घरगुती गॅस सिलिंडरवर आता दिसणार ‘क्यूआर् कोड’ !

चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

(‘क्यूआर् कोड’ म्हणजे सांकेतिक भाषेतील संक्षिप्त स्वरूपातील संगणकीय माहिती)

पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी

नवी देहली – घरगुती गॅस सिलिंडर आता लवकरच ‘क्यूआर् कोड’शी जोडले जाणार आहेत, अशी माहिती पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांनी १७ नोव्हेंबरला दिली. या ‘क्यूआर् कोड’मुळे गॅस सिलिंडरचे नेमके ठिकाण कळणार असल्याने सिलिंडरची चोरीदेखील रोखणे शक्य होणार आहे.

हरदीपसिंह पुरी पुढे म्हणाले, ‘‘जुन्या आणि नवीन सिलिंडवर ‘क्यूआर् कोड’ लावला जाईल. हा कोड जेव्हा सक्रीय होईल, गॅस सिलिंडर कुठपर्यंत पोहोचला आहे ?, याचा शोध घेता येईल. गॅस सिलिंडर पोचवण्यासाठीचे व्यवस्थापन सोपे होणार आहे.’’

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २० सहस्र गॅस सिलिंडर्सना ‘क्यूआर् कोड’ लावण्यात आला आहे. पुढील काही मासांत १४.२ किलो वजनाचे सर्व घरगुती गॅस सिलिंडर्स क्यूआर कोडशी जोडले जातील.