सातारा परिवहन कार्यालयाकडून मनमानी भाडे आकारणार्‍या १३१ बसगाड्यांवर कारवाई

१ लाख २६ सहस्र रुपयांची दंड आकारणी

सातारा, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर खासगी बसद्वारे सर्वसामान्य प्रवाशांची वाहतूक करणारे वाटेल तेवढे भाडे आकारून लूट करतात. प्रवाशांची ही लूट थांबवण्यासाठी सातारा परिवहन कार्यालयाकडून १२ दिवस विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली होती. खासगी वाहन चालक-मालक यांपैकी ५३५ जणांवर, तर १३१ लक्झरी बसगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या वेळी संबंधितांकडून १ लाख २६ सहस्र रुपये एवढा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.

विनोद चव्हाण पुढे म्हणाले, ‘‘सातारा परिवहन कार्यालयाचे ६ अधिकारी जिल्ह्यातील महामार्ग आणि विविध राज्यमार्ग यांवर कर्तव्यावर आहेत. तेथे ते खासगी लक्झरी बसगाड्यांची तपासणी करत आहेत. मागील १२ दिवसांत प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारणार्‍या लक्झरी बसगाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांनीही जागृत राहून सातारा परिवहन कार्यालयाकडे खासगी बस भाड्याविषयी काही तक्रार असल्यास ९१७२१ २३९४५ या भ्रमणभाष क्रमांकावर तत्परतेने संपर्क साधावा.’’