींचे मन जिंकणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ !

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा दैवी प्रवास अव्याहतपणे चालू असून आतापर्यंत त्यांनी शेकडो स्थानांना भेट दिलेली आहे. काही वेळा त्यांचा प्रवास पुष्कळ खडतर असतो; पण ‘सप्तर्षींचे आज्ञापालन व्हायला हवे’, या एकाच ध्यासाने त्या अविरत प्रवास करून खूप मोठे समष्टी कार्य करत आहेत. ‘सप्तर्षींना काय अपेक्षित आहे ?’, हे समजून घेऊन प्रत्येक कृती भावपूर्ण रीतीने आणि पूर्ण श्रद्धेने करणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आपल्या भक्तीभावाने सप्तर्षींचीही कृपा संपादन केली आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ वेळोवेळी त्यांच्या दैवी प्रवासाचे लिखाण करतात. या लिखाणाचे वैशिष्ट्य, म्हणजे त्यांत स्थुलातील, म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या स्तरावरील लिखाणासोबत आवश्यक तेथे त्यांच्या पलीकडील सूक्ष्मातील, म्हणजे आध्यात्मिक स्तरावरील परीक्षणे असतात अन् चैतन्यही असते. त्यामुळे हे लिखाण वाचतांना वाचकांनाही अनुभूती येतात.

४. समाजातील लोक श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे आकृष्ट होणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील शक्तीतत्त्व आणि चैतन्य यांत वृद्धी होत असून त्यांचे दैवीपण आता लपून रहात नाही. समाजातील अपरिचित लोकांनाही त्यांच्यातील शक्तीस्वरूपाची जाणीव होऊन ते श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडे आकृष्ट होतात. ईश्वराने सनातनला श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासारखे अनमोल रत्न देऊन मानवजातीवर मोठी कृपा केली आहे. आज त्या ५३ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आतापर्यंत श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी खूप मोठे कार्य केले असून यापुढेही त्यांच्याकडून खूप मोठे अद्वितीय आणि दैवी कार्य होणार आहे.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे सर्वच कुटुंबीय साधना करत असून त्यांचीही आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होत आहे.

‘सप्तर्षींच्या आज्ञेने आणि भगवान श्रीकृष्णाच्या कृपाशीर्वादाने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून अशाच शीघ्र गतीने विश्वकार्य होवो’, अशी सप्तर्षींच्या चरणी प्रार्थना !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (६.१२.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.